Home » केम छो काश

केम छो काश

by Team Gajawaja
0 comment
Kashyap Patel
Share

अमेरिकेच्या निवडणुकीची आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची सध्या जगभर हवा आहे. ट्रम्प यांचा हा विजय ऐतिहासिक आहे. कारण अमेरिकेत राष्ट्रपतीपदाबरोबरच संसदेची दोन्ही सभागृहे, सिनेट आणि हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हसाठीही निवडणुका झाल्या आहेत. सिनेट हे संसदेचे वरचे सभागृह असून निकालांनुसार रिपब्लिकन पक्षाला 54 जागा मिळाल्या आहेत. या बहुमतामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना महाभियोग आणि परदेशी करारांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांना मंजूरी देण्याचा किंवा नामंजूर करण्याचा अधिकार मिळाला आहे. याबरोबरच डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या प्रशासनातील अधिकारीही निवडू शकणार आहेत. ट्रम्प आता सुरक्षा यंत्रणामधील अधिकारीही स्वतःच्या मर्जीतील निवडू शकणार आहेत. या सर्वात काश हे नाव सर्व अमेरिकेत चर्चेत आहे. काश म्हणजे, कश्यप पटेल. मुळचे गुजरातचे असणारे कश्यप पटेल हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या विश्वासूंपैकी एक आहेत. कश्यप हे नेहमी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी काहीही असे विश्वासू बोल आपल्या मित्रपरिवारात व्यक्त करतात. (Kashyap Patel)

ट्रम्प याआधीही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, तेव्हा त्यांना महत्त्वाची जबाबदारी मिळाली होती. आताही ट्रम्प विजयी झाल्याबरोबर त्यांनी आपल्या विश्वासू साथीदारांना एकत्र करायला सुरुवात केली आहे. यात कश्यप पटेल यांचाही समावेश आहे. तयार रहा, आपल्याला महत्त्वाची जबाबदारी पार पाडायची आहे, असा निरोप त्यांनी कश्यप पटेल यांना पाठवला आहे. ही जबाबदारी म्हणजे, सीआयए या अमेरिकन गुप्तचर संस्थेचे प्रमुख पद असल्याचा अंदाज अनेकांचा आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प नव्या वर्षात शपथ घेणार आहेत. पुढच्या चार वर्षांच्या कालावधीसाठी ते व्हाईट हाऊसमध्ये प्रवेश करणार आहेत. ट्रम्प शपथविधी आधी त्यांची टीम लवकरच निवडणार आहेत. तसेच ट्रम्प यांचे नवीन मंत्रिमंडळ आणि प्रशासनातील इतर उच्च अधिकारी निवडण्याची प्रक्रिया सुरू होणार असून यामध्ये कश्यप ‘काश’ पटेल यांचे नाव चर्चेत आहे. ट्रम्पसाठी काहीही करण्यासाठी प्रसिद्ध असलेले व्यक्ती म्हणजे कश्यप पटेल यांचे नाव घेतले जाते. हेच कश्यप पटेल अमेरिकेच्या सीआयए चे प्रमुख होण्याची शक्यता आहे. सीआयए ही अमेरिकेची गुप्तचर संस्था आहे. याच गुप्तचर संस्थेने लादेनसारख्या दहशतवाद्याला पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये ठार करण्यास मोठी माहिती पुरवली होती. (International News)

मुळचे गुजरातमधील पटेल कुटुंब युगांडामध्ये स्थायिक झाले आहे. कश्यप पटेल यांचे बालपणही युगांडामध्येच गेले. 1970 च्या दशकात त्यांचे वडील अमेरिकेला गेले आणि स्थायिक झाले. कश्यप पटेल यांचा जन्म 1980 मध्ये गार्डन सिटी, न्यूयॉर्क येथे झाला. शाळेत एक हुशार विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी कायद्याचा प्राथमिक अभ्यास केल्यावर ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन फॅकल्टी ऑफ लॉमधून आंतरराष्ट्रीय कायद्याचे प्रमाणपत्रही घेतले. शिक्षणानंतर कश्यप पटेल यांनी कार्यवाहक संरक्षण सचिव ख्रिस्तोफर मिलर यांचे माजी चीफ ऑफ स्टाफ म्हणून काम करण्यास सुरुवात केली. राष्ट्रपतींचे उप सहाय्यक आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत दहशतवादविरोधी वरिष्ठ संचालक म्हणूनही काम करायची संधी त्यांना मिळाली. यामुळे त्यांचा अमेरिकेतील राजकारणाचा जवळचा संबंध आला. अन्य कुठल्याही अध्याक्षांपेक्षा त्यांचे आणि डोनाल्ड ट्रम्प यांचे विचार लगेच जुळले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात कश्यप पटेल यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. (Kashyap Patel)

======

हे देखील वाचा : कॅसिनो ऑपरेटर ते राष्ट्रपती !

=======

त्यांनी अल-बगदादी आणि कासिम अल-रिमी यांसारख्या अल-कायदा नेत्यांचा खात्मा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कश्यप पटेल यांचा धाडसी स्वभाव ट्रम्प यांना आवडतो. अतिशय शांत, चाणाक्ष आणि आपल्या देशाच्या शत्रूंचा नायनाट करण्यासाठी सदैव तयार, असे वर्णन डोनाल्ड ट्रम्प कश्यप पटेल यांचे करतात. त्यामुळेच ट्रम्प अतिशय गुप्त आणि कठिण कामगिरीसाठी कश्यप पटेल हे नाव पुढे करतात. त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि गुप्तचर विषयक सदनाच्या स्थायी निवड समितीचे वरिष्ठ सल्लागार म्हणूनही काम केले आहे. सरकारी वकील म्हणून कश्यप पटेल यांनी राज्य आणि फेडरल कोर्टात खून, अंमली पदार्थांची तस्करी यासारखे खटले लढवले आहेत. वास्तविक ट्रम्प यांनी पटेल यांना सीआयएचे उपसंचालक म्हणून नियुक्त करण्याची योजना आखली होती. परंतु त्यांना विरोध झाला. त्यावेळी सिनेटमध्ये ट्रम्पना बहुमत नव्हते. पण आता हेच बहुमत ट्रम्पच्या बाजुने असल्यामुळे कश्यप पटेल हे सीआयएचे उपसंचालक नाही तर संचालक म्हणून पदभार स्विकारणार हे निश्चित मानण्यात येत आहे. (International News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.