प्रत्येक वर्षी अश्विन महिन्यातील अमावस्या तिथीला दिव्यांचा सण दिवाळी साजरी केली जाते. सगळ्यांचा आवडता सण म्हणून दिवाळीला ओळखले जाते. सणाच्या निमित्ताने बाजारपेठा फुलतात, सगळीकडे माणसांची वर्दळ, फराळाची लगबग, फटाक्यांचे स्टॉल, रांगोळीच्या रंगांनी वातावरण रंगबेरंगी होते. हीच या सांची मोठी खासियत आहे. दूरचे लोकं खास दिवाळीसाठी घरी परतात. दिवाळीतील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजन. लक्ष्मी देवीचा वाढदिवस म्हणून देखील लक्ष्मी पूजनाला ओळखले जाते. या दिवशी घरात सुख समृद्धी, धनलाभ होण्यासाठी, समृद्धीसाठी लक्ष्मी पूजन केले जाते. मात्र हे लक्ष्मी पूजन असे नाव असले तरी या दिवशी लक्ष्मीसोबतच पूजा केली जाते ती श्री गणेशाची देखील. अर्थात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लक्ष्मीसोबतच गणेश पूजन देखील केले जाते. या मागचे नक्की कारण काय? चला जाणून घेऊया.
देवी लक्ष्मीसह गणपतीची पूजा केल्याचे महत्त्व आहे. देवी लक्ष्मी श्री ही धन – संपत्ती, समृद्धीची देवता आहे. तर श्रीगणेश बुद्धी, ज्ञान, कला, विवेक आदी गुणांचे अधिपती आहेत. बुद्धी नसेल तर धनधान्याची प्राप्ती होणे कठिण किंबहुना अशक्य असते. लक्ष्मी देवीच्या कृपेने मनुष्याला धन-सुख-समृद्धीची प्राप्ती होते. देवी लक्ष्मीची उत्पत्ती समुद्र मंथनातून म्हणजेच पाण्यातून झाली आहे आणि पाणी नेहमी गतिमान असते, त्याचमुळे लक्ष्मीसुद्धा एका ठिकाणी थांबत नाही, ती चंचल असते.
लक्ष्मी सांभाळण्यासाठी बुद्धीची गरज असते. दिवाळीत लक्ष्मीसोबत गणपतीची पूजा केल्याने आपल्याला बुद्धीची देखील प्राप्ती होते. अशी मान्यता आहे की, जेव्हा लक्ष्मी येते तेव्हा तिच्या चकाकीमुळे तिच्या प्रखरतेमुळे मनुष्य त्याचा विवेक गमावून बसतो. तोच विवेक टिकवण्यासाठी लक्ष्मीसोबतच गणेशाची पूजा केली जाते. यासोबतच लक्ष्मीसोबतच गणपतीची पूजा करण्यामागे एक आख्यायिका देखील सांगितले जाते.
पौराणिक कथा
१८ महापुराणांपैकी एक महापुराणात वर्णित कथाप्रमाणे, मंगल करणारे श्रीगणेश हे देवी लक्ष्मीचे दत्तक पुत्र आहे. एकदा देवी लक्ष्मीला स्वतःचा अभिमान वाटू लागला होता. ही गोष्ट भगवान विष्णूंच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी देवीला म्हटले की जरी सर्व जग तुझी उपासना करत असेल आणि तुझ्या प्राप्तीसाठी सदैव उत्सुक असेल, तरीही तू अपूर्ण आहेस. तेव्हा देवी लक्ष्मीने याचे कारण विचारले तर प्रभू विष्णू म्हणाले की एखादी स्त्री आई होईपर्यंत स्त्रीला पूर्णत्व मिळू शकत नाही. हे जाणून घेतल्यानंतर लक्ष्मी देवीला खूप दु:ख झाले. त्यांनी आपली व्यथा देवी पार्वतीला सांगितली.
========
हे देखील वाचा : दिवाळी ट्रेंडिंगचा ६८ वर्षांचा मोठा इतिहास
========
देवी लक्ष्मीला पुत्र नसल्यामुळे दुःखी पाहून पार्वतीने आपला मुलगा गणेशाला देवीच्या मांडीवर बसवले. तेव्हापासून गणेश हे देवी लक्ष्मीचे दत्तक पुत्र म्हणून ओळखले जाऊ लागले. श्री गणेशाला दत्तक पुत्र रुपात प्राप्त करुन माता लक्ष्मीला खूप आनंद झाला. माता लक्ष्मीने गणेशाला वरदान दिले की जो कोणी माझ्यासोबत तुझी पूजा करणार नाही, लक्ष्मी त्याच्याजवळ कधीच राहणार नाही. त्यामुळे दिवाळीच्या पूजेमध्ये माता लक्ष्मीसह गणेशाची दत्तक पुत्र म्हणून पूजा केली जाते.