नवरात्र, दसरा झाली की लगेच पाठोपाठ येते ती कोजागिरी पौर्णिमा. प्रत्येक महिन्यात एक पौर्णिमा येते. अशा वर्षभरात बारा पौर्णिमा येतात. प्रत्येक पौर्णिमा ही खास असते आणि तिचे महत्व देखील खूप असते. मात्र अश्विन महिन्यात येणारी पौर्णिमा ही अधिकच शुभ आणि महत्वाची मानली जाते. याच पौर्णिमेला शरद पौर्णिमा, अश्विन पौर्णिमा, कोजागिरी पौर्णिमा असे देखील म्हटले जाते. शिवाय अनेक ठिकाणी या पौर्णिमेला रास पौर्णिमा आणि कौमुदी व्रत या नावाने देखील ओळखले जाते.
वर्षातील सर्व पौर्णिमा तिथींमध्ये शरद पौर्णिमा ही सर्वात शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. यावर्षी शरद पौर्णिमा अर्थात अश्विन महिन्याची पौर्णिमा १६ ऑक्टोबरला, बुधवारी रात्री ८.४० वाजता सुरु होणार आहे. तर, दुसऱ्या अर्थात दिवशी १७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ४.५६ मिनिटांपर्यंत असेल. त्यामुळे ही कोजागिरी पौर्णिमा तिथी १६ ऑक्टोबर रोजी साजरी करण्यात येणार आहे.
कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या खूपच जवळ असतो. त्याचमुळे या रात्री चंद्राचा शांत शीतल प्रकाश जणू अमृतवर्षाव करतोय असाच भास होतो. त्यामुळे कोजागिरीच्या रात्री दूध, खीर बनवून ती चांदण्यात ठेवली जाते. त्यावर चंद्रकिरण पडल्यानंतर ती खीर प्रसाद म्हणून रात्री खाल्ली जाते. असे केल्याने आपल्याला देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे. या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. या रात्री लक्ष्मी येऊन आपलं घर ऐश्वर्यानं भरून टाकते, असे म्हटले जाते. म्हणूनच तर घर स्वच्छ, नीटनेटके देखील केले जाते.
अशी देखील मान्यता आहे की, याच दिवशी देवी लक्ष्मी प्रकट झाली, म्हणून हा दिवस देवी लक्ष्मीची जयंती म्हणून साजरा केला जातो. अनेक ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा देखील केली जाते. ही पूजा करताना उपवास केला जातो. तांब्याच्या, चांदीच्या कलशावर वस्त्राने झाकलेली लक्ष्मीची मूर्ती स्थापित करून तिची मनोभावे पूजा करावी. चंद्रोदय झाल्यावर तूपाचे दिवे लावले जातात आणि प्रसाद म्हणून दूध, तूप आणि ड्रायफ्रुट्स घालून खीर बनवली जाते. त्यानंतर ही खीर चंद्र प्रकाशात ठेऊन मगच ग्रहण केली जाते. सोबतच कोजागिरीच्या दिवशी घरातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून अश्विनी साजरी केली जाते. धनप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर येते. लोकं मोठ्या आस्थेने तिची पूजा करतात. या दिवशी चंद्र त्याच्या 16 टप्प्यांनी भरलेला असतो आणि त्याच्या किरणांनी अमृताचा वर्षाव होतो.
कोजागिरी पौर्णिमेला दूध करण्याचे महत्व
कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. चंद्राच्या प्रकाशात सकारात्मक उर्जा असते. या दिवशी रात्री चंद्राच्या प्रकाशात दुध आटवल्याने त्याची किरणे दूधात पडतात. याच दिवसापासून हिवाळ्याची सुरूवात होते असे मानले जाते. त्यामुळे ऋतू बदल झाल्यानंतर अनेक संक्रमीत आजार देखील पाठोपाठ येतात. चंद्राच्या प्रकाशात आटवलेले दुध पिल्याने रोगप्रतीकारक शक्ती वाढते.
कोजागिरी पौर्णिमेची आख्यायिका 1
एका राजाची कथा यामध्ये सांगितली जाते. एक राजा काही कारणामुळे आपले सगळे वैभव आणि संपत्ती गमावून बसतो. आपली संपत्ती पुन्हा मिळवण्यासाठी राणीने महालक्ष्मीचे व्रत केले. तिच्या व्रतामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न झाला आणि तिला आशीर्वाद मागण्यास सांगितले. तिने आपले राजवैभव परत माागितले. तिला ते वैभव परत मिळाले. कोजागिरी पौर्णिमेच्या या दिवशी मध्यरात्री चंद्रमंडलातून उतरुन साक्षात महालक्ष्मी खाली पृथ्वीतलावर येते. ती चांदण्यांच्या प्रकाशात ‘अमृतकलश’ घेऊन येते आणि सगळ्यांना विचारते ‘को जार्गति? को जार्गति?’ तिने आणलेल्या अमृत कलशामध्ये असलेले ज्ञान, वैभव देण्यासाठीच ती आलेली असते. जे लक्ष्मीला साद देतात तिला ही सुखसमृद्धी मिळते.
कोजागिरी पौर्णिमेची आख्यायिका 2
फार फार वर्षांपूर्वीची गोष्टी मगध नावाच्या राज्यात वलित नावाचा एक सुसंस्कृत परंतु गरिब ब्राम्हण राहात होता. जो एवढा सज्जन होता. त्याची पत्नी तितकीच दृष्ट होती. ब्राम्हणाच्या गरिबीमुळे ती सतत त्याला त्रास देत होती. गरिबीमुळे त्रासलेल्या ती पत्नी ब्राम्हणाला नको नको ते बोलत होती. पतीच्या विरोधातील त्याचे आचरण पाहून त्याला त्रास होत असे. चोरी सारख्या वाईट कामांसाठीही ती त्याला प्रवृत्त करु लागली. एकदा एक पूजा करताना तिने या पूजेमध्ये व्यत्यय आणून ती पूजा पाण्यात फेकून दिली. चिडलेल्या आणि थकलेल्या ब्राम्हणाने जंगलात निघून जाणे पसंत केले. जंगलात गेल्यावर त्यांना काही नागकन्या भेटल्या त्यांनी त्या गरिब ब्राम्हणाला त्या दिवसाचे महत्व सांगितले. तो अश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा होती. तिने ब्राम्हणाला कोजागिरी व्रत करण्यास सांगितले. त्याने विधीवत कोजागरी व्रत केले. त्याला सुख-समृद्धी मिळाली.लक्ष्मीच्या कृपेने त्याची पत्नीही चांगली सुबुद्धी झाली. त्यांचा संसार सुखाचा झाला.