भारत देशाला खूप मोठ्या इतिहासाची परंपरा लाभलेले आहे. मात्र इतिहासाचे जस-जसे संशोधन केले जाते, तस-तसा नवीन आश्चर्यकारक इतिहास आपल्या समोर येतो.
तसे पहायला गेले तर जगभरात आश्चर्याच्या गोष्टी काही कमी नाहीत. मात्र आज आपण जी गोष्ट पाहणार आहोत ती एका ऐतिहासिक विहिरी विषयी पाहणार आहोत.
आज पर्यंत तुम्ही प्रेमात मुघलसम्राट शहाजहाँने त्याची राणी मुमताज साठी ताजमहाल बांधल्याची गोष्ट ऐकली असेल. पण आज आम्ही तुम्हाला एका राणीने आपल्या पतीच्या स्मृतिप्रीत्यर्थ एक अशी विहीर बांधली की जी सर्वांना आश्चर्याचे धक्के देते. गुजरात मधील या विहिरीचा इतिहास आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
ही गोष्ट आहे इसवी सन १०६३ सालची अर्थात अकराव्या शतकातली. त्याकाळच्या सोळंकी राजवंशाचे राजा भीमदेव यांच्या प्रथम स्मृतीत त्यांची पत्नी राणी उदयंती यांनी ही विहीर बांधली होती. त्यामुळे या विहिरीला राणी की बावडी (Rani ki vav) असे नाव देण्यात आले.
असे म्हणले जाते की, सरस्वती नदीच्या पुराने वाहुन आलेल्या गाळामुळे ही विहीर जमिनीखाली बऱ्यापैकी गाडली गेली होती. त्यामुळे ही विहीर ६०० वर्षांहून जास्त काळ अज्ञात होती.
पुढे १९३० ते १९६० पर्यंत या विहिरीचे संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले. जेव्हा पुरातत्त्व विभागाने ताबा घेतला तेव्हा मुख्य विहिरीचा वरचा भाग भग्नावस्थेत होता. पण १९६० नंतर खऱ्या अर्थाने खोदण्याचे, संवर्धनाचे काम पुरातत्त्व विभागाने हाती घेतले.
वेगवेगळ्या कालखंडात केलेले हे काम पुरातत्त्व विभागाने २००८ पर्यंत पुर्ण केले. नंतर सर्व बाबींची पूर्तता करून २०१४ साली रानी की बावडीला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला.
विहिरीचे वैशिष्ट्य पहायला गेले तर आपल्याला समजते की, ही विहीर इतिहासाचा एक रोमांचकारी साक्षीदार आहे. कारण राणी की बावडी ही विहीर जमिनीत सात मजली खोल आहे. तसेच या विहिरीत ३० किलोमीटर लांब भुयार सुद्धा आहे
.
ही विहीर तब्ब्ल ६४ मीटर लांब आहे. २० मीटर रुंद आणि २७ मीटर खोल आहे. इतकंच काय तर या विहिरीतला ३० किलोमीटरचा भुयारी मार्ग पाटणच्या सिद्धूपूर मध्ये निघतो. मात्र सध्या तो बंद करण्यात आलेला आहे. पण त्याकाळी भुयारी मार्गाचा वापर राजा आणि त्यांचा परिवार कठीण काळात करत होते.
या विहिरीवर शेषधारी विष्णुची सात रूपे, २४ अवतार, देवीची नानाविध रूपे, नाट्यशास्त्रातील सुंदर नायिका यांची शिल्पे, तसेच विहिरीत उतरण्यासाठी बांधण्यात आलेल्या पायऱ्या, तेथील महाल, त्यांच्या खांबावरील नक्षीकाम हे सर्व अद्भूत आहे.
राणी की बावडी हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ झालेलं आहे. जगभरातून अनेक लोक या स्थळाला भेट देण्यासाठी येत असतात. भारतीय नागरिकांसाठी ४० रुपये, विदेशी पर्यटकांसाठी ६०० रुपये तर १५ वर्षाखालील मुलांना फुकट प्रवेश या पर्यटन स्थळी दिला जातो.
‘राणी की बावडी’ पर्यंत जाण्यासाठी मार्ग
राणी की बावडी (Rani ki Bawdi) येथे जाण्यासाठी सर्वांना सोयीस्कर शहर हे अहमदाबाद (Ahmedabad). राणी की बावडी पासून अहमदाबाद १३५ किमी एवढे अंतर आहे. अहमदाबादपासून रेल्वेने मेहसाणा पर्यंत आणि मग तेथून पुढे बसने ५८ किमी वर पाटण. असा प्रवास करून आपण राणी की बावडी पर्यंत जाऊ शकतो.
– निवास उद्धव गायकवाड
=====