Home » इंदौर, सांची होणार आता सोलार सिटी…

इंदौर, सांची होणार आता सोलार सिटी…

by Team Gajawaja
0 comment
Solar City
Share

भारतातील सर्वात सुंदर आणि स्वच्छ शहर म्हणून गौरविलेले इंदौर शहर आता सोलार सिटी म्हणूनही आपली ओळख निर्माण करणार आहे.  यासाठी इंदौरमधील प्रत्येक इमारतींवर सोलार (Solar City) बसवण्यात येणार आहे. शहरातील इमारतींच्या छतावर 300 मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय सूर्य दिनानिमित्त हा नवीन प्रोजेक्ट इंदौरमध्ये जाहीर करण्यात आला असून त्याद्वारे इंदौरची ओळख नव्यानं होणार आहे. इंदौर महानगरपालिकेनं हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट हाती घेतला आहे. यासोबत सांची शहरही सौरउर्जा शहर म्हणून ओळखले जाणार आहे.(Solar City)    

300 मेगावॅट सौरऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट असलेल्या या प्रोजेक्टच्या पहिल्या टप्प्यात शहरातील सरकारी इमारतींच्या गच्चीवर सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात येणार आहेत. यानंतर इंदौरमधील अन्य इमारतींवरही असेच सौरउर्जा उपकरणे बसवण्यात येणार आहेत. त्यातून लाखो रुपये किंमतीची वीज वाचवण्याचे उद्दिष्टही ठेवण्यात आले आहे. प्राथमिक टप्प्यावर 20 टक्के इमारतींमध्ये सौरऊर्जा प्रकल्प बसवण्यात येणार आहेत. सध्या इंदौर शहरातील इमारतींवर लावण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रकल्पातून दरवर्षी सुमारे 40 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते.  हे उद्दिष्ट येत्या तीन वर्षांत 300 मेगावॅटपर्यंत वाढवण्यात येणार आहे. इंदौर महानगरपालिका यासंदर्भात आता जनजागृती मोहीम सुरु केली आहे. (Solar City)

या अंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक आर्थिक संसाधनांचा पुरवठा, इमारतींच्या छतावर सोलर प्लांट बसवताना सर्वसामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणींचे सुलभीकरण, सोलर पॉवर प्लांटच्या स्थापनेत सिंगल विंडो सिस्टीम लागू करणे, आदी बाबींचा समावेश आहे.  विशेष करुन हॉटेलमध्ये असे सौरउर्जा प्रकल्प उभारणींवर जोर देण्यात येणार आहे.  इंदौरमध्ये दरवर्षी लाखो पर्यटक भेट देतात. येथे मोठ्याप्रमाणात हॉटेल व्यवसाय आहे. या हॉटेलमध्ये सौरउर्जा प्रकल्प उभारले तर मोठ्या प्रमाणात वीज बचत होईलच शिवाय या हॉटेलनाही आर्थिक फायदा होईल असा दावा आहे. सध्या इंदौरमध्ये 5.50 लाखांहून अधिक वीज ग्राहक आहेत,  त्यापैकी 5400 हजार वीज ग्राहकांच्या घरांच्या छतावर सोलर प्लांट बसवण्यात आले असून त्यांनी याचा फायदा होत असल्याचे नमूद केले आहे. वर्षाअखेरीस ही संख्या लाखांच्यावर नेण्याचे उद्दीष्ट पालकेतर्फे ठेवण्यात आले आहे.(Solar City)

याशिवाय इंदौरमध्ये ‘सोलर सिटी’चे (Solar City) उद्दिष्ट साध्य करण्यासाठी इमारतींच्या मंजुरीसाठीच्या नियमावलीत बदल करण्यात येणार आहेत. सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी नागरिकांना शासकीय योजनांतर्गत अनुदानही दिले जाणार आहे. एक किलोवॅट वीज निर्मितीसाठी 100 चौरस फूट जागा लागते. एका अंदाजानुसार इंदौरमध्ये पाच लाखांहून अधिक घरे आहेत. त्यांचे सरासरी किमान क्षेत्रफळ 500 चौरस फूट आहे. या जागेपैकी 300 चौरस फूट जागाही सौरऊर्जा प्रकल्पासाठी वापरली तर प्रत्येक घराच्या छतावर महिन्याला सरासरी 450 युनिट वीजनिर्मिती होऊ शकते. एका कुटुंबाच्या गरजांसाठी हे पुरेसे आहे. इंदौरची सौर ऊर्जा निर्मितीची क्षमता 1000 मेगावॅट आहे. 

इंदौरमध्ये नर्मदेचे पाणी जलूदहून इंदौरपर्यंत आणण्यासाठी वीजेवर सध्या दरमहा 26 कोटी रुपये खर्च होत आहेत. जलूद येथे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. यासाठी 244 कोटी रुपयांचे ग्रीन बॉण्डही जारी करण्यात आले आहेत. जलूद येथे उभारण्यात येणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पाची क्षमता 60 मेगावॅट असेल. ती वाढवून 100 मेगावॅट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जलद सोलर प्लांट बसवल्यानंतर महापालिकेचा वीज खर्चात दरमहा पाच कोटी रुपयांहून अधिक घट होणार आहे.  हा सर्व पैसा नागरिकांसाठी अन्य सोयी सुविधा उपलब्ध करण्यावर खर्च करण्यात येणार आहे. (Solar City) 

=========

हे देखील वाचा : केदार शिंदे शाहीर साबळेंसोबतचं नातं का लपवतात?

========

इंदौरबरोबरच सांचीची ओळखही सोलर सिटी म्हणून होणार आहे. 10 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी  मध्यप्रदेशातील पहिल्या आणि देशातील दुसऱ्या सोलर सिटीचे (Solar City) उद्घाटन करणार आहेत.  मध्य प्रदेश पर्यटनाचे केंद्र असलेले सांची हे सौर शहर होणार आहे. या शहरात सौरउर्जेद्वारे 7.3 मेगावॅट वीजनिर्मिती होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सांचीजवळील नागझरी येथील पाच मेगावॅटच्या उपकेंद्रात बारा सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत. याशिवाय शहारांतील सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्ये सौरऊर्जेद्वारे प्रकाश पुरवठा केला जाणार आहे. एकूण मध्यप्रदेशमध्ये वीजप्रकल्पाला पर्याय म्हणून सुरु होत असलेले हे सौरउर्जा प्रकल्प अन्य राज्यातही सुरु केल्यास वीजेची मोठ्या प्रमाणात बचत होऊन आर्थिक लाभही होऊ शकतो.

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.