Home » रॉजर फेडररच्या कारकिर्दीमध्ये एकच अडथळा सतत येत राहिला, तो म्हणजे….

रॉजर फेडररच्या कारकिर्दीमध्ये एकच अडथळा सतत येत राहिला, तो म्हणजे….

by Team Gajawaja
0 comment
Roger Federer
Share

खेळाडूंमधील गुडबॉय कोण…हा प्रश्न कोणत्याही क्रीडा पत्रकाराला विचारला, तर पहिलं नाव असेल रॉजर फेडरर (Roger Federer) या टेनिसपटूचे. अर्थातच लाखो-करोडो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा आणि अब्जावधी मालमत्तेचा मालक असलेला आणि प्रसिद्धीपासून दूर राहणार रॉजर आपल्या साध्या राहणीमुळेही त्याच्या खेळाएवढाच प्रसिद्ध आहे.  

जागतिक दर्जाचा व्यावसायिक टेनिसपटू, फेडरर सध्या पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर आहे. आठ विम्बल्डन, सहा ऑस्ट्रेलियन ओपन, पाच यूएस ओपन आणि एक फ्रेंच ओपन स्पर्धांच्या विजेतेपदाच्या ट्रॉफीज त्याच्या नावावर आहेत. 

रॉजर फेडरर (Roger Federer) अत्यंत कुटुंबवत्सल आहे. प्रेमळ पती आणि पिता म्हणून तो ओळखला जातो. पत्नी मिर्का, दोन जुळ्या मुली आणि दोन जुळे मुलगे यांनाही फेडरर आपल्या खेळाएवढाच वेळ देतो. टेनिसकोर्टवर आपल्या प्रतिस्पर्ध्याबरोबर आक्रमकपणे खेळणारा रॉजर अत्यंत हळव्या मनाचा आहे. रॉजर फेडरर 8 ऑगस्ट रोजी 41 वर्षाचा होतोय. टेनिसमधील या एव्हरग्रीन खेळाडूचा जीवनप्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. 

8 ऑगस्ट 1981 रोजी बासेल, स्वित्झर्लंड येथे रॉजरचा जन्म झाला. रॉबर्ट फेडरर हे त्याचे वडील जर्मन तर आई लिनेट फेडरर दक्षिण आफ्रिकेतील. फेडररला एक डायना नावाची मोठी बहिण आहे. फेडरर कुटुंब भाषा बहुल आहे. त्यामुळे रॉजर फ्रेंच, जर्मन, स्विस, इंग्रजी आणि इटालियन भाषा अस्खलितपणे बोलतो.  237 आठवडे व्यावसायिक टेनिसपटू म्हणून प्रथम क्रमांकावर राहण्याचा विक्रम असलेला रॉजरनं टेनिस आपल्या मुळ गावापासून सुरु केलं. त्याच्या मुळ गावी, बेसल येथे होणाऱ्या स्थानिक टेनिसच्या मॅचमध्ये तो बॉल बॉय  म्हणून काम करायचा. येथूनच या खेळातील बारकावे टिपायला त्यांनी सुरुवात केली.   

असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्सतर्फे जाहीर केलेल्या क्रमवारीत रॉजर जागतिक क्रमवारीत 5 वेळा पहिल्या क्रमांकावर राहिला आहे.  अनेक विक्रम नावावर असणाऱ्या  रॉजरचा या सर्वामागचा संघर्ष मोठा आहे. खरंतर रॉजर जेव्हा व्यावसायिक टेनिसमध्ये उतरला तेव्हा त्याच्यासमोर आणखी दोन तगडे खेळाडू होते. राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच.   

====

हे देखील वाचा – गेल्या 25 वर्षात कोणीही मोडू शकला नाही निलेश कुलकर्णी यांचा ‘तो’ विक्रम…

====

रॉजर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच या तिघांना टेनिसमध्ये बिग थ्री म्हणून संबोधले गेले.  हे तिघे कित्येकवेळा आमनेसामने आले आणि त्यांचे सर्व सामने प्रेक्षणीयही ठरले आहेत. राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच या दोघांवर मात करत, रॉजर 2018 मध्ये वयाच्या 36 व्या वर्षी जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमाकांवर विराजमान झाला. या दरम्यान फेडररने 17 ग्रँडस्लॅम एकेरी विजेतेपदे (4 ऑस्ट्रेलियन ओपन, 7 विम्बल्डन, 5 यूएस ओपन) जिंकली. त्याने 4 टेनिस मास्टर्स कप विजेतेपद, 16 एटीपी मास्टर्स मालिका आणि एका ऑलिम्पिक दुहेरी सुवर्णपदकांवर आपले नाव कोरले. 

सलग 10 ग्रँडस्लॅम फायनल (2005 विम्बल्डन स्पर्धेपासून 2007 यूएस ओपन स्पर्धेपर्यंत) आणि सलग 19 ग्रँड स्लॅम उपांत्य फेरीत असे विक्रम आपल्या नावावर केले.  फेडररने आपल्या टेनिस कारकिर्दीत 20 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. या बाबतीत तो नोव्हाक जोकोविचच्या बरोबरीने आहे, तर राफेल नदाल २१ ग्रँडस्लॅम जिंकून या दोन खेळाडूंच्या पुढे आहे. 

टेनिसमधला हा दादा खेळाडू आपल्या खेळाबरोबर समाजसेवेमध्येही तेवढाच पुढे आहे. खेळातून त्याला प्रचंड संपत्ती मिळाली. पण समाजासाठी काहीतरी करायचं या भावनेने त्याने ‘रॉजर फेडरर फाउंडेशन’ स्थापन केलं. या फाऊंडेशनतर्फे दक्षिण आफ्रिकेतील गरीब मुलांना तो मदत करतो.   

फेडररची (Roger Federer) पत्नी माजी महिला टेनिस असोसिएशन खेळाडू मिरोस्लावा फेडरर ‘मिर्का’ या नावाने प्रसिद्ध आहे. 2000 सालच्या ऑलिम्पिकमध्ये या दोघांची भेट झाली. व्यावसायिक टेनिस खेळाडू असेलेली मिर्का रॅंकीगमध्ये 100 व्या क्रमाकांवर होती. टेनिस क्विन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्टिना नवरातिलोव्हा कडून मिर्काला टेनिस खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळाले होते. पण वारंवार होणाऱ्या दुखापतींनी त्रस्त होऊन तिने टेनिसला रामराम केला.  

रॉजरशी ओळख झाल्यावर तिने काही महिने जनसंपर्क व्यवस्थापक म्हणून काम पाहिलं. 11 एप्रिल 2009 रोजी फेडररच्या ‘वेनकेनहॉफ व्हिला’ या अलिशान व्हिलामध्ये या दोघांचा विवाह संपन्न झाला. आता या दांम्पत्याला मायला रोज व शार्लीन फेडरर या दोन जुळ्या मुली आणि लिओ व लेनार्ट ही दोन जुळी मुलं आहेत. रॉजरच्या प्रत्येक सामन्याला हे अख्खं फेडरर कटुंब उपस्थित असतं. रॉजरची आई आणि आजोबाही त्याच्या प्रत्येक सामन्याला उपस्थिती लावतात.   

रॉजरच्या टेनिसमधील झंझावातामध्ये एकच अडथळा सतत येत राहिला, तो म्हणजे त्याच्या दुखापती.  अत्यंत संयमी खेळ हे रॉजरच्या खेळाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच रॉजरचा सामना हा अनेकदा जास्त वेळ चालतो. यातून दुखापतीही तेवढ्याच होतात. गुडघ्याच्या अनेक शस्त्रक्रियांना त्याला सामोरे जावे लागले आहे. अनेकवेळा गुडघेदुखीमुळे त्याला सामन्यातून माघार घ्यावी  लागली आहे.  पण  रॉजर हे शांत वादळ आहे. या सर्वांतून सावरलेला रॉजर चाळीशीतही तरुणांना लाजवेल अशा जोशात टेनिसकोर्टावर वावरतो. 

 

एका मुलाखतीत त्यांनी वय हे फक्त कागदावर असतं….खेळात नाही…असं स्पष्टपणे  सांगून टिकाकारांची  तोंडं बंद केली होती. 20 ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या फेडररने जुलै 2021 पासून मात्र दुखापतींमुळे एकही टेनिस सामना खेळलेला नाही. पण यातून सावरत आपण पुनरागमनासाठी सज्ज असल्याची घोषणा त्यानं नुकतीच केली आहे.   

दिड वर्षांत गुडघ्यावर तिन शस्त्रक्रिया झाल्यावरही हा खेळाडू आता नव्या इनिंगसाठी तयार झाला आहे.  25 ऑक्टोबरला रॉजर फेडरर (Roger Federer) नव्या उत्साहासह आणि जोशासह टेनिस कोर्टावर उतरणार आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी त्याचे कुटुंब आणि त्याचे लाखो चाहतेही उपस्थित रहाणार आहेत. वय काय आहे, हे विचारणारा हा चाळीशीतील खेळाडू म्हणूनच एव्हरग्रीन गुडबॉय म्हणून ओळखला जातो.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.