भारतीय क्रिकेट संघाचा बहुप्रतीक्षित दक्षिण आफ्रिकेचा दौरा सुरु झाला आहे. २६ डिसेंबरपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. आफ्रिकेतील वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा नऊ दिवसांनी पुढे ढकलला गेला. त्यामुळे टी २० मालिका रद्द करण्यात आली. तसेच जैव सुरक्षित वातावरणात राहायचे असल्याने सराव सामना सुद्धा होऊ शकला नाही.
आधीच आफ्रिकेचा दौरा खडतर आणि त्यात अशा अडचणी त्यामुळे ‘नकटीच्या लग्नाला सतराशे साठ विघ्ने’ अशी अवस्था झाली आहे. रोहित शर्मा, जो कसोटी संघाचा उपकर्णधार होता, तो जायबंदी झाल्याने या मालिकेला मुकला आहे. यातच भर पडली आहे ती क्रिकेट बोर्ड व कोहली यांच्यातील मतभेदाची. तसेच अश्विनने जाहीररित्या व्यक्त केलेल्या नाराजीची. कुठल्याही मालिकेच्या सुरुवातीला असे गढूळ वातावरण निर्माण होणे म्हणजे दुधात मिठाचा खडा टाकण्यासारखे आहे.
क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी प्रथम जाहीर विधान केले की विराटला टी २० सामन्यांचे कर्णधारपद न सोडण्याविषयी विनंती करूनसुद्धा त्याने ऐकले नाही व कर्णधारपद सोडले. त्यामुळे त्याला एकदिवसीय सामन्यातही कर्णधारपद गमवावे लागले कारण मंडळाला झटपट क्रिकेटसाठी एकच कर्णधार हवा होता.
दौऱ्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत विराटने गांगुलीच्या विधानाचा प्रतिवाद करताना सांगितले की त्याला अशी विनंती अजिबात करण्यात आली नव्हती. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे गांगुली यांनी टाळले, पण नंतर विधान केले की विराट हा भांडकुदळ स्वभावाचा आहे. यावर अजून तरी विराटची प्रतिक्रिया आलेली नाही, पण आगीत तेल ओतले गेले आहे, हे निश्चित.
दुसरीकडे अश्विनने रवी शास्त्रींच्या एका शेऱ्यावरून झालेली निराशा व दुःख जाहीररीत्या व्यक्त केले आहे. २०१८-१९च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात रवी शास्त्रीने कुलदीप यादवला परदेशातील भारताचा क्रमांक एकचा स्पिनर ठरवल्याने अश्विन नाराज झाला व त्याच्या मनात निवृत्तीचे विचार घोळू लागले.
वास्तविक अश्विनने परदेशात एकूण ३१ कसोटी सामने खेळले आहेत व त्यात त्याने १२७ बळी मिळवले आहेत. म्हणजे प्रत्येक कसोटीमागे सरासरी ४ विकेट्स. ही कामगिरी वाईट खचितच नाही, पण भारतात त्याने ५० कसोटीत आजपर्यंत ३०० बळी घेतल्यानं त्यापुढे परदेशातील कामगिरी थोडी कमी भासते एवढेच. एक गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे की, परदेशात अश्विनला त्यामानाने फार कमी सामन्यात खेळायची संधी मिळाली. जडेजा व अश्विन यांच्यात कायम संगीत खुर्चीचा खेळ झाला त्यामुळे परदेशात दोघे एकत्र क्वचितच खेळले आहेत. असो.
हे सुद्धा वाचा: अजित आगरकर(Ajit Agarkar): पूर्ण न उमललेले फुल
आता भारतीय संघाला गरज आहे ती हे वाद मागे ठेवून खेळावर लक्ष केंद्रित करण्याची. सध्याचा आफ्रिकन संघ पूर्वीसारखा बलाढ्य राहिलेला नाही आणि तोही संघ वादविवादाच्या फेऱ्यात अडकला आहे. भारताच्या दृष्टीने यावेळी आफ्रिकेत पहिल्यांदा मालिका विजय नोंदवण्याची नामी संधी आहे, पण अनावश्यक वादविवाद या संधीवर पाणी फेरतात की काय अशी भीती भारतीय क्रिकेट चाहत्यांना वाटणे साहजिकच आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते की हे वाद टाळता येणे शक्य नव्हते काय ?
– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.