Home » भारतीयांच्या मनात आजही अमर आहेत नेताजी…

भारतीयांच्या मनात आजही अमर आहेत नेताजी…

by Correspondent
0 comment
Netaji Subhas Chandra Bose
Share

२३ जानेवारी १८९७,ओडिशा मधील कटक शहरात, जानकीनाथ आणि प्रभावती यांच्या कुटुंबात, एक असं आपत्य जन्माला आलं, की जे पुढे इतिहासाच्या कारकिर्दीत ‘नेताजी’ म्हणून लोकप्रिय झालं. नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhas Chandra Bose) कटक मध्ये ‘रॅवेन्शॉ कॉलिजिएट हायस्कूल’ नामक शाळेत शिकत असताना, त्यांचे शिक्षक वेणीमाधव दास हे स्वातंत्र्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्फुल्लिंग पेटवत असत. वयाच्या १५व्या वर्षी सुभाषबाबूंनी गुरूच्या शोधात हिमालयात निघून जाण्यासाठी घर सोडले, परंतु नंतर स्वामी विवेकानंद यांचे साहित्य वाचून सुभाषबाबू त्यांचे शिष्य बनले. पुढे कोलकात्त्यातील प्रेसिडेंसी महाविद्यालयात इंग्रज प्राध्यापक ओटेन यांच्याविरुद्ध बंड करून त्यांनी सर्वांचे धाबे दणाणून सोडले. त्यांच्या वैयक्तिक जीवनात १४ भावंडांपैकी शरदबाबू उर्फ ‘मेजदा’ त्यांचे सर्वात लाडके होते.


१९२१ साली इंग्लंडला जाऊन, सुभाष (Netaji Subhas Chandra Bose) भारतीय नागरी सेवेच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले खरे पण इंग्रज सरकरची नोकरी करण्यास नकार देऊन ते सरळ मायदेशी परतले. देशबंधू चित्तरंजन दास यांच्या कार्याने सुभाषबाबू अत्यंत प्रेरित झाले होते, त्यांच्यासोबत काम करण्याची मनापासून इच्छा असल्याने इंग्लंडला असतानाच त्यांनी चित्तरंजन दास यांना पत्र लिहून कळवले होते. पुढे भारतात परतल्यावर सर्व प्रथम मुंबईत जाऊन त्यांनी गांधीजींची भेट घेतली. तेव्हा, गांधीजीनी इंग्रज सरकारच्या विरोधात, ‘असहकार आंदोलन’ चालवले होते. दासबाबू बंगालमध्ये ह्या आंदोलनाचे नेतृत्व करत होते. त्यांच्याबरोबर सुभाषबाबू ह्या आंदोलनात सहभागी झाले. पुढे दासबाबू यांनी कॉंग्रेस अंतर्गत ‘स्वराज्य’ पक्षाची स्थापना केली. कोलकात्त्याचे महापौर म्हणून निवडून आल्यावर त्यांनी सुभाषबाबूंची प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून नेमणूक केली. त्यांनी आपल्या कार्यकाळात महापालिकेची काम करण्याची पद्धतच बदलून टाकली. फार कमी वेळात सुभाषबाबू हे लोकप्रिय आणि अग्रेसर युवा नेते सुद्धा बनले.

१९२८ साली जेव्हा सायमन कमिशन भारतात आले तेव्हा, सायमन कमिशनला चोख उत्तर देण्यासाठी आठ सदस्यांची कमिटी नेमण्यात आली; सुभाषबाबू त्यातले महत्वाचे सदस्य होते. सायमन कमिशनला काळे झेंडे दाखवत त्यांचा निषेध करण्यात आला आणि कोलकत्त्यात नेताजींनी याचे नेतृत्व केले होते. त्यांच्या संपूर्ण कारकि‍र्दीत त्यांनी ११ वेळा जेलची वारी केली, त्या दरम्यान मंडालेच्या तुरुंगात त्यांना भयंकर क्षय रोगाने ग्रासले आणि नियमानुसार त्यांना उपचारासाठी जेल मधून सोडावे लागणार होते, तेव्हा इंग्रज सरकारने त्यांना उपचारासाठी युरोपला धाडण्यास परवानगी दिली परंतु त्या सोबतच भारतात ते कधी परतू शकतील याची खात्री दिल नाही. पण नेताजींनी इंग्रजांच्या या अटी साफ अमान्य केल्या; पुढे कदाचित कोठडीतच त्यांचा मृत्यू व्हावा अशी परिस्थिती उद्भवली तेव्हा इंग्रज सरकारने त्यांची सुटका केली. आणि ते डलहौसी येथे जाऊन राहिले. पण पुढे १९३२ साली अलमोडा तुरुंगात त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. वैद्यकीय सल्ल्यानुसार सुभाषबाबू ह्यावेळी औषधोपचारासाठी युरोपला जायला तयार झाले.

१९३३ पासून १९३६ पर्यंतच्या युरोपमधील वास्तव्यात सुभाषबाबूंनी (Netaji Subhas Chandra Bose) आपल्या तब्येतीची काळजी घेतानाच, आपले कार्यही सुरूच ठेवले. मुसोलिनी, डी व्हॅलेरा यांच्याशी चांगली मैत्री जोडून त्यांनी इटली आणि आयर्लंडशी जवळीक साधली. पुढे युरोपात विठ्ठलभाई पटेल आणि नेताजींनी ‘पटेल-बोस’ जाहीरनामा देऊन गांधीजींच्या कार्यावर टीका केली. विठ्ठलभाईनी त्यांच्या मृत्युपत्रानुसार त्यांची करोडोंची संपत्ती नेताजींच्या नवे केली होती, पण कोर्ट कारवाईत सरदार पटेलांनी ती संपत्ती जिंकून घेत सर्व संपत्ती गांधीजींच्या हरिजन कार्यास ती भेट दिली.

१९३८ मध्ये भारतात परतल्यावर, हरिपूर येथे झालेल्या कॉंग्रेसच्या ५१व्या अधिवेशनात, गांधीजीनी नेताजींची काँग्रेसचे अध्यक्षम्हणून नियुक्ती केली, पण नेताजींना गांधीजींची कार्यपद्धती पसंत नव्हती. युरोपात दुसर्‍या महायुद्धाची लक्षणं दिसत असतानाच आपला स्वातंत्र्य लढा अधिक तीव्र केला तर इंग्रजांची चाहु बाजूने कोंडी होईल, अशी नेताजींची इच्छा होती. परंतु हे गांधीजींना अमान्य असल्याने अंतर्गत कालः विकोपास गेले आणि एप्रिल १९३९ मध्ये नेताजींनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देत, मी १९३९मध्ये फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली.

दुसरे महायुद्ध होण्या आधीच फॉरवर्ड ब्लॉकने स्वातंत्र्य लढा तीव्र करण्याचा प्रयत्न सुरु केला. म्हणून इंग्रज सरकारने फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व प्रमुख नेत्यांना कैद केले, पण युध्द सुरु असताना तुरुंगात निष्क्रिय राहणे नेताजींना शक्य नसल्याने त्यांनी उपोषण करून आपली सुटका करण्यास भाग पाडले. पण युद्धकाळात सुभाषबाबूंना मोकळे ठेवणे इंग्रज सरकारच्या दृष्टीने धोक्याचे असल्याने त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आले. पण इंग्रजांची नजरकैद तोडून तिथून पलायन करणे ह्यासाठी एक योजना बनवून सुभाषबाबू, महमद झियाउद्दीन असे नाव धारण करत, पोलिसांची नजर चुकवून, घरातून निसटले. मग कोलकत्ता ते गोमोह आणि पुढे थेट पेशावर असा प्रवास करत नेताजींनी सरकारच्या हातावर सहज तुरी दिली.

Netaji Subhas Chandra Bose



काबुल मध्ये राहून त्यांनी रशियन वकिलीत प्रवेश करायचा प्रयत्न केला पण नंतर जर्मनी आणि इटली वकिलातींनी त्यांना मदत केली. पुढे नाझी आणि जर्मन मध्ये वास्तव्य केले हिटलरशी भेट घेतली, परंतु हिटलर कडून मदतीचे कोणतेही थेट आश्वासन न मिळाल्याने त्यांनी पूर्व आशियाच्या दिशेने वाटचाल सुरु केली. पूर्व आशियात पोचल्यावर वयोवृद्ध क्रांतिकारी रासबिहारी बोस ह्यांनी सिंगापूर येथील फेरर पार्कमध्ये भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवले.

नेताजींच्या (Netaji Subhas Chandra Boseव्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन, जपानचे पंतप्रधान जनरल हिदेकी तोजो ह्यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. काही दिवसांनंतर, नेताजींनी जपानच्या संसदेसमोर भाषण केले. १९४३ मध्ये नेताजींनी सिंगापूरमध्ये अर्जी-हुकुमत-ए-आझाद-हिंदची (स्वाधीन भारताचे अंतरिम सरकार) स्थापना केली. आझाद हिंद फौजेत स्त्रियांसाठी झांसी कि रानी रेजिमेंटही बनवली गेली. पूर्व आशियात नेताजींनी अनेक भाषणे करून तेथील स्थायिक भारतीय लोकांना या फौजेत भरती होण्याचे आणि आर्थिक मदत करण्याची आवाहने केली. ही आवाहने करताना त्यांनी ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा’ असा नारा दिला.

आझाद हिंद फौजेने जपानी लष्कराच्या साथीने भारतावर आक्रमण केले. आपल्या फौजेला प्रेरणा देण्यासाठी नेताजींनी ‘चलो दिल्ली’ अशी हाक दिली. दोन्ही फौजांनी इंग्रजांकडून अंदमान निकोबार बेटे जिंकली. पण नंतर इंग्रजांनी बाजी मारली व दोन्ही फौजांना माघार घ्यावी लागली. माघार घेत असताना, जपानी लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था केली. पण नेताजींनी झांसी कि रानी रेजिमेंटच्या मुलींच्या साथीने शेकडो मैल चालत जाणे पसंत केले. अशा प्रकारे नेताजींनी नेतृत्वाचा एक आदर्शच समोर ठेवला.

दुसर्‍या महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर, नेताजींना नवा रस्ता शोधणे भाग पडले. तेव्हा त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. ह्या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले. ह्या दिवसानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत. नेताजींच्या मृत्यूचे रहस्य आजही अनुत्तरीत आहे. सी आय ए आणि इतर अनेक संघटना यांनी या रहस्याचा शोध घ्यायचा प्रयत्न केला परंतु आजही नेताजींच्या मृत्यूचे प्रश्नचिन्ह सुटलेले नाही.

==========

हे ही वाचा: एकही रस्ता नसलेलं गाव! लोक कार आणि बाईकऐवजी खरेदी करतात बोट

===========

नेताजी यांनी देशाबाहेर राहूनही देशासाठी केलेले कार्य, अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची पद्धत, गुप्तहेर संघटनेचे काम, राजकीय आणि सामाजिक कामासाठी केलेली आखणी, प्रेरणादायी भाषणे सगळ्याच पातळीवर सुभाषबाबू हे आजही भारतीयांसाठी एक आदर्श आहेत. नजरकैदेतून सुद्धा सहज निसटून जाऊन भूमिगत होणे त्यांच्यासाठी इतके सहज होते कि, त्यांच्या मृत्युच्या बातमीवर सहज विश्वास ठेवणे आजही शक्य होत नाही. १८ ऑगस्ट हा नेताजींचा स्मृतिदिन म्हणून भारतीयांच्या स्मृतीत राहिला परंतु खऱ्या अर्थाने आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात ‘जय हिंद’ च्या घोषणेतून ‘नेताजी’ अमर आहेत. अशा क्रांतीकारला शतशः दंडवत.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.