आजकाल लोकं फिटनेस मिळवण्यासाठी, उत्तम आरोग्य राखण्यासाठी किंवा आजार दूर करण्यासाठी अनेक औषधं घेतात किंवा विविध प्रकारच्या पावडर घेतात. मात्र तुम्हाला माहित आहे का…? की हे सगळं करण्यापेक्षा आपल्याकडे निसर्गाने दिलेले वरदान आहे आणि ते म्हणजे विविध प्रकारच्या असंख्य भाज्या आणि फळं. हे खाऊन आपण अनेक आजारांना दूर ठेऊ शकतो आणि झालेले आजार देखील बरे करू शकतो. मात्र यासाठी गरज असते विश्वास आणि धीराची. कधी कधी औषधं घेणे गरजेचे असते किंवा आपल्याकडे ते घेण्याशिवाय पर्याय नसतो. तेव्हा तुम्ही त्याच्या सोबत भाज्या आणि फळं देखील खाऊ शकतात. असे केल्याने नक्कीच तुम्हाला तोटा होणार नाही.
आपल्याकडे उपलब्ध असलेल्या भाज्या आणि फळांमधील सुपरफूड अशी ओळख असलेली भाजी किंवा फळ म्हणजे गाजर. केशरी रंगाचे गोडसर गाजर कोणाला आवडत नाही. थंडीचे दिवस सुरु झाले की बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर गाजर दिसण्यास सुरुवात होते. लांब, केशरी रंगाचे कोवळे गाजर नेहमीच आपले लक्ष वेधून घेतात. गाजराचा सिझन सुरु झाला की, अनेकांच्या घरात नेहमीच बनणारा एक पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा.
या गाजराचा हलव्याचे असंख्य फॅन्स आहेत. मात्र गाजर फक्त सलाड म्हणून किंवा हलवा म्हणूनच सीमित नाहीये. या गाजराचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक चमत्कारिक फायदे आहेत. गाजरामधील अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात जे शरीराला अनेक आजारांपासून वाचवतात. नियमितपणे गाजर खाल्ल्याने अनेक चांगले फायदे दिसून येतात.
गाजरांमध्ये विशिष्ट प्रकारचे जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. गाजर अतिशय पौष्टिक आहे. हे केवळ पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी प्रदान करत नाही तर यामध्ये प्रोव्हिटामिन ए देखील मोठ्या प्रमाणात असते. अनेक आरोग्यविषयक समस्यांवर सोपं आणि स्वस्त उत्तर म्हणजे गाजर खाणे. गाजराचे आपल्या शरीरावर एवढे चांगले आणि सकारत्मक फायदे होतात की ते लोकांना सांगण्यासाठी त्याची जाणीव करून देण्यासाठी जागतिक गाजर दिवस देखील साजरा केला जातो.
गाजरात अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. हे फायदे जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी दरवर्षी ४ एप्रिल हा दिवस जगभरात जागतिक आंतरराष्ट्रीय गाजर दिवस म्हणून साजरा केला जातो. काय आहेत गाजराचे फायदे? जाणून घ्या
डोळ्यांसाठी फायदेशीर
गाजरांमध्ये व्हिटॅमिन ए आणि अल्फा-कॅरोटीन आणि बीटा-कॅरोटीन ही दोन कॅरोटीनॉइड्स मुबलक प्रमाणात असतात. गाजरात फक्त एकच नाही तर अनेक पोषक तत्व असतात जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असतात. गाजरात आढळणारे अँटीऑक्सिडंट ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन डोळ्यांसाठी खूप फायदेशीर मानले जातात. हे डोळ्यांच्या रेटिना आणि लेन्ससाठी चांगले आहे.
साखरेच्या व्यवस्थापनास उपयुक्त
गाजरात भरपूर फायबर असते जे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. कच्च्या किंवा किंचित शिजलेल्या गाजरांमध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, मधुमेही रुग्ण गाजर खाऊ शकतात.
वजनावर नियंत्रण राहते
गाजराचे वैशिष्ट्य म्हणजे यात तब्बल ८८ टक्के पाणी असते. त्यात मुबलक फायबर असते. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. जर दररोज एक गाजर खाल्ले तर दीर्घकाळ पोट भरलेले वाटते.
बीपीचा त्रास असल्यास
बीपी जास्त असेल तर दररोज एक गाजर खाणे लाभदायक ठरते. गाजरात पोटॅशियमचे प्रमाण खूप जास्त असते. ज्यामुळे बीपी कंट्रोलमध्ये ठेवण्याचे काम करते.
पचन सुधारणे
गाजरात भरपूर प्रमाणात फायबर असते. हे फायबर पचन सुधारण्यास मदत करते. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो.
रोग प्रतिकारशक्ती वाढते
गाजरात व्हिटॅमिन ए, सी आणि ई असल्यामुळे ते रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
हृदयासाठी फायदेशीर
गाजरामध्ये पोटॅशियमचे प्रमाण भरपूर असल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामुळे हृदयविकाराचा धोका बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकतो.
केस आणि त्वचेसाठी फायदेशीर
गाजरमध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई असल्यामुळे ते केस निरोगी आणि मजबूत बनवण्यास मदत करते. केसांच्या तक्रारी दूर होतात.
हाडांसाठी आहे उत्तम
गाजरमध्ये व्हिटॅमिन के मुबलक प्रमाणात असते. हे हाडे मजबूत करण्यास मदत करते. गाजरामुळे हाडांचे आरोग्य टिकून राहते.
मेंदूसाठी आहे फायदेशीर
गाजरामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट मेंदूचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. अल्झायमरसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठीही गाजर अतिशय उपयुक्त आहे.
ऊर्जा टिकवते
थंडीत गाजराचे सेवन केल्याने शरीरात ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे शक्ती टिकून राहते आणि आपण अधिक कार्यक्षम होतो.
(टीप : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहे. कोणत्याही उपायांचा अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)