Home » ‘या’ दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध अधिक दृढ होणार…

‘या’ दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध अधिक दृढ होणार…

by Team Gajawaja
0 comment
India and Iran
Share

भारत आणि इराण या देशांनी व्यापारासंबंधी योजनांचे आणखी एक यशस्वी पाऊल पुढे टाकले आहे. भारत आणि इराण मिळून इराणच्या चाबहार बंदराला जोडणारा रेल्वे प्रकल्प वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. चाबहार बंदर ते जाहेदानपर्यंत ७०० किमी लांबीचा रेल्वे मार्ग तयार केला जात असून यामुळे व्यापाराला अधिक चालना मिळणार आहे. या रेल्वेमार्गावर भारतीय बनावटीच्या रेल्वेगाड्या धावणार आहेत. भारताची ट्रेन इराणच्या रुळावर धावणार असून हा रेल्वेमार्ग इराण मधील बंदरांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे वाहतूक कॉरिडॉरचे प्रवेशद्वार ठरणार आहे. याशिवाय हा कॉरिडॉर मध्य आशियाई आणि युरेशियन देशांसाठी एक प्रमुख व्यापारी मार्ग प्रदान करणार आहे. भारत आणि इराण ह दोन देश मिळून या रेल्वेमार्गाचे काम करत आहेत. यामुळे या दोन्ही देशांमधील व्यापारी संबंधही अधिक दृढ होणार असून पाकिस्तान आणि चीन यांना चांगलाच फटका बसणार आहे. (India and Iran)

१३ मे २०२४ रोजी, भारत आणि इराणने इराणमधील चाबहार बंदर विकसित करण्यासाठी १० वर्षांच्या करारावर स्वाक्षरी केली. भारतानं केलेल्या या करारानं पाकिस्तान, चीन आणि युरोपीय देशांच्या नजरा वर झाल्या. कारण भारत यातून समुद्रातून व्यापार करतांना अन्य कुठल्याही देशावर अवलंबून रहाणार नाही. चाबहार बंदराचा विकास झाल्यावर भारताच्या व्यापारातही वाढ होणार आहे. शिवाय व्यापारी मार्गातील वेळही कमी होणार आहे. इंडियन पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड (IPGL) आणि इराणची बंदरे आणि सागरी संघटना (PMO) यांच्यात झालेल्या या कराराचे आता व्यापक परिणाम समोर येत आहेत. त्यातील एक मोठा निर्णय म्हणजे, भारतातील ट्रेन इराणच्या रेल्वेमार्गावरुन धावणार आहेत.

भारत आणि इराण मिळून चाबहार बंदर आणि झाहेदान शहरादरम्यान नवीन रेल्वे मार्ग तयार करत आहेत. या मार्गावर भारतीय बनवटीची ट्रेन धावणार आहे. या रेल्वेमुळे इराणी बंदर, चाबहार हे कॅस्पियन समुद्राच्या पूर्वेकडील मध्य आशियाई आणि युरेशियन देशांसाठी एक प्रमुख व्यापार मार्ग होणार आहे. यात भारताचा मित्रदेश रशियाचाही समावेश आहे. पाश्चिमात्य देशांच्या निर्बंधांपासून वाचण्यासाठी या मार्गाने नुकतेच रशियानं भारताशी व्यापार सुरू केला आहे. या कॉरिडॉरच्या निर्मितीमुळे अफगाणिस्तानचा अरबी महासागराशीही थेट संपर्क होणार आहे. मुख्य म्हणजे पाकिस्तानच्या कराची बंदरावरील भारताचे अवलंबित्व संपुष्टात येणार आहे. याचा पाकिस्तानसोबत चीनलाही फटका बसणार आहे. (India and Iran)

चाबहार बंदरावर नवीन रेल्वे मार्ग तयार करण्याचे काम वेगाने केले जात आहे. या बंदरावरुन भारतात व्यापारी वाहतूक सुरु झाली आहे. यावर्षी चाबहार बंदर अनेक दशलक्ष टन मालाची हाताळणी करेल असा विश्वास आहे. २०२४ च्या पहिल्या दोन महिन्यांत चाबहार बंदरातून झालेली मालाची वाहतूकही विक्रमी ठरली आहे. चाबहार बंदरावरील वाहतूक वाढत असल्याने, रेल्वे आणि रस्त्याने त्याची जोडणी करण्याची योजना पुढे आली. त्यातूनच चाबहार आणि जाहेदान रेल्वेमार्गाचा विचार झाला. हा रेल्वे मार्ग ७०० किमी लांबीचा असेल. २०१६ मध्ये भारतीय रेल्वेचे IRCON आणि इराण रेल्वे कन्स्ट्रक्शन यांच्यात या संबंधी करार झाला आहे.

चाबहार बंदराच्या विकासासाठी भारताने कोट्यवधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. भारताची प्रमुख स्पर्धा चीनच्या बंदराबरोबर आहे. चीन आणि पाकिस्तानच्या ग्वादर बंदराशी स्पर्धा करण्यासाठी भारत चाबहार बंदराला अधिक आधुनिक रुप देण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. या प्रोजेक्टमध्ये भारताला रशियाचीही साथ मिळत आहे. मुख्यम्हणजे, अफगाणिस्तानमधील तालिबन सरकारनंही भारतावर विश्वास ठेवला आहे. तालिबान सरकारनेही चाबहार बंदराजवळ गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. भारत तयार करत असलेला रेल्वे मार्ग जेवढ्या लवकर तयार होईल, तेवढी या दोन्ही देशातील मालाची वाहतूक जलदगतीने करता येणार आहे. (India and Iran)

============================

हे देखील वाचा : हा बोगदा एका स्वप्नासारखाच वाटत होता मात्र…

============================

चाबहार बंदर हे इराणच्या सर्वात व्यस्त बंदरांपैकी एक आहे. येथे मोठ्या मालवाहू जहाजांना जलद आणि सुरक्षितपणे प्रवेश मिळतो. त्यामुळेच भारतासाठी हे सर्वात सुरक्षित बंदर ठरलं आहे. याशिवाय चाबहार बंदर गुजरातमधील कांडला बंदराच्या सर्वात जवळ आहे. या दोघांमधील अंतर ५५० नॉटिकल मैल आहे. तर मुंबईपासून चाबहार ७८६ नॉटिकल मैल दूर आहे. मध्य आशियाचे प्रवेशद्वार असलेल्या या बंदरामुळे भारताला आशिया आणि युरोपबरोबर व्यापार करायला अधिक सुलभता आली आहे.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.