निलेश कुलकर्णी व रसिका कुलकर्णी यांनी त्यांच्या ‘आयआयएसएम’ या संस्थेच्या सहयोगाने आपल्या राष्ट्रगीताचा एक सुंदर व्हिडीओ तयार केला आहे. हा व्हिडीओ एका अभिनव संकल्पनेवर आधारित आहे. ‘द स्पोर्ट्स हिरोज’ ही संकल्पना घेऊन तयार करण्यात आलेल्या या व्हिडीओचे हिरो आहेत २०२० सालच्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेचे खरेखुरे हिरो. या स्पर्धेत कौतुकास्पद कामगिरी केलेले ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेमधील विजेते या व्हिडिओमध्ये सहभागी झाले आहेत.
अत्यंत आगळ्यावेगळ्या अशा ‘द स्पोर्ट्स हिरोज’ या संकल्पनेवर आधारित असाच एक व्हिडीओ यापूर्वी सन २०१६ मध्येही तयार करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये भारतीय क्रिकेटमधील खेळाडूंसह बॅडमिंटन व टेनिस स्पर्धेतील खेळाडूंचा समावेश करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये मास्टर -ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह, सुनील गावस्कर, सानिया मिर्झा, धनराज पिल्लई, गगन नारंग, महेश भूपती आणि भाईचुंग भुतिया यांच्यासह क्रीडाक्षेत्रातील अनेक मातब्बर खेळाडूंचा समावेश होता.
डोंबिवली येथे राहणारे निलेश कुलकर्णी स्वतः एक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू होते. सन १९९७-१९९८ सालच्या ‘कोलंबो’ येथील श्रीलंकेविरुद्धच्या क्रिकेट कसोटी सामन्यामध्ये त्यांनी पहिल्याच बॉलवर विकेट घेऊन एक नवा विक्रम प्रस्थापित केला होता. कारकिर्दीच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेट -कसोटी सामन्यात पहिल्याच बॉलवर विकेट घेण्याचा विक्रम करणारे ते भारतातील एकमेव गोलंदाज आहेत. राष्ट्रीय स्तरावर सचिनच्या कॅप्टनशिपखाली मुंबई क्रिकेट संघासाठी त्यांनी अनेक सामने खेळले आहेत. पुढे २०१० साली त्यांनी त्यांनी आपली निवृत्ती जाहीर केली.
खेळ म्हणजे जणू निलेश यांचा श्वास होता. त्यामुळे २०१० साली त्यांनी त्यांची पत्नी रसिका कुलकर्णीसह खेळाशी संबंधित आयआयएसएम (IISM- International Institute of Sports Management) ही शैक्षणिक संस्था स्थापन केली. क्रीडा क्षेत्रातील ही एक नामांकित संस्था असून स्पोर्ट्स मॅनेजमेंट’ या विषयासाठीचे बॅचलर आणि मास्टर्स अभ्यासक्रम अगदी प्लेसमेंट सुविधेसह उपलब्ध आहेत.
=====
हे देखील वाचा: मेजर ध्यानचंद (Dhyan Chand) यांच्या नावाचा गंमतीदार किस्सा तुम्हाला माहितेय का? वाचा सविस्तर
=====
‘द स्पोर्ट्स हिरोज’ या संकल्पनेवर तयार करण्यात आलेल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेमधील विजेते दिसणार आहेत. तसंच या व्हिडिओसाठी श्री. अमिताभ बच्चन यांनी आवाज दिला आहे. त्यांच्या आवाजातील ‘मन मैं है मैदान’ ही कविता ऐकणे म्हणजे रसिकांसाठी जणू पर्वणीच आहे. अभिजित पानसे आणि मंगेश सावंत यांनी या व्हिडिओचे दिग्दर्शन केले आहे.
या व्हिडिओमध्ये नीरज चोप्रा, मनीष नरवाल, सुमित अंतील, प्रमोद भगत, कृष्णा नगर, रवी कुमार दहिया, मीराबाई चानू, निषाद कुमार, योगेश कथुनिया, देवेंद्र झाझारिया, भाविना पटेल, सिहास यथिराग, प्रवीण कुमार, लवलीना बोरगोहेन, पीआर श्रीजेश, हरविंदर सिंग राष्ट्रगीतासह मानवंदना देताना दिसणार आहेत.
यावर्षी आपण २६ जानेवारीला आपला ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करणार आहोत. कलाक्षेत्र आणि खेळामध्येही उत्तुंग कारकीर्द घडवता येते. मात्र त्यासाठी अपार मेहनत घ्यावी लागते. ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेमधील खेळाडूंनी प्रचंड मेहनतीने आपली कारकीर्द घडवली आणि जगाच्या पटलावर भारत देशाचे नाव रोशन केले. त्यांची मेहनत आणि जिद्दीला मानवंदना म्हणून तसंच आजच्या तरुणाईने यामधून प्रेरणा घेऊन स्वतःचे आदर्श भविष्य घडवावे या हेतून हा व्हिडीओ तयार करण्यात आला आहे.
=====
हे देखील वाचा: कपिल देवचे ‘ते’ शब्द भारतीय संघासाठी टर्निंग पॉईंट ठरले, आणि भारताला पाहिला अनपेक्षित विजय मिळाला
=====
व्हिडिओमधील मनाला स्पर्शून जाणारी गोष्ट म्हणजे यामध्ये राष्ट्रगीत सुरु होण्यापूर्वी भारतीय पॅरालिम्पिक कमिटीच्या अध्यक्षा डॉ. दीपा मलिक यांनी राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ उभं राहण्यासाठी केलेलं आवाहन. आपल्या राष्ट्रगीताचा सन्मान आपणच ठेवायला हवा. त्यामुळे आपल्या देशाप्रती तुमचे प्रेम आणि निष्ठा याची जाणीव ठेवून हा व्हिडिओ पाहताना राष्ट्रगीताच्या वेळी कृपया उभे रहा. सार्वजनिक हितासाठी तयार करण्यात आलेल्या या व्हिडीओला तुम्ही आवर्जून शेअर करा. यामुळे खेळाडूंना मानवंदना आणि नवखेळाडूंना नवी उमेद निश्चितच मिळेल.
– मानसी जोशी