Home » सलमान रश्दी: अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या फतव्यानंतर 6 महिन्यांत बदलली होती 56 घरे…

सलमान रश्दी: अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या फतव्यानंतर 6 महिन्यांत बदलली होती 56 घरे…

by Team Gajawaja
0 comment
Share

मुंबईत जन्मलेले आणि ज्यांच्या नावापुढे वादग्रस्त लेखक हे विशेषण कायम लागले त्या सलमान रश्दी (Salman Rushdie) यांच्यावर शुक्रवारी रात्री न्यूयॉर्कमध्ये जीवघेणा हल्ला झाला. थेट मुलाखतीच्या कार्यक्रमात…अगदी चार हजार लोकांच्या समोर एका हल्लेखोराने काही सेकंदात रश्दींवर 15-16 वार केले.  रश्दी यांना त्यानंतर तातडीने एअरलिफ्ट करत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवल्याच्या बातम्या येत असून त्यांचा एक डोळा निकामी होण्याची शक्यता आहे. रश्दी यांनी यापूर्वी अनेकवेळा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.  (British author Salman Rushdie stabbed)

सलमान रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकावरुन बराच वादंग झाला होता. या पुस्तकावर इराणमध्ये 1988 पासून बंदी घालण्यात आली. इराणचे दिवंगत नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी रश्दींची हत्या करणाऱ्या व्यक्तीला 3 दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले होते. या फतव्यानंतर तेहतीस वर्षानी त्यांच्यावर निर्घृण हल्ला झालाय. या फतव्यापासून रश्दी यांना आपले वास्तव्य अनेक ठिकाणी बदलावे लागले. 

सलमान रश्दी (Salman Rushdie)  हे व्यक्तिमत्व कायमच वादात अडकलेले राहिले आहे. किंबहुना जिथे वाद तिथे सलमान रश्दी असंच म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. वयाची पंचाहत्तरी ओलांडलेल्या या वादग्रस्त लेखकाचे वैयक्तिक आयुष्यही असेच वाद-विवादांनी भरलेले आहे.  

सलमान रश्दी यांचा जन्म 19 जून 1947 रोजी मुंबईत ब्रिटिश राजवटीत झाला. सलमान यांच्या वडीलांचे नाव अनीस अहमद रश्दी. नगिन ही त्यांची आई…त्यांचे वडील वकील होते तर आई शिक्षिका.  काश्मिरी मुस्लिम कुटुंबातल्या रश्दी मुंबईमध्ये लहानाचे मोठे झाले. फोर्ट येथील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन शाळेतून ते पुढच्या शिक्षणासाठी इंग्लडाला, केंब्रिजमध्ये गेले. केंब्रिजमधून पदवी घेतल्यानंतर, रश्दी काही काळ त्यांच्या कुटुंबासोबत पाकिस्तानमध्ये राहिले.  

लेखनामुळे वादात सापडलेले रश्दी त्यांच्या विवाहांमुळेही गाजले. रश्दी यांनी चार वेळा लग्न केले आहे. त्यांनी 1976 ते 1987 या काळात ‘क्लेरिसा लुआर्ड’ बरोबर पहिले लग्न केले. त्यांची दुसरी होती पत्नी अमेरिकन कादंबरीकार मारियान विगिन्स. त्यांनी 1988 मध्ये लग्न केले. नंतर रश्दी यांनी एलिझाबेथ वेस्ट बरोबर तिसरा विवाह केला. पद्मा लक्ष्मी या एका भारतीय-अमेरिकन अभिनेत्री, मॉडेल आणि अमेरिकन रियालिटी लिटी-टेलिव्हिजन शो टॉप शेफ हिच्याबरोबर त्यांचा चौथा विवाह झाला आणि नंतर घटस्फोटही.  त्यांच्या चौथ्या पत्नीनं त्यांचा उल्लेख अयशस्वी पती असा केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री रिया सेनसोबत त्यांचे अफेअर असल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या.

1975 मध्ये रश्दी यांचे ‘ग्राइमस’ हे पहिले पुस्तक आले. रश्दीची दुसरी कादंबरी ‘मिडनाइट्स चिल्ड्रन’ 1981 मध्ये आली. या कादंबरीने 1981 मध्ये बुकर पारितोषिक जिंकले. त्यांची चौथी कादंबरी ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ आली आणि रश्दींविरोधात मोठा वाद उभा राहिला. 1989 मध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी त्यांच्या हत्येचा फतवा जाहीर केला. यानंतर ब्रिटीश सरकारने रश्दी यांना पोलिस संरक्षणात ठेवले. पुढची तब्बल 10 वर्षे रश्दींना पोलिस संरक्षण मिळाले. 

1990 साल आपल्यासाठी तुरुंगवासासारखे असल्याचे सलमान सांगतात. 2010 मध्ये अल-कायदा या अतिरेकी संघटनेच्या हिट लिस्टमध्येही सलमान रश्दी यांचे नाव होते. अमेरिकेत आल्यावर आपण मोकळा श्वास घ्यायला लागलो, असे ते आपल्या भाषणात सांगतात. रश्दी यांनी फतव्यानंतर 6 महिन्यांत 56 घरे बदलली, तसेच जोसेफ अँटन हे टोपणनावही धारण केले होते.  कारण या फतव्यानंतर ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ पुस्तकाचे जपानी भाषेत भाषांतर करणाऱ्या ‘हितोशी इगाराशी’ यांची 1999 मध्ये हत्या करण्यात आली.  द सॅटॅनिक व्हर्सेसचे इटालियनमध्ये भाषांतर करणार्‍या ‘एटोर कॅप्रिओलो’ यांच्यावर हल्ला झाला. ऑक्टोबर 1993 मध्ये, कादंबरीचे नॉर्वेजियन प्रकाशक विल्यम नायगार्ड यांना तीन वेळा गोळ्या घालण्यात आल्या.   

=======

हे देखील वाचा – पुस्तकाच्या माध्यमातून लोकांच्या मनावर ताबा मिळवणारी लेखिका एलिना फरांते कोण आहे?

======

आता न्युयॉर्क मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर 75 वर्षीय सलमान रश्दी (Salman Rushdie) पुन्हा चर्चेत आले आहेत. लेखनामुळे वादात सापडत असले, तरी सलमान रश्दी यांना अनेक जागतिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.  त्यामध्ये गोल्डन पेन पुरस्कार, हान्स ख्रिश्चन अँडरसन साहित्य पुरस्कार, सांस्कृतिक मानवतावादातील उत्कृष्ट जीवनगौरव (हार्वर्ड विद्यापीठ), पेन पिंटर पुरस्कार (यूके), सेंट लुईस युनिव्हर्सिटी लायब्ररी असोसिएट्सकडून सेंट लुई साहित्य पुरस्कार, साहित्य राज्य पुरस्कार (ऑस्ट्रिया),  स्विस फ्रीथिंकर्स पुरस्कार,  आदींचा समावेश आहे.  

आता या लेखकाची प्रकृती लवकर सुधारावी म्हणून त्यांचे चाहते प्रार्थना करीत आहेत, तर पोलीस त्यांच्यावर हल्ला करणारा नेमका कुठल्या संघटनेबरोबर जोडला गेला होता का याचा तपास करीत आहेत.  

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.