रशिया आणि युक्रेन युद्ध सुरु झाल्यावर पहिल्यांदा चर्चेत आले ते भारतातून मोठ्या संख्येनं गेलेले विद्यार्थी.रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान या सर्व विद्यार्थ्यांना भारतात परत आणण्यात आले. मात्र युद्धाची भीती कमी झाल्यावर यापैकी अनेक विद्यार्थ्यांनी रशियात परत जाऊन आपला अभ्यासक्रम पूर्ण करण्यास पसंती दिली. हेच नाही तर त्यानंतरही हजारो विद्यार्थ्यांनी रशियाला वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी पसंती दिल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर असतांना रशियात शिक्षण घेणा-या या आगामी भारतीय डॉक्टरांची चर्चा पुन्हा एकदा चालू झाली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी रशियातील भारतीय समुदायातील नागरिकांबरोबर संवाद साधला तेव्हा अनेक विद्यार्थीही उपस्थित होते. हे विदयार्थी भारताच्या कानाकोप-यातून आलेले आहेत. एमबीबीएस अभ्सासक्रमासाठी ते रशियाला पहिली पसंती का देतात, हे जाणून घेण्यासारखे आहे. फक्त रशियाच नाही, तर युक्रेनमध्येही वैद्यकीय शिक्षण देणा-या विदयापीठात भारतीय विद्यार्थ्यांची गर्दी आहे. युद्ध काळातही भारतीय विद्यार्थी या दोन देशांना का पसंती देतात जाणणे गरजेचे आहे. (Medical education)
दरवर्षी हजारो भारतीय विद्यार्थी रशियामध्ये वैद्यकीय़ शिक्षणासाठी जातात. एमबीबीएससाठी रशियाला भारतीय विद्यार्थ्यांची पहिली पसंती देतात, त्यानंतर युक्रेनचा नंबर लागतो. यातील मुख्य कारण म्हणजे, भारत आणि रशियामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी लागणारा खर्च आहे. भारतात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी ५० लाखांपर्यंत शुल्क लागते. ब-याचवेळा यापेक्षा अधिक शुल्कही द्यावे लागते.
त्यापेक्षा अर्ध्या शुल्कात रशियात वैद्यकीय शिक्षण पूर्ण करता येते. शिवाय त्यानंतर पुढचे शिक्षण घ्यायचे असेल तर अन्य देशातही जाण्यासाठी लगेच परवानगी मिळते. त्यामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थी रशियाला पहिली पसंती देतात. तसेच अनेक भारतीय विद्यार्थ्यंना रशियातील विद्यापीठात स्कॉलरशिपही देण्यात येते. या विद्यार्थ्यांच्या रहाण्याचीही सुविधा सर्वोत्तम असते. त्यामुळे विद्यार्थी रशियाला अधिक पसंती देतात.
भारतीय वैद्यकीय शाखेतील प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा आणि त्यानंतरचा काळ हा सुद्धा विद्यार्थ्यांना त्रासदायक वाटतो. भारतातील MBBS, BDS आणि इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी NTA द्वारे NEET ही परीक्षा घेतली जाते. मात्र या परीक्षेचा निकाल आणि त्यानंतर होणा-या प्रवेश फे-या यामध्ये बरेच महिने वाया जातात. शिवाय यावर्षी झालेल्या NEET परीक्षेमध्ये झालेल्या गोंधळ हा सर्वव्यापी आहे. (Medical education)
यामध्ये विद्यार्थ्यांना मानसिक ताण सहन करावा लागतो. अनेक हुशार विद्यार्थी त्यांची गुणवत्ता असूनही वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ शकत नाहीत. अशावेळी निराश झालेले हे विद्यार्थी रशियाकडे जातात. तिथे कमी खर्चात वैद्यकीय शिक्षण घेऊन ते रशियामध्येच डॉक्टर म्हणून रुजूही होत आहेत. भारतीय विद्यार्थ्यांना रशियाच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अधिक सुलभरित्या प्रवेश घेता येतो.
त्यासाठी बारावीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयांसह किमान ५० टक्के गुण असावे लागतात. मुख्य म्हणजे, रशियाच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतात. त्यामुळेच दरवर्षी रशियात जाणा-या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. सध्या २०००० हून अधिक भारतीय विद्यार्थी रशियन विद्यापीठांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. (Medical education)
फक्त भारतातूनच नाही तर अन्य देशांमधील विद्यार्थीही रशियामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. रशियन विद्यापिठांनी यासाठी आपल्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ केली आहे. या विद्यार्थ्यांना रहाण्याची सर्वोत्तम सुविधा देण्यात येते. ब-याच विद्यापीठामध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विभाग देण्यात येतो. यात भारतीय विद्यार्थी आपला एक गट करुन एका रुममध्ये राहू शकतात. यात विद्यार्थ्यांना खाद्यपदार्थ करण्यास मुभा असते.
============================
हे देखील वाचा : जपान करणार ऑटोमॅटिक रस्ता ?
============================
जेणेकरुन ते आपल्या देशातील अन्नपदार्थ बनवून खाऊ शकतात. त्यामुळे जेवणाच्या पैशांचीही बचत होते. विद्यार्थ्यांना देण्यात येणा-या या रुम विद्यापीठांजवळच असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ प्रवासातही जात नाही. शिवाय रशियामधील वैद्यकीय विद्यापीठांना WHO आणि NMC India या दोन्ही संस्थांनी मान्यता दिली आहे. रशियातून मिळवलेली एमबीबीएस पदवी भारतात स्वीकारली जाते. (Medical education)
या सर्वांमुळे रशियामध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण मोठ्या संख्येनं आहे. रशिया-युक्रेन युद्धानंतर हे विद्यार्थी भारतात परत आले. मात्र भारतीय विद्यापीठांनी त्यांना प्रवेश देण्यास उस्तुकता दाखवली नाही. त्यामुळे यापैकी बहुतांश विद्यार्थ्यांनी पुन्हा या देशात परत जाऊन आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
सई बने