असे म्हणतात की समाजात काहीतरी नवीन बदल घडवायचा असेल तर त्यासाठी स्वतःला खूप संघर्ष करावा लागतो. अथक परिश्रम आणि संघर्षानंतर समाज आपली मेहनत स्वीकारतो.
अशीच काहीशी गोष्ट सध्या सहजपणे चालवल्या जाणाऱ्या गाडीच्या बाबतीत ही झाली होती. आत्ता चालवली जाणारी सर्वसामान्यांच्या हातातली गाडी सगळ्यात पहिल्यांदा रस्त्यावरती आणण्यासाठी खूप मोठा संघर्ष करावा लागला होता.
अनेकांनी याला काळ्या जादूची उपमा दिली होती. तर अनेकजण पहिली गाडीची ट्रायल करणाऱ्या व्यक्तीवर थुंकले होते. पण यासर्वांवर मात करत जी गाडी बाजरात आली त्यागाडीने आज औद्योगिक क्षेत्रात नवी क्रांती घडवली.
आज आपण याच जगातल्या पहिल्या गाडीची संघर्ष कथा जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात जगातल्या पहिल्या मोटारगाडीचा शोध कसा लागला ते!

ही गोष्ट आहे १८व्या शतकातली, जेव्हा सर्वजण प्रवासासाठी घोडागाडी, बैलगाडी किंवा सायकलचा वापर करत होते. तेव्हाच जर्मनीतील मॅन्हाईम शहरात राहणारा एक अभियांत्रिकी माणूस स्वयंचलित वाहन बनवण्याचे स्वप्न बघत होता.
त्यासाठी त्याने तशी पाऊलेही उचलायला सुरुवात केली होती. मात्र त्याच्यासमोर सर्वात मोठं आव्हान होत ते म्हणजे आर्थिक परिस्थितीचे. पण हे संकटही त्याच्या पत्नीने हुंड्यात मिळालेले पैसे देऊन दूर केले. आणि तिथून पुढे गाडी तयार करायला सुरुवात झाली.
अर्थातच ही गोष्ट आहे जगातली सगळ्यात पहिली स्वयंचलित मोटार गाडी बनवणाऱ्या कार्ल बेंझ (Karl Benz) आणि त्यांची पत्नी बर्था बेंझ यांची. असे म्हटले जाते की २९ जानेवारी १८८६ रोजी कार्ल बेंझ यांना जगातील पहिले ऑटोमोबाईलचे पेटंट मिळाले होते. पण खऱ्या अर्थाने गाडी तयार ती ३ जुलै १८८६ रोजी.
कार्ल बेंझ यांनी तयार केलेली गाडी अगदीच साधी होती. त्याला चुक-चुक असे आवाज करणारे, धूर सोडणारे दोन हॉर्सपावरचे इंजिन होते. तर गाडीला लाकडी चाके आणि लाकडी फ्रेम होती. त्यामुळे ही गाडी दिसायला घोडागाडी सारखी होती पण ह्या गाडीला घोडा मात्र नव्हता.
कार्ल बेंझ यांनी आपल्या बायकोने दिलेल्या पैशातून गाडी तर तयार केली होती पण त्यांना त्यांची गाडी चालेल का? यावर विश्वास नव्हता. तसेच त्यांच्या मनात त्याकाळी असणाऱ्या अंधश्रध्देची भीती सुद्धा होती. कारण त्याकाळी बिना घोड्याची गाडी पळताना दिसली, तर लोक घाबरतील आणि लोकांना हे सैतानाच काम आहे असे वाटेल याची भीती कार्ल बेंज यांना होती.
यासर्वात कार्ल बेंझला मुख्य भीती होती ती म्हणजे समाज एवढ्या मोठ्या बदलाला स्वीकारेल का… की विरोध करेल… याची. त्यामुळे गाडी तयार करूनही कार्ल बेंझ यांनी स्वतःची गाडी तब्बल २ वर्ष घरच्या गॅरेजमध्येच ठेवली होती.
आपल्या नवऱ्याने अथक परिश्रमाने गाडी तयार केली पण केवळ काही अडचणीमुळे ती गेली दोन वर्षे एका ठिकाणी उभी आहे हे बघून कार्ल बेंझ यांची पत्नी बर्था बेंझ यांची प्रचंड चिडचिड होत होती.
/inventor-karl-benz-sitting-on-benz-motorwagen-514911328-5c2137a6c9e77c00015a787c.jpg)
मग काय, १८८८ मध्ये एकदा कार्ल बेंझ कामानिमित्त बाहेरगावी गेले असता, बर्थाने गॅरेज मधली गाडी बाहेर काढायची असं ठरवलं. आणि ती गाडी लोकांच्या सहज नजरेत येईल अशा ठिकाणी प्रवास करायचे ठरवले.
मात्र या सगळ्यात मोठी अडचण होती ती म्हणजे, रस्त्यांची माहिती असण्याची! बर्थाला आपल्या माहेरी जाण्याच्या रस्त्याव्यतिरिक्त दुसरा कोणताच रस्ता माहीत नव्हता. त्यामुळे तिने पहिला गाडीचा प्रवास आपल्या माहेरी करण्याचा ठरवला.
बर्था बेंझचे सासर म्हणजे मॅन्हाईम आणि तिचे माहेर म्हणजे फॉर्झएम. मग काय… असा प्रवास तिने करायचा ठरवला. साधारणतः हे अंतर ९७ किलोमीटर भरत होते. पण तरीही बर्था मागे हटल्या नाहीत.
हा प्रवास त्यांनी आपल्या नवऱ्याच्या नकळत दोन मुलांना घेऊन केला. या प्रवासात त्यांना अनेक अडथळे आले. यात सर्वात मोठा अडथळा म्हणजे त्याकाळी सिमेंट काँक्रीटचे किंवा डांबरी रस्ते नव्हते. त्यामुळे त्यांना गाडी चालवायला रस्ता शोधावा लागे.
वाटेत कुणी तिच्या या गाडीकडे पाहून भारावून जायचे. तर कुणाला बिना घोड्याची गाडी चालतेय यावर विश्वासच बसायचा नाही. अनेकजण याला काळी जादू म्हणायचे. तर कित्येकजण बर्थाकडे बघून चेटकीण चेटकीण म्हणून अंगावर थुंकायचे व तिचा रस्ता अडवायचे.
त्यात कार्लच्या गाडीचे तांत्रिक बिघाड बर्थाच्या प्रवासात व्यत्यय आणत होते. या प्रवासात कधी इंजिन बिघडले, एखादा वॉल्व तुटला आणि कधी इंधनच संपले. मात्र तिने खंबीरपणे उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करत आपले मार्गक्रमण सुरूच ठेवले.
अशा अनेक संकटावर मात करून बर्था बेंझ आपल्या माहेरी फॉर्झएमला पोहचली. तिथे तिने काहीवेळ विश्रांती केली, आणि लगेचच ती आपल्या सासरी मॅन्हाईम यायला निघाली. त्यावेळी तिने त्या गाडीने ९७+९७=१९४ किलोमीटरचे अंतर एका दिवसात पार केले होते.
सासरी आल्यानंतर कार्ल बेंझला आपला गाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याचे कळले. त्यांना खूप आनंद झाला. पण या ट्रायलनंतर बर्थाने गाडीत अनेक बदल केले. यामध्ये तिने गाडीत लाकडी ब्रेकच्या ऐवजी लेदर ब्रेक पॅड, कार मधले इन्सुलेटेड वायरिंग, फ्युएल लाईन डिझाईन इत्यादीचा शोध लावला.
अशा पद्धतीने जगातली पहिली गाडी कार्ल बेंझने जरी बनवली असली तरीदेखील त्याच्या या गाडीला बर्था बेंझने जन्म दिला. आणि पुन्हा एकदा एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो हे सिद्ध झाले.
– निवास उद्धव गायकवाड