Home » लोणारला येणार ? भाग २

लोणारला येणार ? भाग २

by Correspondent
0 comment
Lonar Lake | K Facts
Share

पौराणिक, ऐतिहासिक आणि वैज्ञानिक अशा सर्व बाजूंनी या सरोवराला महत्त्व आहे. स्कंद पुराणात बालरूपात येऊन श्रीविष्णूने लवणासुराचा वध केला. त्या लवणासुराच्या वधाचा प्रदेश म्हणून लवणार आणि त्याचे अपभ्रंश होऊन लोणार हे नाव पडलं,  तसेच इथे असणारी चालुक्य व यादव काळातील मंदिरे द्रविड वास्तुशैलीची व ऐतिहासिक महत्त्वाची साक्ष देतात. चक्रधरस्वामींचा या ठिकाणी निवास होता . काही गोष्टी फारच गूढ आहेत. मधुमता नावाचे नगर म्हणजेच लोणार असा ऋग्वेदात उल्लेख सापडतो. तर वाल्मिकी रामायणात दंडकारण्यातलाच पंचाप्सर सरोवर नावाचा  काही विभाग हा लोणारचा परिसर असल्याचा उल्लेख आहे.  या विभागात काही काळ वास्तव्य करूनच राम, लक्ष्मण, सीता पुढे नाशिक पंचवटी येथे गेले.

अकबरनामा या पुस्तकात इथल्या क्षारयुक्त पाण्यापासून जंतुनाशक साबण त्याकाळी मुघल राजवटीत बनवला जात असे अशी माहिती मिळते.

वैज्ञानिक महत्त्व तर आपल्याला कल्पना करता येणार नाही इतके आहे. ५२,००० वर्षांपूर्वी एक ६० मीटर रुंदीची व २० लाख टनांपेक्षा जास्त  वजनाची उल्का येथे पडली तेव्हा ६ मेगाटन एवढी ऊर्जा उत्पन्न झाली असावी. यानंतर इथे विवर झाले व त्यात खाऱ्या पाण्याचा जलाशय निर्माण झाला. मॅस्केलिनाईट हे अत्यंत दुर्मीळ खनिज येथे सापडते. हे पृथ्वीवर निसर्गतः सापडत नाही. प्लेजिओक्लेज फेल्स्पाट या दगडातील खनिजावर उच्च दाब आणि उच्च तापमान यांची एकत्रित प्रभावी क्रिया झाली तरच मॅस्केलिनाइट खनिज बनते. याचा अर्थ हे विवर उल्काघाताचेच आहे. हे पुराव्याने सांगता येते. इथल्या पाण्याचा रंग हिरवट असून पाणी खारट आहे. त्यात सोडिअम कार्बोनेट, क्लोराईड, फ्लोराईड अशी संयुगे आहेत. या क्षारयुक्त पाण्याचे PH १०.० ते १०.५ इतके आहे. या पाण्याने त्वचारोग बरे होतात. या पाण्यात अनेक प्रकारचे शैवाल आहेत. तरी जिवंत जलचर प्राणी नसल्याचा दावा इथले लोक करतात आणि याचा सर्वात अद्भुत नैसर्गिक चमत्कार म्हणजे या परिसराच्या साधारण ८-१० कि मी. त्रिज्येच्या क्षेत्रात चुंबकीय क्षेत्र जास्त आहे.

Maharashtra's Mystery: Lonar Lake – Zoomcar
lonar lake temple

इथल्या पापहारेश्वर आणि घाटातीर्थ मंदिरसमूहाजवळ आम्ही पोचलो आणि एक नैसर्गिक प्रपात गोमुखातून वाहताना दिसला. सर्वच लोक तिध आंघोळ करतात,  त्या वाहत्या गंगेत आम्हीही न्हाऊन घेतले आणि मंदिरसमुहाकडे वळलो, पूर्वाभिमुख पापहारेश्वर मंदिरासमोर अखंड पाषाणात कोरलेला रथ आहे त्याच्यासमोर दोन्हींकडे सिंह आहेत.  तसेच इथले प्रमुख स्थळ म्हणजे दैत्यसूदन मंदिर व त्यावरील खजुराहो शैलीची रतिक्रीडा, पुराणकथा, प्राणी, रथ, राजा-राणी, शंकर, देवी, गजानन अशा मूर्तीनी युक्त असे हे मंदिर प्रेक्षणीय आहे. पुन्हा विश्रामगृहात परतून दुपारचे जेवण घेतले. थोड्यावेळाने चहा व गप्पा-गाणी झालीच. आणि संध्यारंगाचं निरीक्षण करायला विश्रामगृहासमोरच्या चौथऱ्यावर आम्ही बसलो. अवर्णनीय अशा सप्तरंगांच्या छटा रेखीत सूर्य अस्ताला जात होता.

पर्वतांची दिसे दूर रांग । काजळाची जणू दाट रेघ ।

डोई डोहातले चांदणे सावळे । भोवती सावळ्या चाहुली ।

सांज ये गोकुळी ।

हे गीत तिथे मला सुचलं नसतं तर नवल. न भूतो न भविष्यति असा सूर्यास्त मी पाहिला पौर्णिमेच्या चंद्राची शीतल किरणं झेलीत आम्ही स्वरगंगेच्या काठावर बसलो होतो. चंद्राचं सरोवरातलं प्रतिबिंब डोळ्यात आणि मनात साठवलं पण ते टिपता आले नाही. त्यासाठी वेगळ्या प्रकारचे खास कॅमेरे हवेत.

माझी सर्वात आवडती वेळ म्हणजे पहाट. नुकतंच फटफटायला लागल तेव्हा आम्ही उठून पुन्हा त्या सरोवराच्या समोर बसलो. तिथली नीरव शांतता आणि त्या शांततेला असलेला एक आगळावेगळा गूढ स्वर अनुभूतीनेच समजतो. शब्दांत बांधता येत नाही. आता त्याच पाण्याला हिरवा-मोरचुदी असा रंग दिसत होता. या सरोवराभोवती रामफळ, सीताफळ, पळस, निलगिरी, वड, पिंपळ, पांगारा असे वृक्ष आहेत. माकडे, मोर, तरस, कोल्हेही तेथे आढळतात. पुन्हा सर्व आवरून आम्ही आता प्रत्यक्ष सरोवराजवळ जायला निघालो,  त्या सरोवराला खाली उतरायला अनेक जंगलरस्ते आहेत. त्या वाटा तुडवीतच आम्ही उतरलो. साधारण ८०० मीटरचा उतार आहे व तोही ७० ते ८० च्या कोनातला. त्यामुळे पुन्हा चढून वर येताना जीव चांगलाच फेसाटीला येतो. इथे खाली सरोवराच्या तीरावर कमळजा देवीचे मंदिर आहे. कमळजा म्हणजे लक्ष्मी, ती डोंगरावरून बराच काळ सरोवर न्याहाळत राहिली आणि खाली उतरून सरोवराजवळ बसून राहिली. अशी आख्यायिका सांगतात. तिथून नंतर दैत्यसूदन मंदिर,  मोठ्या आडव्या निद्रिस्त मारुतीचे मंदिर पाहिले. ही मूर्ती चुंबकीय आहे असे म्हणतात.

HC raps officials for 'pathetic' condition of Maharashtra's famed Lonar  crater lake | Hindustan Times
लोणार सरोवर (Lonar Lake)

अशा लोणार सरोबराच्या रम्य वातावरणात ३/४ दिवस राहायला कोणाला नाही आवडणार? शनिवार सकाळ ते रविवार संध्याकाळपर्यंत प्रत्येक क्षणाला अक्षरशः तिथल्या सृष्टिसौंदर्याची, रंगछटांची, प्रसन्न वातावरणाची, गूढतेची अनुभूती हृदयाच्या कप्प्यामध्ये साठवून परत निघालो. संध्याकाळी ५ वाजता सुमो करून जालना येथे आलो. वाटेत जिजाऊसाहेबांचे जन्मस्थान असलेल सिंदखेडराजा पाहिले आणि एक रुखरुख मनात साठवून मुंबईला प्रस्थान केलं. अजूनही तो गूढ जलाशय – हिरव्या मोरपिशी रंगाचा डोह आम्हाला बोलावतोय. खुणावतोय. मी तर परत एकदा लोणारला जाणार – तुम्ही येणार?

मुंबई -लोणार ७६५ कि. मी.
जवळचे रेल्वे स्टेशन – जालना (मुंबई-नांदेड मार्गावर)
जालना-लोणार एस टी. किंवा वाहनाने दोन तास
राहण्याची सोय – PWD विश्रामगृह, MTDC व इतर हॉटेल्स
केव्हा जावे – पावसाळा संपता संपता व उन्हाळा सुरू होण्यापूर्वी – सप्टेंबर ते मार्च

” शुभं भवतु “

लेखक – युधामन्यु गद्रे
Contact: yudhamanyu@gmail.com


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.