Home » पाणी टंचाईमुळे लॉकडाऊन?

पाणी टंचाईमुळे लॉकडाऊन?

by Team Gajawaja
0 comment
water
Share

आयटी हब म्हणून ज्या भारतातील शहराची ओळख आहे, ते शहर सध्या पाण्याच्या (water) एका थेंबासाठी तळमळत आहे. या शहरावर जलसंकट एवढ्या तीव्र वेगानं आलं आहे की, येथील शाळाही काही दिवस बंद ठेवाव्या लागत आहेत. सध्या या शहरात कार धुणे, बागकामासाठी वापरण्यात येणारे पाणी, घर स्वच्छता आदीसाठी वापरण्यात येणा-या पाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. पाण्याचा कोणी अपव्यय करतांना आढळले तर त्याला 5000 रुपयांचा दंड ही करण्यात येत आहे.

बंगळूरचे पाणी संकट एवढे कठीण आहे की, येथील एका कुटुंबाला पाण्यासाठी 10,000 रुपये खर्च करावे लागत आहेत. बंगळूर शहराचे मोठ्या प्रमाणात झालेले कॉंक्रीटीकरण हे या पाणीटंचाईसाठी कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. शहरात उभ्या राहिलेल्या भव्य इमारतींच्या आड नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत अडले गेले आहेत, त्यामुळे या आयटी हब असलेल्या शहरावर वाळवंट होण्याची वेळ आली आहे. असेच पाण्याचे संकट राहिले तर येथील मोठ्या उद्योगांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. परिणामी, आयटी हब शहराचे आर्थिक गणित बिघडण्याची स्थिती आहे.

कर्नाटकची राजधानी असलेल्या बंगळूरची ओळख देशाची आयटी हब अशी झाली आहे. जगभरातील मान्यवर आयटी कंपन्यांसाठी बंगळूर हे आवडते शहर बनले. आयटी क्षेत्रातील लाखो तरुणांचे हे शहर ड्रीम शहर आहे. याच ड्रीम शहरावर आता दुष्काळाची तीव्र सावली आहे. पाण्याच्या एका थेंबासाठी येथील नागरिक प्रतीक्षा करीत आहेत. बंगळूरमध्ये वाढलेले काँक्रीटचे जंगल याला कारणीभूत ठरले आहे.

कर्नाटक राज्याची राजधानी असलेल्या बंगळूरमधील अनेक भागातील नागरिक सध्या रोज लागणा-या पाण्यासाठी तासनतास रांगेत उभे रहात आहेत. या शहरात पाण्याची (water) एवढी टंचाई वाढली आहे की, काही भागातील चक्क शाळा आणि कोचिंग सेंटर्स ही बंद करण्यात आले आहेत. कोरोनामध्ये ज्याप्रमाणे लॉकडाऊन लागले होते, तसेच लॉकडाऊन आता या शहरात पाण्यामुळे लागले आहेत. येथील बहुतांशी शाळा आता पुन्हा वर्ग ऑनलाइन करण्यात आले आहेत.

शहरात पाण्याची (water) मागणी पूर्ण करण्यासाठी नागरिक महिन्याला 10,000 रुपयांपर्यंत खर्च करत आहेत. एवढे खर्च करुनही नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये वाढलेला असंतोष बघता सरकारने पाण्याशी संबंधित मदतीसाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. याशिवाय सरकारनं शहरात पाणी (water) वापरावर कडक निर्बंध घातले आहेत.

बंगळूर शहरात कार धुणे, बागकाम, इमारत बांधकाम आणि रस्ते बांधणी किंवा देखभालीसाठी स्वच्छ पाणी वापरल्यास 5,000 रुपये दंड भरावा लागणार आहे. मात्र येथील जनतेला आता वेगळी काळजी पडली आहे. आता मार्च महिना चालू आहे. पुढचे दोन महिने अधिक तीव्रतेचे असतात. उन्हाळा वाढतो. त्यामुळे पाण्याची मागणीही वाढते, अशावेळी या शहरातील जनतेला पाणी कसे मिळणार हा प्रश्न विचारला जात आहे.

यासंदर्भात बंगळूरमधील मान्यवरांची समिती स्थापन करण्यात आली आहे. बंगळूर पाणीपुरवठा (water) आणि मलनिस्सारण ​​मंडळाचे अध्यक्ष डॉ. व्ही. राम प्रसाद मनोहर हे शहरावरील पाणी संकटावर मात करण्याचे उपाय शोधत आहेत. बंगळूर शहरातील नागरिकांना 2100 MLD पाण्याची गरज आहे. पण त्याच्या अर्धेच पाणी (water) या शहराला पुरवण्यात येत आहे. येथील बोअरवेलच्या पाण्याची पातळीही कमालीची खालावली आहे. परिणामी या बोअरवेललाही पाणी येत नाही. त्यामुळे बंगळूरमधील जनता आता 100 किलोमीटर दूर असलेल्या कावेरी नदीच्या पाण्यावर अवलंबून आहेत.

मेट्रो धावणा-या या शहरात पाण्याचे (water) टँकरही अव्वाच्या सव्वा रुपये किंमत मागत आहेत. सामान्य दिवसात टँकरची किंमत 700-800 रुपये होती. मात्र आता पाण्याच्या वाढत्या मागणीमुळे टँकर 1800-2000 रुपयांची मागणी करत आहेत. बंगळूरमधील पाण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी खासगी टँकर आणि खासगी बोअरवेल ताब्यात घेण्याची घोषणा आता सरकारनं केली आहे. पाणीटंचाई पूर्ण करण्यासाठी दुधाचे टँकरही वापरण्यात येत आहेत.

=========

हे देखील पहा : ‘हे’ आहे तरंगणारे एकमेव सरोवर

=========

बंगळूर शहराला कृष्णराजा सागर आणि काबिनी या प्रमुख जलाशयांमधून पाण्याचा (water) पुरवठा करण्यात येतो. यामध्ये आता फक्त 20 पाण्याचा साठा उपलब्ध आहे. म्हणूनच पुढचे दोन महिने, किंबहुना पाऊस येईपर्यंत बंगळूर शहराचे भविष्य धोक्यात आहे. त्यामुळेच आता या शहरातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत शोधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासह शहरात ज्या मोठ्या सोसायट्या आहेत. त्यामध्ये सीवेज ट्रीटमेंट प्लांट बसवण्यासाठी कायदा करण्यात आला आहे.

आता या कायद्याची कारवाई कठोरपणे करण्याची मागणी करण्यात येत आहे. एकूण बंगळूरने आयटी हब म्हणून ओळख मिळवली असली तरी जीवनासाठी आवश्यक अशा पाण्यासाठी हे शहर आता तळमळत आहे. जर भविष्यात या शहराची पाण्याची तहान भागवली नाही तर त्याची आयटी हब ही ओळख पुसली जाण्याचा धोका आहे.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.