हिंदू धर्मामध्ये चार धामांना अनन्यसाधारण महत्व आहे. प्रत्येक हिंदू व्यक्ती जीवनात एकदा तरी चार धाम यात्रा करतोच. या चार धामांमध्ये बद्रीनाथ, जगन्नाथ पुरी, द्वारका आणि रामेश्वरम या ठिकाणांचा समावेश होतो. या चारही ठिकाणी जाऊन दर्शन घेण्याचे प्रत्येक हिंदूचे स्वप्न असते. यातलेच एक महत्वाचे ठिकाण म्हणजे द्वारका. भगवान श्रीकृष्णाची द्वारका नगरी बघण्याची प्रत्येकाची इच्छा असते.
श्रीकृष्ण हे विष्णूचा आठवा अवतार होते. पृथ्वीवरील दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी त्यांनी अवतार घेतला होता. कंसाच्या वधानंतर ते मथुरेचे राजा झाले. यानंतर त्यांनी महाभारताच्या युद्धात अर्जुनाच्या सारथीची भूमिका निभावत धर्म स्थापनेचे महत्त्वपूर्ण कार्य केले. याच श्रीकृष्णाची नगरी म्हणून द्वारका नगरीला ओळखले जाते.
द्वारकेमध्ये जगप्रसिद्ध द्वारकाधीश मंदिर आहे. हे मंदिर गुजरात राज्यातील द्वारका या पवित्र शहरात गोमती नदीच्या काठावर आहे. ज्याला जगत मंदिर असेही म्हणतात. भगवान कृष्णाला समर्पित, द्वारकाधीश मंदिर हे द्वारका भारतातील सर्वात प्रमुख आणि भव्य मंदिरांपैकी एक आहे. येथे दरवर्षी लाखो भाविक आणि पर्यटक द्वारकाधीश मंदिराच्या दर्शनासाठी येतात.
द्वारका नगरीतील श्रीकृष्णाचे द्वारकाधीश मंदिर २२०० वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते. हे मंदिर वज्रनभने बांधले होते. वज्रनभ हे श्रीकृष्णाचे नातू होते. या भव्य मंदिरात भगवान श्रीकृष्णांसोबतच सुभद्रा, बलराम, रेवती, वासुदेव, रुक्मिणी आणि इतर अनेक देवतांना समर्पित मंदिरे आहेत.
पौराणिक कथेनुसार द्वारकाधीश मंदिर २२०० वर्षांपूर्वी कृष्णाचा नातू वज्रनभ याने हरिगृहावर बांधले होते. परंतु या मंदिराची मूळ रचना १४७२ मध्ये महमूद बेगडा यांनी नष्ट केली आणि नंतर १५व्या-१६व्या शतकात पुन्हा बांधली.
आठव्या शतकातील हिंदू धर्मशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ आदि शंकराचार्य यांनी या ठिकाणी शारदा पीठाची स्थापना केली होती. द्वारकाधीश मंदिर हे श्री विष्णूचे जगातील १०८ वे दिव्य देश आहे ज्याचा गौरव दिव्यप्रभात ग्रंथात केला आहे.
द्वारकाधीश मंदिरात दर्शनासाठी येणारे बरेच भाविक गोमती नदीत स्नान करतात आणि त्यानंतरच मंदिरात प्रवेश करतात. जन्माष्टमीच्या दिवशी या मंदिरात मोठा, नेत्रदीपक आणि विशेष सोहळा असतो. हा सोहळा बघण्यासाठी भारताच्या नव्हे तर जगाच्या विविध भागातून हजारो पर्यटक द्वारकेमध्ये येतात.
द्वारकाधीश मंदिर भव्य मार्गाने तयार करण्यात आले असून चुनखडी आणि वाळूचा वापर करून हे स्मारक चालुक्य शैलीमध्ये बनवले गेले आहे. जे भारतातील सर्वात प्राचीन शैली प्रतिबिंबित करते. तसेच हे मंदिर दगडाच्या तुकड्यावर बांधले गेले आहे. हे मंदिर ५ मजली आहे आणि ७२ खांबांवर स्थापित आहे. या मंदिराचे शिखर सुमारे ७८.३ मीटर उंच आहे. यात ४२ मीटर उंचीचा एक उत्कृष्ट कोरीव शिखर आहे आणि ५२ यार्ड उंच कापडाचा ध्वज आहे. ध्वजावर सूर्य आणि चंद्राची चिन्हे आहेत, जे भगवान कृष्णाच्या मंदिरावर राज्य करतात, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र उपस्थित आहेत.
मंदिराची भव्यता म्हणजे स्वर्गरोहण (जेथे यात्रेकरू प्रवेश करतात) आणि मोक्षद्वार (जेथून यात्रेकरू बाहेर पडतात) हे दोन दरवाजे आहेत आणि त्यात एक व्यासपीठ, गर्भगृह आणि दोन्ही बाजूंना पोर्च असलेला आयताकृती हॉल आहे. वास्तूच्या दक्षिण दरवाजाच्या बाहेर गोमती नदीच्या काठावर जाण्यासाठी ५६ पायऱ्या आहेत.
द्वारका नगरी समुद्रात का बुडाली?
पौराणिक कथांनुसार भगवान श्रीकृष्णाने आपली द्वारका नगरी स्थापन करण्यासाठी समुद्रातून जागा मागितली होती. भगवान हरींची ही विनंती समुद्र देव नाकारू शकले नाहीत आणि ते मागे फिरले. यानंतर समुद्र माघारी गेलेल्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने द्वारका नगरी वसवली.
असे म्हणतात की ते शहर सोन्याचे होते. महाभारताच्या युद्धानंतर भगवान कृष्ण द्वारकेला परतले तेव्हा त्यांनी पाहिले की कुटुंबातील लोकं संपत्तीसाठी आपसात भांडत आहेत. त्यांच्यात द्वेषाची भावनाही वाढत आहे. त्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला पण ते समजण्या पलिकडचे होते, त्यामुळे कृष्णाला वाईट वाटू लागले.
एके दिवशी श्री कृष्ण नदीच्या काठावर बसून बासुरी वाजवत असताना एका शिकाऱ्याचा बाण त्याच्या पायाला लागला. हे निमीत्त्य देखील कृष्णानेच घडवून आणले होते, जेणेकरून ते जगाचा निरोप घेऊ शकती. जेव्हा भगवान श्रीकृष्णांना बाण लागल्याने त्यांचा शेवटचा काळ जवळ आला असे वाटले तेव्हा त्यांनी महासागर देवाला त्यांची जागा परत घेण्याची विनंती केली.
यानंतर काही वेळातच त्यांनी जगाचा निरोप घेतला. आपला मानव अवतार पूर्ण करून, जेव्हा भगवान विष्णू क्षीरसागरात गेले तेव्हा समुद्र देवाने विस्तार केला आणि संपूर्ण द्वारका शहर आपल्या कुशीत घेतले त्यामुळे सोन्याने बनलेली द्वारका नगरी कायमस्वरूपी समुद्रात विसर्जित झाली.