Home » Irfan Soltani : आता अमेरिका या आठ कैद्यांच्या सुटकेसाठी आग्रही…

Irfan Soltani : आता अमेरिका या आठ कैद्यांच्या सुटकेसाठी आग्रही…

by Team Gajawaja
0 comment
Share

इराणमध्ये २० व्या दिवशीही निदर्शने कायम असली तरी एक दिलासादायक माहिती पुढे आली आहे. निदर्शक इरफान सुलतानी याला देण्यात येणारी फाशी सध्यातरी पुढे ढकलली आहे. इरफानला फाशी दिल्यास इराणच्या रस्त्यावरील आगडोंब अधिक तीव्र होईल, शिवाय अमेरिकेला यात हस्तक्षेप कऱण्याची संधी मिळेल, हे जाणून सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी हा निर्णय घेतला आहे. १० जानेवारी रोजी २६ वर्षीय इरफानला अल्लाच्या विऱोधात काम केल्याबद्दल अटक केली होती. या गुन्ह्यासाठी इराणमध्ये मृत्यूदंड ही एकमेव शिक्षा आहे, मात्र इरफान हा सुदैवी ठरला असून जाहीर झालेली फाशी रद्द होणारा तो एकमेव ठरला आहे. ( Irfan Soltani )

इकडे इरफानची फाशी टळल्यावर अमेरिकेने आता इराणवर आणखी दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. इराणच्या कैदेत असलेल्या आठ कैद्यांची त्वरित सुटका करावी अशी मागणी अमेरिकेतर्फे करण्यात येत आहे. त्यात नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नरगिस मोहम्मदी यांचाही समावेश आहे. इराणमधील खामेनी यांच्या शासनाच्या इतिहासात पहिल्यांदाच देशद्रोहाच्या आरोपाखाली असलेल्या व्यक्तीची फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. २६ वर्षीय इरफान सुलतानी हा इराणमध्ये सुरु असलेल्या आंदोलनाचा चेहरा झाला आहे. मात्र खामेनी यांनी अल्लाविरोधी कृत्य केल्याचा ठपका ठेऊन त्याला फाशीची शिक्षा सुनावली होती.

यामुळे इरफानच्या कुटुंबियांसह अवघा इऱाण हळहळत होता. इरफानसाठी इराणच्या सरकारवर जागतिक स्तरावरुन दबाव वाढला. त्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इरफानला फाशी झाल्यास इराणवर कारवाई करण्यात येईल, असा थेट इशारा दिला. इराणमध्येही इरफानच्या फाशीविरोधात आंदोलन सुरु झाल्यामुळे बदलेले जनमत पाहता खामेनी यांनी सध्यातरी इरफान याची फाशी पुढे ढकलल्याची घोषणा केली आहे. खामेनी यांनी आपल्या कारकीर्दीत पहिल्यांदाच अशाप्रकारची माघार घेतली आहे. ( Irfan Soltani )

इरफानची फाशी टाळल्यावर आता अमेरिकेनं आणखी एक पाऊल पुढे टाकत इराणवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे. त्यात इराणच्या विविध तुरुंगात असलेल्या ८ कैद्यांना मुक्त करण्याची मागणी केली आहे. सोबतच ट्रम्प यांनी इशारा दिला आहे की, खामेनींनी या कैद्यांना ताबडतोब सोडावे अन्यथा इराण नष्ट होईल. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या पर्शियन भाषेतील अकाउंटवरून या संदर्भात पोस्ट शेअर करण्यात आली आहे. त्यात आठ राजकीय कैद्यांचे फोटो आणि नावे आहेत. इराणमधील निदर्शनांपूर्वीच तुरुंगात टाकण्यात आलेल्या राजकीय कैद्यांची सुटका होणे गरजेचे आहे. इस्लामिक रिपब्लिकच्या सरकारने या सर्व कैद्यांना तात्काळ सोडावे असेही त्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. यामध्ये प्रमुख नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या नर्गिस मोहम्मदी, सपिदेह गोलियन, जावेद अली-कोर्डी, पौरन नाझेमी, रेझा खानदान, माजिद तवाक्कोली, शरीफेह मोहम्मदी आणि हुसेन रोनाघी यांचा समावेश आहे. ( Irfan Soltani )

५३ वर्षीय नर्गिस मोहम्मदी या इराणी महिला हक्क कार्यकर्त्या आणि डिफेंडर्स ऑफ ह्यूमन राईट्स सेंटरच्या उपसंचालक आहेत. महिला हक्काबाबत त्या आग्रही आहेत. त्यांनी इराणमधील मृत्युदंड आणि भ्रष्टाचाराविरुद्ध मोठी मोहीम चालवली आहे. नर्गिस यांना २०२३ मध्ये नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. नर्गिस यांना अटक करुन तेहरानच्या एविन तुरुंगात टाकण्यात आले आहे. यासोबत महिला हक्क कार्यकर्त्या आणि स्वतंत्र पत्रकार गोलियन यांच्या सुटकेसाठी अमेरिका आग्रही आहे. गोलियन यांना २०१८ मध्ये संप करणाऱ्या कामगारांच्या समर्थनार्थ केलेल्या निदर्शनासाठी पहिल्यांदा अटक करण्यात आली. २०२५ मध्ये एका रॅलीत सहभागी झाल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

मानवाधिकार वकील आणि विद्यापीठ व्याख्याता जवाद यांच्याही सुटकेची मागणी आहे. जवाद यांना १२ डिसेंबर २०२५ रोजी त्यांच्या कार्यालयातून अटक करण्यात आली. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षेविरुद्ध कट रचण्याचा आणि राज्याविरुद्ध प्रचार पसरवण्याचा आरोप आहे. नर्गिस मोहम्मदी यांच्या साथीदार असलेल्या पूरन नाझेमी याही तेहरानमधील एविन तुरुंगात आहेत. पूरन या केरमान प्रांतातील महिला आणि नागरी हक्क कार्यकर्त्या आहेत. अमेरिकेनं जी आठ कैद्यांची यादी दिली आहे, त्यात त्यांचेही नाव आहे. ( Irfan Soltani )

=======

हे देखील वाचा : Ayatollah Khamenei : अमेरिका इराणमध्ये सैनिक उतरवण्याच्या तयारीत…

=======

यासोबत मानवाधिकार कार्यकर्त्या आणि ग्राफिक डिझायनर रेजा खानदान यांच्याही सुटकेची मागणी आहे. रेजा यांच्यावर हिजाब चळवळीला पाठिंबा दिल्याचा आरोप आहे. रेजा यांनीही मृत्युदंडाच्या विरोधात आवाज उठवला असून त्यामुळे त्यांना अनेकवेळा तुरुंगवास भोगावा लागला आहे. विद्यार्थी नेता आणि मानवाधिकार कार्यकर्ता माजिद तवाक्कोली यांच्याही सुटकेची मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ सरकारवर टीका केल्याबद्दल मासिद हे २००९ पासून तुरुंगात आहेत.

माहसा अमिनीच्या मृत्यूनंतर हिजाबविरोधी निदर्शनांमध्ये भाग घेतल्याबद्दल शरीफेह मोहम्मदी यांना अटक करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ता असलेले शरीफेह यांना २०२४ मध्ये मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. ब्लॉगर आणि इंटरनेट स्वातंत्र्याचे समर्थक असलेले हुसेन रोनाघी हे सुद्धा इराणच्या तुरुंगात बंद आहेत. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना सोडण्याची मागणी कऱण्यात येते, मात्र खामेनी यांनी ही मागणी फेटाळून लावली आहे. इराणच्या तुरुंगात १५००० हून अदिक राजकीय कैदी असल्याची माहिती आहे. इराणमधील या कैद्यांची सुटका करण्यासाठीही अमेरिका आग्रही राहणार आहे, अशी माहिती आहे. ( Irfan Soltani )

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.