Home » शूटिंग प्रकारात पदक जिंकणारी भारताची पहिली महिला !

शूटिंग प्रकारात पदक जिंकणारी भारताची पहिली महिला !

by Team Gajawaja
0 comment
Manu Bhaker
Share

मनू भाकर सध्या भारतात सर्वात जास्त बोलबाला याच नावाचा आहे. कारण मनू ही ऑलिम्पिकमध्ये शूटिंग प्रकारात पदक जिंकणारी भारताची पहिलीच महिला ठरली आहे. कालपासून मनूवर सोशल मिडियावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे, त्यातच पंतप्रधान मोदींनीही फोन करून तिचं अभिनंदन केलं. अनेकांना फक्त तिने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रॉंझ मेडल जिंकलं, एवढच माहितीये, पण या २२ वर्षांच्या शूटरचा प्रवास आजही खूप भारतीयांना माहीत नाही, मनू भाकरचा जन्म १८ फेब्रुवारी २००२ चा क्रीडाभूमी हरयाणामध्येच जन्म झाल्यामुळे स्पोर्ट्समध्येच करियर करावं असं तीच्या आईवडिलांना वाटत होतं. तिचे वडील मर्चंट नेव्हीमध्ये चीफ इंजिनियर,आई शाळेची मुख्याध्यापिका ! त्यामुळे आर्थिकदृष्ट्या घरची परिस्थिती बरीच होती.

लहानपणापासूनच शूटिंगची आवड त्यातच तिने बॉक्सिंग, मार्शल आर्ट्स, टेनिस, स्केटिंग अशा बऱ्याच गोष्टी शिकून घेतल्या होत्या. पण तिने शूटिंगवरच आपलं लक्ष्य केंद्रित केलं. ज्या युनिव्हर्सल स्कूलमध्ये तिची आई मुख्याध्यापिका होती, तिथेच तिने शूटिंगचं प्रशिक्षण सुरू केलं. यावेळी इथले शिक्षक अनिल जाखड यांनी तिची प्रतिभा ओळखली आणि त्यांनी “मनूला या खेळासाठी वेळ देऊ द्या, ती देशासाठी पदके आणेल, असं तीच्या आई वडिलांना सांगितल. (Manu Bhaker)

रिओ ऑलिम्पिक संपलं तेव्हा मनू १४ वर्षांची होती. यावेळी तिने वडिलांना स्वतचं एक वेगळं शूटिंग पिस्तूल आणायला सांगितलं होतं. हे पिस्तूल तीच्या हाताला लागताच अवघ्या वर्षभरातच मनूने नॅशनल लेवलवर पदक जिंकलं आणि यानंतर शूटिंग फेडरेशनच्या विविध स्पर्धांसाठी तिची निवड झाली. याठिकाणी तिला आंतरराष्ट्रीय पदक विजेता नेमबाज जसपाल राणा यांची साथ मिळाली. अजूनही जसपाल राणाच मनूचे प्रशिक्षक आहेत. नेमबाजी सुरू केल्यानंतर अवघ्या तीन वर्षांनी मनूने ऑलिम्पियन आणि एकेकाळची वर्ल्ड नंबर वन असलेल्या हीना सिद्धूचा पराभव केला. यासोबतच १० मीटर एअर पिस्तुलमध्ये २४२.३ पॉईंट्स मिळवून नवीन रेकॉर्ड केला. मनूने या चॅम्पियनशिपमध्ये ९ गोल्ड मेडल जिंकले.

यानंतर तिची झेप पोहोचली थेट कॉमनवेल्थ गेम्सकडे  २०१८ च्या गोल्डकोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने गोल्ड जिंकलं यानंतर आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्येही तिने गोल्डवरच निशाणा मारला. सर्वांनाच वाटलं की, मनू आता थांबूच शकत नाही. त्यामुळे आता कुटुंबासोबत कोट्यावधी भारतीयांचा विश्वास तीच्यासोबत होता. यानंतर आयएसएसएफ ज्युनिअर वर्ल्ड कप, आयएसएसएफ ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप, एशियन गेम्स, युथ ऑलिम्पिक गेम्स, एशियन शूटिंग चॅम्पियनशिप, आयएसएसएफ वर्ल्ड कपमध्ये आपला डंका वाजवला. वर्ल्ड कपमध्ये तर तब्बल ९ वेळा गोल्ड मेडल जिंकण्याचा पराक्रम तिने केला आहे. (Manu Bhaker)

===============

हे देखील वाचा : जाणून घ्या ऑलिंपिक खेळांची इत्यंभूत माहिती

===============

इतक्या सगळ्या स्पर्धांचा अनुभव मिळाल्यानंतर आता टोकयो ऑलिम्पिकचं आव्हान तीच्यासमोर आलं. सर्वांनाच वाटलं की मनूचं मेडल पक्कं आहे. पण नेमकं मॅच दरम्यान गन मालफनकशन झाल्यामुळे ती फायनलसुद्धा गाठू शकली नाही. याचा तीच्या मनावर खोल परिणाम झाला. इतकं की तिने चक्क शूटिंग सोडून परदेशात पुढचं शिक्षण घेण्याची किंवा सर्व्हिसेसमध्ये करिअर करण्याची तयार करत होती. मात्र एवढ्यातच तिचे कोच जसपाल राणा यांनी तिला शूटिंग काहीही करून सुरू ठेवण्याचा सल्ला दिला आणि तिने शूटिंग Continue ठेवलं. आणि आता तुम्ही पाहू शकता, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने थेट ब्रॉंझ मेडलवर आपला निशाणा साधला.

१० मी. एअर पिस्तूल प्रकाराच्या फायनलमध्ये २२१.३ पॉईंट्ससोबत तिने इतिहास घडवला. यासोबतच भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात शूटिंगमध्ये मेडल जिंकणारी ती पहिलीच महिला ठरली आहे. मनूचा प्रवास सोपा नव्हता, पण सर्व आव्हानांना सामोरं जाऊन तिने ऑलिम्पिकसारख्या क्रीडा स्पर्धेमध्ये पदक जिंकून ‘म्हारी छोरिया छोरो से कम है के’ हे दाखवून दिलं. मनूने भारताच्या मेडल्सचा श्रीगणेशा केल्यानंतर आता भारत यंदा डबल डिजिट मेडल्सचं श्रीगणेशा करेल का ? याकडे सर्व भारतीयांचं लक्ष लागलं आहे. (Manu Bhaker)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.