शरद पवारांचे किस्से (Sharad Pawar)
देशाच्या राजकारणातील मुरलेलं नाव म्हणजे शरद पवार (Sharad Pawar). शेतकरी संघटना आणि त्यांच्यासाठी केलेले समाजकार्य खूप मोठे आहे व अवघा देश याची साक्ष आहे. उत्तम राजकारणी असलेले शरद पवार हे वाचनप्रेमीही आहेत. त्यांचे राजकारणातील बरेचसे किस्से सर्वसामान्यांना माहीती असतील, पण आज पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यानचा एक किस्सा आम्ही तुम्हाला संगणार आहोत.
१९७८ साली रत्नागिरीच्या आमदार कुसुमताई अभ्यंकर या उत्तम लेखिका देखील होत्या. त्यांनी लिहिलेल्या एका कादंबरीचा प्रकाशन सोहळा दादरला होणार होता. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद ग.प्र. प्रधान यांच्याकडे होते. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे, शरद पवार, सदानंद वर्ते, गोविंदराव आदिक, विनायक पाटील हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार होते.
शरद पवार (Sharad Pawar) हे कायम अभ्यासपूर्ण भाषण देत असतात, परंतु यावेळी मात्र कादंबरी न वाचल्याने पवारांना भाषण देणे जड जाणार होते. दादरच्या भव्यदिव्य साहित्य प्रकाशन सोहळ्यात हा मोठा पेच निर्माण झाला होता कारण नवीन पुलोदचं सरकार स्थापन झाल्याने पवार आपल्या कामात व्यस्त होते आणि त्यांना कादंबरी वाचायला वेळच मिळाला नव्हता. त्यामुळे आता कार्यक्रमात भाषण करताना नक्की काय बोलायचं, हा प्रश्न पवारांना पडला होता.
अखेर प्रसंगावधान राखत शरद पवारांसोबत असणाऱ्या विनायक पाटील यांनी नामी युक्ती शोधून काढली. विनायकराव आयोजकांकडे गेले आणि त्यांना चार शब्द सुनावले. भांबावून गेलेल्या आयोजकांना काही समजेनासे झाले. विनायकराव म्हणाले की, “अशी वक्त्यांची यादी करतात का? ग.प्र. प्रधान अध्यक्ष असले म्हणून काय झाले, ते सर्वात वरिष्ठ आहेत. भाषणाचा पहिला मान हा त्यांचाच असणार.” यांनतर विनायकरावांनी कार्यक्रमात भाषण करणाऱ्या वक्त्यांचा क्रमच बदलून टाकला आणि शरद पवार यांचे नाव शेवटी टाकले.
त्यानंतर नेहमीच्या तडफदार शैलीत ग.प्र. प्रधानांनी कादंबरीच्या अनेक पैलूंवर भाषण करण्यास सुरुवात केली. त्यांनी किमान एक तास भाषण केले. त्यामुळे इतर वक्ते मंडळींनी त्यांच्या भाषणातील मुद्दे नीट समजून घेत त्याच मुद्द्यांना धरून नंतर भाषण केले.
हे ही वाचा: एका ‘खुर्ची’मुळे घडलेले महाभारत
जेव्हा खा. सुप्रिया सुळेंचा मोबाईल बिघडतो…
शरद पवार पहिल्यापासूनच हुशार असल्याने, त्यांनीही ग.प्र. प्रधानांचे भाषण नीट ऐकले व त्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे काढून त्यांनी, कादंबरी न वाचता १५-२० मिनिटे भाषण देऊन वेळ मारून नेली.
हा गमतीदार किस्सा इतका गाजला की सगळीकडे याबद्दल चर्चा झाली. त्यावेळी विनायकरावांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे शरद पवार आणि इतर वक्ते मंडळी व्यासपीठावर उपस्थित राहून भाषण करू शकली.
-निवास उद्धव गायकवाड