बंगालच्या उपसागरात भारतानं 2 नोव्हेंबर रोजी इंटरसेप्टर या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली. यापाठोपाठ 11-12 नोव्हेंबर रोजी लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी(Ballistic Missile Test) करण्याची घोषणाही करण्यात आली आहे. यासाठी एक सूचनाही काढण्यात आली आहे, म्हणजेच या चाचणीदरम्यान नो-फ्लाय झोनचा इशारा देण्यात आला आहे. 3,200 किमीच्या पल्ल्याचे पाणबुडीवरून प्रक्षेपित केलेले बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (Ballistic Missile Test)आहे. मात्र भारताच्या या क्षेपणास्त्र चाचणीमध्ये चीनने खोडा आणला आहे. या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाल्यास भारताची युद्धक्षमता वाढेल, हे जाणून चीननं ही चाचणी झाल्यास क्षेपणास्त्रासंबंधीची गुप्त माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या एका गुप्तहेर जहाजाला हिंद महासागरात दाखल केले आहे. चीनचे मिसाईल ट्रॅकिंग करणारे जहाज युआन वांग-6 हिंद महासागरात आले आहे. तीन महिन्यांपूर्वीही चीनने असेच एक जहाज श्रीलंकेतील हंबनटोटो बंदरात दाखल केले होते. तेव्हाही भारतावर निगराणी करण्याचा चीनचा मानस होता. आताही भारतीय तंत्रज्ञानाची निगराणी करण्याचा मानस ठेऊन हे गुप्तहेर जहाज हिंद महासागरात दाखल झाल्यानं क्षेपणास्त्राची संभाव्य चाचणी पुढे ढकलावी लागणार असा तज्ञांचा अंदाज आहे.
भारताने 11 ते 12 नोव्हेंबर दरम्यान लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र चाचण्यांसाठी (Ballistic Missile Test)बंगालच्या उपसागरापासून हिंदी महासागरापर्यंत नो-फ्लाय झोन तयार करण्याची घोषणा केली. ओडिशातील अब्दुल कलाम बेटावरून क्षेपणास्त्राची चाचणी होणार आहे. भारताची ही तयारी चालू असतांनाच चीनने इंडोनेशियाच्या बाली किनाऱ्यावर आपले हेरगिरी करणारे जहाज पाठवले आहे. 4 नोव्हेंबर रोजी चीनचे गुप्तहेर जहाज युआन वांग-6 इंडोनेशियातील लोम्बोक सामुद्रातून हिंदी महासागर क्षेत्रात दाखल झाले. भारतीय नौदलाला याची खबर लागल्यावर या जहाजाच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. युआन वांग-6 हे ट्रॅकिंग जहाज म्हणून परिचित आहे. क्षेपणास्त्राच्या चाचण्या होत असतांना त्या संबंधीची माहिती टिपण्याचे काम अशापद्धतीची जहाजे करतात. या जहाजाला हायटेक इव्हस्ड्रॉपिंग उपकरणे बसवण्यात आली असून जहाजावर 1 हजार दूरवर होणारे संभाषण ऐकण्याची क्षमता आहे.

क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाजात रडार आणि अँटेना असलेली इलेक्ट्रॉनिक यंत्रणा आहे. ही यंत्रणा आपल्या रेंजमध्ये येणाऱ्या क्षेपणास्त्राचा मागोवा घेते आणि त्याची माहिती हवाई संरक्षण यंत्रणेला पाठवते. याचा फायदा हे क्षेपणास्त्र प्रत्यक्षात वापरतांना होतो. क्षेपणास्त्राची माहिती हवाई संरक्षण यंत्रणेच्या कक्षेत येण्यापूर्वीच प्राप्त होते आणि हल्ला हाणून पाडता येतो. पर्यायानं त्या क्षेपणास्त्राची किंमत शून्य होते. चीनच्या गुप्तचर जहाजाने भारताच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राच्या चाचणीवर (Ballistic Missile Test)प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यापूर्वी, जेव्हा चीनने 2022 मध्ये लाँग मार्च 5B रॉकेट लाँच केले तेव्हा युआन वांग-5 जहाज निरीक्षण मोहिमेवर होते. अगदी अलीकडे ते चीनच्या तिआंगॉन्ग स्पेस स्टेशनच्या पहिल्या लॅब मॉड्यूलच्या प्रक्षेपणाच्या सागरी निरीक्षणामध्ये देखील सामील होते.
चीनकडे हेरगिरी करणारी सात जहाजे आहेत. याद्वारे चीन संपूर्ण पॅसिफिक, अटलांटिक आणि हिंदी महासागरावर लक्ष ठेऊन असतो. ही जहाजे हेरगिरी करुन बीजिंगच्या ट्रॅकिंग स्टेशनला माहिती पाठवतात. या माहितीचा लष्करी सज्जतेसाठी वापर करण्यात येतो. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) च्या स्ट्रॅटेजिक सपोर्ट फोर्स (SSF) द्वारे हे जहाज चालवले जाते. SSF ही थिएटर कमांड लेव्हल संस्था आहे. हे PLA ला अंतराळ, सायबर, इलेक्ट्रॉनिक, माहिती, युद्ध मोहिमांमध्ये मदत करते.
=========
हे देखील वाचा : RBI ची डिजिटल करेंसी नक्की काय आहे? ‘या’ पद्धतीने करणार काम
========
16 ऑगस्ट रोजी चीनचे युआन वांग-5 हे गुप्तहेर जहाज श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरावर थांबले होते. तेव्हाही भारताकडून टिका करण्यात आली होती. श्रीलंकेने दक्षिणेतील हंबनटोटा बंदर चीनला 99 वर्षांच्या लीजवर सुपूर्द केले आहे. हे बंदर आशिया आणि युरोपमधील मुख्य सागरी व्यापार मार्गाजवळ आहे. 1.5 अब्ज डॉलर्स खर्चून बांधलेले हे बंदर चीनला नौदल तळ म्हणून वापरायचे असल्याचा दावा भारत आणि अमेरिकेनंही केला आहे. असे झाल्यास भारताला मोठा धोका रहाणार आहे.
सध्या भारत, चीन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका या पाच देशांकडेच क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज आहे. ट्रॅकिंग जहाज बांधण्याची संकल्पना अमेरिकेने सर्वप्रथम सुरू केली. अमेरिकेत 25 हून अधिक ट्रॅकिंग जहाजे असल्याचा अंदाज आहे. भारताने 10 सप्टेंबर 2021 रोजी पहिले क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज ध्रुव दाखल केले. ध्रुव अॅक्टिव्ह इलेक्ट्रॉनिक स्कॅन अॅरे रडार्सने (AESA) सुसज्ज आहे. एईएसए हे रडार तंत्रज्ञानातील सर्वात प्रगत तंत्रज्ञान मानले जाते. हे रडार वेगवेगळ्या वस्तू शोधण्याबरोबरच शत्रूच्या उपग्रहांवर लक्ष ठेवते. एईएसए तंत्रज्ञानाच्या मदतीने क्षेपणास्त्राची क्षमता आणि श्रेणीही शोधता येते.
ध्रुव आण्विक क्षेपणास्त्रे तसेच बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे (Ballistic Missile Test)आणि जमिनीवर आधारित उपग्रहांचा मागोवा घेऊ शकतो. ते समुद्रात 2 हजार किलोमीटरपर्यंत 360 डिग्री वॉच ठेवू शकते. या जहाजात अनेक रडारची एकत्रित यंत्रणा आहे जी एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर लक्ष ठेवू शकते. आता चिनच्या गुप्तहेर जहाजाच्या हालचाली टिपण्यासाठीही या जहाजाचा वापर होत आहे. भारतासाठी महत्त्वपूर्ण लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी 11-12 नोव्हेंबर रोजी होणार की नाही याकडे तज्ञांचे लक्ष लागले आहे.
सई बने