डोळे आपल्या मनुष्याच्या पंचेद्रियांपैकी अतिशय महत्वाचा अवयव आहे. या डोळ्यामुळेच आपल्याला सर्व दिसते. डोळे नसते तर काय झाले असते, याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. डोळयांमुळेच तर आपण हे सुंदर जग बघू शकतो. आज आपण जर पाहिले तर लक्षात येईल की, प्रत्येक व्यक्ती नोकरी करते आणि तिथे ती लॅपटॉप, कॉम्पुटरसमोरच असते. याला अजून जोड आहे ती मोबाइलची. या दोन गोष्टी डोळयांचे आरोग्य बिघडवण्यास पूरक ठरत आहे.
सोबतच आपल्या चुकीच्या जीवनशैलीचा, आहाराचा देखील मोठा परिणाम डोळ्यांवर होतो. त्यामुळे आपले डोळे अतिशय उत्तम राहावे त्यांना कोणताही त्रास होऊ नये असे सगळ्यांनाच वाटत असते. ऑफिस काम तर आपण कमी करू शकत नाही किंवा सोडू शकत नाही. मग डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी आपण चांगला सकस आहार तर नक्कीच घेऊ शकतो. जेवणातील काही पोषक तत्व हे डोळ्यांसाठी आवश्यक असतात. ते हानीकारक प्रकाश किरणांपासून डोळ्यांचे रक्षण करतात, आणि वयानुसार होणाऱ्या आजारांना दूर ठेवतात.मग यासाठी कोणता आहार योग्य आहे, ते आपण जाणून घेऊया.
जीवनसत्व ई
जीवनसत्व ई च्या अभावामुळे अनेकदा डोळ्यांचे विविध विकार होऊ शकतात. यात अंधुक दिसणे, आंधळेपणा, मोतीबिंदू आदींचा समावेश आहे. म्हणूनच आहारात जीवनसत्व ई असलेले पदार्थ खाणे चांगले असते. जीवनसत्व ई असलेल्या पदार्थांमध्ये बदाम, अक्रोड, शेंगदाणे, सूर्यफुलाच्या बिया अळशीचे तेल, पालक, ब्रोकोली, ऑलिव्ह तेल आदी अनेक पदार्थांचा समावेश होतो.
जीवनसत्व सी
जीवनसत्व सी एक चांगले अँटीऑक्सिडंट असून, त्यामुळे आपल्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. पुरेशा प्रमाणात जर सी जीवनसत्व आहारात असेल तर मोतीबिंदू होण्यापासून बचाव होऊ शकतो. व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असलेल्या पदार्थांमध्ये ब्रोकोली, मोड आलेली कडधान्ये, मिरे, हिरव्या पालेभाज्या, आंबट फळे, आणि पेरू यांचा समावेश होतो.
ओमेगा
ओमेगा-3 फॅटी अॅसिड जर योग्य प्रमाणात असेल तर डोळे कोरडे होण्यापासून सुटका मिळते. डोळ्यांच्या स्नायूंची हानी ही आजच्या घडीची एक मोठी समस्या आहे. त्यामुळे अंधुक दिसू लागते. तर डोळ्यात योग्य प्रमाणात अश्रू निर्माण न झाल्याने डोळे कोरडे होतात त्यामुळे डोळ्याचा ओलावा कमी होऊन चिकटपणा कमी होतो. मासे, टूना मासे, शेंगदाणे, अळशीचे तेल , कॅनोला तेल यात ओमेगा-3 फॅटी अॅसिडचे प्रमाण अधिक असते.
जीवनसत्व ए
जीवनसत्व ए हे मेदामध्ये विरघळणारे जीवनसत्व आहे. जीवनसत्व ए ला रेटिनोलसुद्धा म्हणतात, कारण ते डोळ्यांचा पडदा बनवणाऱ्या रंगद्रव्यांच्या निर्मितीसाठी फायदेशीर असते. आंधळेपणाचे सगळ्यात सामान्य कारण जीवनसत्व ए चा अभाव आहे. गाजर, बीट, रताळे, मटार, टोमॅटो, हिरव्या पालेभाज्या, आंबे, टरबूज, पपई, पनीर, राजमा, अंडे, बिन्स यामध्ये ए जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते.
जस्ता
जस्ता हे डोळ्यात असणारे महत्त्वाचे पोषक द्रव्य आहे. हे मेलानिनच्या निर्मितीत मदत करते जे डोळ्यांच्या रंगद्रव्यांपैकी एक आहे. जस्ताच्या कमतरतेमुळे रातांधळेपणा होऊ शकतो. रेड मीट आणि कोंबडी हे जस्ताचे त्याचे उत्तम स्त्रोत आहेत. तसेच ते नैसर्गिकरित्या शेंगदाणे , लसूण , तीळ , राजमा, डाळी सोयाबीन, अळशी, बदाम, गहू, अंड्यातील बलक यात आढळून येते.
लाल मिरची
लाल मिरचीमध्ये प्रति कॅलरी सर्वात जास्त व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी तुमच्या डोळ्यातील रक्तवाहिन्यांसाठी उत्तम आहे आणि यामुळे मोतीबिंदू होण्याचा धोका कमी होऊ शकतो. लाल मिरचीमधून व्हिटॅमिन सी मिळते, तसेच स्ट्रॉबेरी, फ्लॉवर यांसारख्या विविध पदार्थांमधूनही ते मिळते
हिरव्या पालेभाज्या
पालक सारख्या हिरव्या पालेभाज्याही शरीरासाठी आणि डोळ्यांसाठी चांगल्या असतात. यामध्ये अँटिऑक्सिडंट घटक असतात.
========
हे देखील वाचा : लाल बहादूर शास्त्री जयंती विशेष
========
गाजर
गाजर, रताळे, संत्री यांमध्ये बीटा-कॅरोटीन जास्त असते. गाजरामध्ये व्हिटॅमिन ए असते.
बीन्स
जर तुम्ही शाकाहारी असाल, तर तुमच्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी सर्वोत्तम खाद्यपदार्थांपैकी एक म्हणजे बीन्स. यामध्ये कमी फॅट्स, फायबर, झिंक आणि विविध जीवनसत्त्वे असतात.