भारतातील महिला सध्या प्रत्येक क्षेत्रात आपले नाव कोरत आहे. राजकरण असो किंवा औद्योगिक, क्रिडा क्षेत्र असो तेथे ही तिची मुख्य भुमिका दिसून येते. इतिहासात अशा काही महिला होत्या ज्यांच्यामुळे आजच्या तरुणाईला आयुष्यात यशाच्या शिखरावर पोहचण्यासाठी प्रेरणा देतात. त्याच महिलांपैकी एक कल्पना चावला (Kalpana Chawla) होती. कल्पना चावला भारताची पहिली महिला होती जिने अंतराळात उड्डाण केले होते. तिच्या या कामगिरीमुळे महिलांचा आत्मविश्वास वाढला गेलाच पण देशाचे नाव ही तिने उंचावले. परंतु तिचा अंतराळवीर होण्याचा प्रवास हा काही सोप्पा नव्हता. तर पाहूयात तिची प्रेरणादायी कथा.
हरियाणातील करनाल मधील जन्म
कल्पना चावलाचा जन्म हरियाणातील करनालमध्ये १७ मार्च १९६२ रोजी झाला होता. कल्पना ही घरात सर्वाधिक लहान होती. तिचे शिक्षण करनाल मध्येच टॅगोर बाल निकेतन सेकेंडरी स्कूल मध्ये झाले. आधीपासूनच कल्पनाला विज्ञान विषय खुप आवडायचा. तिला फ्लाइट इंजिनिअर व्हायचे होते. आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने पंजाब मधील इंजिनिअरिंग महाविद्यालायत प्रवेश घेतला. तेथे तिने एयरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत डिग्री संपादन केली. डिग्री दरम्यान तिला काही नोकरीसाठी विचारले ही गेले. परंतु पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी ती अमेरिकेत गेली.

पीएचडी दरम्यान अंतराळात जाण्याचा घेतला निर्णय
अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सास मध्ये कल्पना चावलाने पुढील शिक्षण घेतले. दोन वर्ष शिक्षण घेतल्यानंतर तिने एयरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये मास्टर डिग्री मिळवली. वर्ष १९८९ मध्ये तिने याच विषयात मास्टरची डिग्री मिळवत १९९८ मध्ये एयरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पीएचडी केली. पीएचडी दरम्यानच कल्पनाने ठरवले की, तिला अंतराळात उड्डाण करायचे आहे. तिच्याकडे कमर्शियल पायलटचा परवाना सुद्धा होता. त्याचसोबत कल्पनाच सर्टिफाइड फ्लाइट इंस्ट्रक्टर ही बनली होती. त्याच दरम्यानच्या कालावधीत तिने फ्रांन्सच्या जान पियरे यांच्याशी लग्न केले. ते सुद्धा एक फ्लाइट इंस्ट्रक्टर होते. (Kalpana Chawla)
जेव्हा नासाने दिला होता नकार
१९९३ मध्ये कल्पनाने पहिल्यांदाच नासासाठी अर्ज केला होता. मात्र नासाने त्यावेळी तिला नाकारले. त्यानंतर १९९५ मध्ये कल्पनाला एक अंतराळवीर म्हणून निवडले गेले आणि तिची ट्रेनिंग ही सुरु झाली होती. १९९८ मध्ये कल्पना चावलाने अंतराळात उड्डाण केले. या प्रवासादरम्यान कल्पनाने ३७२ तास घालवत इतिहासाच्या पानांवर आपले नाव कोरलेच. त्याचसोबत देशाची मान ही गर्वाने उंचावली.
हे देखील वाचा- ज्येष्ठ इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा यांचा ‘जीवनप्रवास’
आणखी एका अंतराळ प्रवासासाठी कल्पनाची केली होती निवड
पहिले उड्डाण यशस्वी झाल्यानंतर २००० मध्ये दुसऱ्या अंतराळ उड्डाणासाठी कल्पनाची निवड करण्यात आली होती. परंतु मिशन हे तीन वर्ष उशिराने झाले आणि ते २००३ मध्ये लॉन्च करण्यात आले. १६ जानेवारी २००३ मध्ये कल्पनाने कोलंबिया फ्लाइट STS 107 मधून उड्डाण केले. पण १ फेब्रुवारी २००३ रोजी अंतराळ यान पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश करताना त्याचा अपघात झाला. याच दिवशी कल्पना चावला यांच्यासह मिशनवर असलेल्या ७ जणांचा ही दुर्घटनेत मृत्यू झाला.