भगवान शंकराचे भक्त हे श्रावण महिन्याच्या प्रतीक्षेत असतात. यावेळी श्रावण महिना अधिक आल्यानं आता चार सोमवार ऐवजी आठ सोमवारी भगवान शंकराची पुजा या शिवभक्तांना करता येणार आहे. या सर्वांना कावड यात्रा कधी सुरु होणार याची उत्सुकता असते. आता या सर्वांसाठी आनंदाची बातमी असून कावड यात्रेचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यंदा ही कावड यात्रा 4 जुलैपासून सुरू होणार असून 31 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. शिवभक्तीचा हा महिना अतिशय शुभ मानला जातो. यावेळी भगवान शंकराला अभिषेक, रुद्राभिषेक, जलाभिषेक, गंगाजलाचा अभिषेक केला जातो. यासोबतच भाविक गंगेतून कावड आणून शिवजींना गंगाजल अर्पण करतात. या कावड यात्रेसाठी भाविक अत्यंत कठीण नियम पाळतात आणि भगवान शंकराची सेवा करतात. (Kavad Yatra)
यावर्षी कावड यात्रा (Kavad Yatra) 4 जुलै 2023, मंगळवारपासून सुरू होणार आहे. 31 ऑगस्ट 2023 रोजी गुरुवारी कावड यात्रा (Kavad Yatra) समाप्त होईल. या दोन महिन्यांतील विशेष दिवशी भगवान शंकराचे भक्त त्यांना जलअभिषेक करु शकणार आहेत. त्यासाठी तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार 15 जुलै 2023, शनिवार रोज शिवरात्री, प्रदोष व्रत आहे. 30 जुलै रोजी प्रदोष व्रत आहे. तसेच 13 ऑगस्ट रोजीही प्रदोष व्रत आहे. 14 ऑगस्ट रोजी सोमवार असून शिवरात्री आहे. 28 ऑगस्ट रोजीही सोमवार असून प्रदोष व्रत आहे. या सर्व तारखा कावड यात्रेकरुसाठी अत्यंत पवित्र अशा आहेत.
कावड यात्रा (Kavad Yatra) ही भगवान शिवाची पूजा करण्याचा एक मार्ग आहे. शिवभक्त महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कावड घेऊन यात्रेला निघतात. पायी चालून गंगेचे पाणी आणतात आणि भगवान शिवाला हे जल अर्पण करतात. संपूर्ण श्रावण महिना हा सर्वात पवित्र मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराला जल अर्पण केल्यास भगवना शंकराची कायम कृपा राहते, अशी शिवभक्तांची धारणा आहे.
दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये चार-पाच सोमवार असतात. पण यावेळी अधिकचा श्रावण महिना आल्यामुळे आता आठ सोमवार शिवभक्तांना मिळणार आहेत. श्रावणमध्ये पूर्ण आठ सोमवार असतील. यावेळी शिवभक्तांना दोन महिने शिवपूजेसाठी वेळ मिळणार आहे. शिवभक्तीचा हा महिना अतिशय शुभ महिना आहे. त्यामुळे या काळात भगवान शंकराचा अभिषेक करणे उत्तम मानले जाते. रुद्राभिषेक, जलाभिषेक, गंगेच्या पाण्याने अभिषेक केल्यास उत्तम फळ मिळते, अशी भावना शिवभक्तांमध्ये आहे. भगवान शिवाला या विशेष तिथींना कावड जल भक्त अर्पण करतात. कोरोना महामारीमुळे या कावड यात्रेवर (Kavad Yatra) बंदी घालण्यात आली होती. आता ही बंदी दूर झाल्यामुळे शिवभक्तांमध्ये आनंद आहे.
=======
हे देखील वाचा : चीन देश बेरोजगारीच्या दिशेने…
======
कावड म्हणजे बांबू किंवा लाकडाची काठी असते. ही काठी रंगीबेरंगी ध्वज, फुलांनी सजलेली असते आणि तिच्या दोन्ही टोकांना गंगाजलाने भरलेले कलश असतात. ही कावड यात्रा (Kavad Yatra) करताना हे भाविक कठोर नियमांचे पालन करतात. या यात्रेदरम्यान भाविक सात्विक भोजन सेवन करतात. संपूर्ण पायी होणारी ही यात्रा अनवाणी केली जाते. विशेष म्हणजे, हे कावड जमिनीवर ठेवले जात नाहीत. जमिनीला कावड ठेवले तर ते गंगाजल भगवान शिवाला अर्पण करता येत नाही. त्यामुळे कावडधारी विश्राम करायचा असेल तर ही कावड एखाद्या झाडाला अडकवतात आणि मगच विश्राम करतात. गंगा, नर्मदा, शिप्रा आदी नद्यांमधून गेतलेले पाणी भगवान शिवाला अर्पण करण्यात येते. यादरम्यान हे शिवभक्त भोलेनातांच्या मंत्रांचा अखंड जप करीत असतात.उत्तराखंडमध्ये, अशा कावड यात्रा मोठ्याप्रमाणात काढली जाते. तसेच देशभरातून येथे शिवभक्त जातात आणि हरिद्वार, गोमुख, गंगोत्री येथून गंगेचे पाणी आपापल्या कावडीमध्ये घेऊन या भागातील पवित्र शिवलिंगांना अर्पण करतात. मध्यप्रदेशमध्येही अशा कावडीयांची गर्दी होते. उज्जैनमधील महाकालेश्वराच्या दर्शनासाठी आणि देवाला अभिषेक करण्यासाठी कावडीयांची गर्दी होते. पौराणिक मान्यतेनुसार, गंगेच्या तीरावरूनच भगवान रामाने कंवर भरून प्रथमच भोलेनाथला गंगाजल अर्पण केले होते. त्याच परंपरेतील ही यात्रा आजही भाविक मोठ्या भक्तीभावानं करीत आहेत.
सई बने