2020 हे वर्ष जगभरात लक्षात ठेवण्यात येणार आहे. याच वर्षात कोरोना नावाच्या महामारीची सुरुवात झाली आणि अवघं जग काही काळ एकाच जागी थांबलं. आपल्या महाराष्ट्रातही पुण्यात 9 मार्च 2020 रोजी दोन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले. त्यानंतर भारतभरात अनेक ठिकाणी रुग्ण संपू लागले आणि मार्चच्या शेवटच्या आठवडयात संपूर्ण देशाला लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. पहिल्यांदा काही दिवसांतच हा लॉकडाऊन संपेल अशी आशा असताना तो लांबतच गेला आणि त्यासोबत अनेक समस्या वाढत गेल्या. (International Yoga Day)
एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढतच होती, पण त्यासोबत कोरोनाच्या भीतीनं आणि लॉकडाऊनच्या धक्क्याने अनेकांचे मानसिक आरोग्यही खालावले. या साऱ्यावर उपयुक्त ठरणार एकच उपाय होता तो म्हणजे योगसाधना. मानसिक आणि शारीरिक आरोग्य ठणठणीत ठेवण्यासाठी योगआसनांचा उपयोग होतो हे याकाळात प्रकर्षानं जाणवलं. गेल्या दोन वर्षांत योगसाधकांची संख्या कमालीची वाढली आहे. कोरोना काय पण अशा कुठल्याही शारीरिक अणि मानसिक आरोग्य समस्येवर योग आणि व्यायाम हा फायदेशीर ठरत असल्याचंही सिद्ध झालं.
नियमीत योग साधना केल्यास रोगप्रतिकारक्षमता वाढते आणि त्याचा फायदा सुदृढ आरोग्यासाठी होतो. कोरोनाच्या संकटात योगासनं केल्यामुळे अनेक रुग्णांना फायदा झाला. तर कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी हवी असलेली प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी अनेकांनी योग सुरू केला. (International Yoga Day)
कोरोनाचा विषाणू हा रुग्णांच्या श्वसनसंस्थेवर हल्ला चढवतो त्यामुळे श्वसनसंस्था सक्षम असणं गरजेचं असतं. यासाठी प्राणायाम, जलनेती आणि सूत्रनेती या शुद्धिक्रिया फायदेशीर ठरु शकतात. यासोबत कपालभाती आणि भस्त्रीका सारखे श्वासांचे व्यायामप्रकारही श्वसनसंस्था अधिक सक्षम करण्यसाठी फायदेशीर ठरतात.
=====
हे देखील वाचा – न्युयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरमध्येही साजरा होणार ‘आंतरराष्ट्रीय योग दिवस 2022’…
=====
व्यायामामुळे श्वास घेण्यास होणारा अडथळा कमी होतो. स्नायू मजबूत होण्यास मदत होते. मानसिक ताण कमी होतो. आत्मविश्वास वाढतो. तज्ज्ञांच्या माहितीप्रमाणे, रुग्ण कोव्हिडमुक्त झाला तरी त्याला सतत भीती वाटत राहते. मानसिक ताण जाणवतो. या सर्वांवर नियमीत योगासनं केल्यास फायदेशीर ठरतात. त्यांनी मनावरचा ताण कमी होऊन आत्मविश्वास वाढतो. कोरोनातून बरे झालेल्यांनी श्वसनाचे व्यायाम नित्यनियमाने करावेत. या आजारपणात फुफ्फुसांची कार्यक्षमता कमी होते. ही कार्यक्षमता वाढल्यानंतर हळूहळू व्यायाम सुरू करावा. अर्थात या सर्वात डॉक्टरांचा सल्ला घेणं मात्र आवश्यक आहे. (International Yoga Day)
कोरोनाचे रुग्ण आता पुन्हा वाढू लागले आहेत. आपण चौथ्या लाटेकडे तर जात नाहीत ना, अशी शंका येत आहे. चौथी लाट आल्याच्या चर्चाही रंगल्या आहेत. अशावेळी प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी योगसाधनांचा सराव करणं गरजेचं आहे. वज्रासन, मार्जारासन, वक्रासन, उष्ट्रासन, जानुशिरासन ही बैठी आसने, तसंच पाठीवर झोपून करायची उत्थिदपादासन, पवनमुक्तासन, मर्कटासन, कंधरास ही आसनं रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी उपयोगी पडतात.
कोरोना बरा झाल्यावर सूर्यनमस्कार, दीर्घश्वसन, सौम्य कपालभाती, अनुलोम-विलोम केल्याने श्वसनाचा काहीही त्रास जाणवत नाही. कोरोना काळात उच्च रक्तदाब, हृदयविकार, गुडघेदुखी आणि मधुमेहाचे रुग्ण वाढले आहेत त्यांनी नियमीतपणे सूर्यनमस्कार केल्यास, त्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो. (International Yoga Day)
कपालभाती ही क्रिया श्वसनमार्गाची सफाई करणारी आहे. यामध्ये श्वासाचे वेगाने आवागमन होते. छातीतला कफ मोकळा होतो. कोरोनाकाळात कपालभाती या क्रियेचं महत्त्व लाखो भारतीयांना पटले आहे. ज्यांची फुफ्फुसे करोनापश्चात नाजूक झालेली असताना त्यांची ताकद वाढवण्यासाठी सौम्य कपालभाती केल्यास फायदेशीर ठरते. मात्र या सर्वात नियमीतता हवी. योग, व्यायाम आणि यांच्या जोडीला समतोल आहार असेल तर, त्यामुळे रोगप्रतिकारक्षमता कमालीची वाढते.
आज आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्ताने संपूर्ण जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. यावर्षीच्या योगदिनाची थीम आहे ‘Yoga for humanity’ म्हणजेच ‘मानवतेसाठी योग. आपल्याच संस्कृतीचा भाग असणारी योगसाधना आज जगभरात आत्मसात केली जातेय, ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे. (International Yoga Day)
– सई बने