रशिया युक्रेन युद्धाचे परिणाम किती भयंकर झालेले आहेत, हे येत्या काही वर्षात स्पष्ट होणार आहे. मुळात युक्रेन संपूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय सुपर पॉवर म्हणून रशियाचा उल्लेख होत असला तरी याच रशियाला लहानघ्या युक्रेनन वर्षाहून अधिक काळ लढत दिली आहे. या युद्धाची झळ अवघ्या जगाला बसली आहे. युद्धामुळे काय होईल, हे सांगता येत नाही. पण याच युद्धामुळे इटलीमध्ये (Italy) एक वेगळेच संकट आले आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे इटलीतील सर्वाधिक लोकप्रिय पदार्थावर जणू संक्रातच आली आहे. इटलीमध्ये पास्ता हा पदार्थ सर्वदूर आणि नेहमी खाल्ला जातो. जसं भारतात, पोहे, वडे, समोसे, डोसे, इटली हे पदार्थ खायची कुठलीही ठराविक वेळ नसते. अगदी काहीवेळा जेवणाच्या ऐवजी ही या पदार्थांवर ताव मारला जातो, तसेच इटलीमध्ये पास्ताच्या बाबतीत आहे. मात्र आता इटलीतील (Italy) याच पास्तावर रशिया–युक्रेन युद्धाची छाया पसरली आहे. या युद्धामुळे पास्तासाठी आवश्यक असणा-या वस्तू महाग झाल्या आहेत. त्यामुळे या इटलीतील (Italy) पास्ताची किंमत आकाशाला भिडली आहे. इटलीत (Italy) पास्ताच्या किंमती एवढ्या वाढल्या आहेत, की त्याची नोंद इटलीतील संसदेला घ्यावी लागली. नागरिकांचे रोज ज्या पास्तावर पोट भरते त्याच पास्ताचे दर अचानक चारपट वाढल्यानं इटलीमध्ये नाराजी पसरली आहे. या नाराजीचे रुपांतर संतापात झाले असून त्याची दखल सरकारलाही घ्यावी लागली आहे.
इटलीमध्ये (Italy) पास्ताच्या किंमतीत अचानक मोठी वाढ झाल्यानं सर्वसामान्य जनतेमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. इतकी की इटलीमध्ये ही राष्ट्रीय समस्याच झाली आहे. यासंदर्भात ग्राहक हक्क गटाच्या अध्यक्षांनी निवेदन काढून सरकारचा निषेध केला आहे. इटलीमध्ये दरवर्षी सुमारे 23 किलोग्राम म्हणजेच 51 पौंड पास्ता फस्त केला जातो. आता या पास्ताच्या दरात वाढ झाल्यानं त्याची विक्री थंडावली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायिकांमध्येही चिंता पसरली आहे. इटलीमध्ये (Italy) पास्ताच्या किंमती वाढण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी सरकारच पुढे झाले आहे. इटालियन संसदेमध्ये यासंदर्भात चर्चाही झाली आणि पास्ताचे दर का वाढले हे जाणून घेण्यासाठी समितीही नेमण्यात आली आहे.
देशाचे मंत्री, अॅडॉल्फो उर्सो यांनी पास्ताच्या किंमती कमी करण्यासाठी काय करता येईल यावर उपाययोजना सुचविल्या आहेत. पास्ता उत्पादक आणि ग्राहक हक्क गटांच्या बैठकाही घेण्यात येत आहेत. या बैठकांमध्ये काढण्यात आलेल्या निष्कर्षानुसार युक्रेनवर रशियानं केलेल्या युद्धानंतर इटलीमध्ये पास्ताचे दर वाढायला सुरुवात झाली आहे. पास्ता बनवण्यासाठी लागणारे बरेचसे पदार्थ युक्रेनमधून इटलीमध्ये येतात. आता युद्ध सुरु झाल्यावर हे पदार्थ येणे बंद झाले असून जे काही थोडेफार येतात, त्यांची किंमत ही खूप असते. परिणामी पास्ताचे दरही वाढवायला लागले आहेत. त्यात इटलीमध्ये (Italy) पास्ता करण्यासाठी जे पिठ वापरलं जातं ते डुरम या जातीच्या गव्हाचं असतं. हा गहूही महाग झाला आहे. इटलीमधील शेतकरी संघटना गेली काही वर्ष डुरम गव्हाच्या उत्पादन खर्चाचे आणि त्याच्या मुळ किंमतीबाबत आंदोलन करीत आहे. उत्पादन खर्चाच्या प्रमाणात गव्हाची किंमत कमी मिळत असल्याचे या संघटनेचे म्हणणे होते. मात्र आता या गव्हाचेही उतादन कमी झाले आहे.
=======
हे देखील वाचा : जवळपास सव्वाशे वर्ष जुनी असलेली पाकिस्तानातील बॉम्बे बेकरी!
=======
अशात कमी असलेल्या गव्हाचे भाव एकदम वाढले. त्याचाही परिणाम पास्ताच्या किंमतीवर झाला आहे. डुरम गहू हा इटालियन पास्ता निर्मात्यांमध्ये लोकप्रिय आहे. या गव्हाच्या किंमतीबाबत सरकारी हस्तक्षेप झाल्यानंतर त्याची किंमत 30% ने कमी झाली आहे. पण यामुळे लगेच पास्ताची किंमत कमी होईल अशी आशा नाही. इटलीमध्ये (Italy) लोकप्रिय असलेल्या बॅरिल्ला स्पॅगेटी, रिगाटोनी आणि पेन्ने पास्ताच्या किंमती गेल्या महिन्यात 25 टक्क्यांनी वाढल्या. ही वाढ अशीच चालू राहिली तर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर त्यांचा लाडका पास्ता होणार आहे. विशेष म्हणजे, पास्ताच्या किंमती या प्रदेशानुसार वाढल्या आहेत. इटलीच्या (Italy) सिएना प्रांतात 58% पेक्षा जास्त वाढ पास्ताच्या किंमतीत झाली आहे. याची झळ मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यावसायिकांना आणि पर्यटकांना बसत आहे. पास्ता हा इटालियन खाद्यपदार्थातला प्रमुख पदार्थ आहे. गव्हाचे पिठ आणि अंड यापासून पास्ता केला जातो. आता हाच इटलीकरांचा लाडका पास्ता युक्रेन रशिया युद्धामुळे महाग झाला आहे.
सई बने