Home » दुःख भरे दिन बिते रे भैय्या …

दुःख भरे दिन बिते रे भैय्या …

by Correspondent
0 comment
indian hockey team | K Facts
Share

नुकत्याच संपन्न झालेल्या २०२० च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय स्पर्धकांनी काही क्रीडाप्रकारात चमक दाखवून भालाफेकीत सुवर्ण पदकाबरोबरच कुस्ती, महिला बॅडमिंटन व वेटलिफटिंग, महिला बॉक्सिंग, पुरुष हॉकी यात रौप्य अथवा कास्य पदक जिंकून भारताची पाटी कोरी राहू दिली नाही. यातील भारतीय पुरुष हाँकी संघाने मिळवलेले कास्य पदक तर तब्बल ४१ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मिळाल्याने भालाफेकीतील नीरज कुमारच्या सुवर्ण पदकाइतकेच त्याचे महत्व आहे.

१९८० च्या मॉस्को ऑलिम्पिक मध्ये फक्त सहा देश सहभागी झाले असताना भारताने हाँकीत सुवर्ण पदक जिंकले होते. रशियाने अफगाणिस्तानवर केलेल्या आक्रमणाचा निषेध म्हणून अमेरिका व त्याच्या मित्र देशांनी या स्पर्धेवर बहिष्कार घातला होता. परिणामस्वरूप पाकिस्तान, जर्मनी, ग्रेट ब्रिटन, हॉलंड, ऑस्ट्रेलिया हे हाँकीतील दिग्गज संघ स्पर्धेत सहभागी झाले नाहीत. या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने मिळवलेल्या सुवर्ण पदकाची झळाळी त्यामानाने कमी झाली होती.

पण १९८० नंतर भारतीय हॉकीची जी पीछेहाट सुरु झाली ती थांबण्याचे नाव घेत नव्हती. प्रत्येक वेळा सुवर्ण पदक मिळण्याची महत्वाकांक्षा बाळगणारा आपला संघ बाद फेरीत सुद्धा पोहोचू शकत नव्हता. आपल्यला कधी पाचव्या ते आठव्या स्थानासाठी खेळावे लागले तर कधी नवव्या ते बाराव्या स्थानासाठी. मला १९८६ मधील लंडन विश्वचषक स्पर्धा आठवते. भारत या स्पर्धेत तळाच्या १२व्या स्थानी होता. ११व १२व्या क्रमांकासाठी भारत व पाकिस्तान यांच्यात लढत झाली आणि त्यात पाकिस्तानचा विजय झाला. कोणाचा विश्वास बसणार नाही की १९७५ च्या विश्वचषक स्पर्धेत याच दोन संघात विजेतेपदासाठी लढत झाली होती आणि भारताने तो सामना जिंकून सुवर्णपदक जिंकले होते.

१९७५ नंतर जी घसरण सुरु झाली त्याचा परिपाक म्हणजे ऑलिम्पिकच्या पात्रता स्पर्धेतसुद्धा भारताला भाग घ्यावा लागला कारण आपण आशियाई स्पर्धेत पण जिंकू शकत नव्हतो. एशियाड मध्ये चीन, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया आणि अर्थातच पाकिस्तान हे संघ आपल्याला वारंवार पराजित करत होते.

पर्गत सिंग, मोहम्मद शाहिद, जफर इक्बाल, मर्विन फेर्नांडिस, सोमैया, धनराज पिल्लई यासारखे दिग्गज खेळाडू असताना देखील सांघिक कामगिरी होत नव्हती. सलग ४१ वर्षे अशा गर्तेत सापडलेल्या संघाकडून या वेळी कुणीही पदकाची अपेक्षा व्यक्त केली नव्हती. पण भारतीय संघाने सर्वाना चकित करून बाद फेरीत तर प्रवेश मिळवलाच पण थेट ब्रॉन्झ पदकाला गवसणी घालायचा पराक्रम केला.

या यशाची कारणमीमांसा करणे अगत्याचे ठरते.

Indian Hockey Team defeats Germany, wins Bronze medal in Tokyo Olympics

सर्वप्रथम म्हणजे भारताने आपल्या पारंपरिक शैलीनेच खेळ केला. बाकीचे सर्व संघ युरोपियन शैलीने खेळत असताना भारताने आपले छोटे पासेस देण्याचे तंत्र अजिबात सोडले नाही.

दुसरे म्हणजे भारतीय हॉकी संघाला अनेक परदेशी दौऱ्यांचा चांगलाच फायदा झाला. खेळाडूना परदेशी टर्फवर प्रतिकूल हवामानात खेळण्याचा चांगला सराव मिळाला.

तिसरे म्हणजे भारतीय संघाने मानसिक कणखरपणा दाखवला. साखळी स्पर्धेत ऑस्ट्रेलियाकडून झालेला दारुण पराभव विसरून ते प्रत्येक सामन्याला नव्याने सामोरे गेले.

न्यूझीलंड, स्पेन, अर्जेंटिना, जपान यासारख्या कसलेल्या संघांविरुद्ध विजय मिळवताना त्यांनी वेगवान व आक्रमक खेळ तर केलाच पण शेवटपर्यंत हार न मानण्याची झुंजार वृत्ती दाखवली. याआधी बरेच वेळा भारताने सामन्यात आधी घेतलेली आघाडी अखेरच्या क्षणात कचखाऊ वृत्तीमुळे गमावून जिंकत आणलेली बाजी गमावली होती.

कास्य पदकाच्या लढतीत सुद्धा जर्मनीविरुद्ध १-३ अशा पिछाडीवर असताना तुफान जिगर दाखवून भारताने बाजी पालटवली आणि सामना ५-४ असा जिंकला. यावेळी मला १९८५ च्या ऑस्ट्रेलियातील चॅम्पिअनस ट्रॉफी तील भारत – जर्मनी सामन्याची आठवण झाली.

त्या सामन्यात शेवटची१० मिनिटे राहिली असताना भारत १-५ असा  पिछाडीवर होता. पण पर्गत सिंग, थोइबा सिंग, मोहम्मद शाहिद यांनी शेवटच्या १० मिनिटांमध्ये ४ गोल करून सामना बरोबरीत सोडवला. फुल बँक असलेल्या पर्गटने तर एकहाती चेंडू वल्हवत थेट गोल केला होता.

सर्वात शेवटी पण महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियन प्रशिक्षक ग्रॅम रीड यांचे मार्गदर्शन. पूर्वी भारत मैदानी गोल करण्यात कमी पडत असे व आपला भर पेनल्टी कॉर्नर मिळवण्यावर असे. पण या संघाने पेनल्टी कॉर्नरबरोबर मैदानी गोल पण केले.

या संघात कुणीही स्टार खेळाडू नव्हता. सर्व खेळाडू जुनिअर संघातून आलेले होते त्यामुळे त्यांना पूर्व इतिहासाचे ओझे नव्हते. मला नाही वाटत की यापूर्वी कोणी समशेर सिंग, गुरजांत सिंग, हार्दिक सिंग, दिलबागसिंग, हरमनप्रीतसिंग ही नावं ऐकली असतील. शिवाय हे खेळाडू अत्यंत तंदुरुस्त होते आणि अस्ट्रो टर्फ वर आवश्यक असणारा वेग व स्टॅमिना यात ते इतर संघांच्या तोडीस तोड होते.

अनुभवी गोलरक्षक श्रीजेश गोलमध्ये एखाद्या पहाडासारखा उभा होता तर मनप्रीतसिंगने उत्तम खेळाबरोबरच कुशल नेतृत्वही केलं. जर पेनल्टी कॉर्नरचे अधिकाधिक गोलात रूपांतर करण्यात यश आले असते तर कदाचित भारत अंतिम फेरीत सुद्धा मजल मारू शकला असता.

यापूर्वी भारताने 1972 मध्ये म्युनिक ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवले होते पण त्यावेळी भारताचा दर्जा एवढा चांगला होता की सुवर्ण पदकाऐवजी ब्रॉन्झ मेडल मिळाल्याने भारतात नैराश्य पसरले होते. पण आज ४१ वर्षांच्या जीवघेण्या प्रतीक्षेनंतर त्याच ब्रॉन्झ पदकाने भारतीय हॉकीत नवी जान फुंकली आहे.

महिला हॉकी संघाने सुद्धा एक इतिहास घडवला आहे. भले ब्रॉन्झ पदकाची चुरशीची लढत भारताने ३-४ अशी  गमावली तरी पहिल्या तीन साखळी सामन्यात मोठे पराभव स्वीकारल्यानंतर फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भारताने जी झेप घेतली ती कौतुकास्पदच आहे.

गुर्जित कौर हिच्या सणसणीत ड्रॅग फ्लीकनी प्रतिस्पर्धी संघांमध्ये निश्चितच धडकी भरवली असेल. रिओ ऑलिम्पिकमध्ये 36 वर्षानंतर पहिल्यांदा प्रवेश मिळवल्यावर हा संघ एकही सामना जिंकू न शकल्याने तळाच्या स्थानावर होता. त्याच संघाने आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये थेट उपांत्य फेरी गाठली आणि पहिल्या चार संघात स्थान मिळवले.

भारतीय पुरुष आणि महिला संघांच्या या यशाने भारतीय हॉकी नव्याने कात टाकेल. आता या खेळाला अनेक पुरस्कर्ते लाभतील आणि खेळात भरपूर पैसा येईल. १९८३ च्या क्रिकेट विश्वचषक विजयाने जसे भारतीय क्रिकेटला सुगीचे दिवस आले तसेच हॉकीच्या बाबतीतही होईल. कुणी सांगावे पुढील ऑलिम्पिकमध्ये दोन्ही भारतीय संघ सुवर्ण पदकाचा सुद्धा वेध घेतील.

भारतीय संघांचे अभिनंदन करताना म्हणूनच एका हिंदी चित्रपटगीताची याद येते व म्हणावेसे वाटते…
‘दुःख भरे दिन बिते रे भैय्या, अब सुख आयो रे’

– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.