भारत आणि भूतान या दोन शेजारी देशांमधील मैत्रीपूर्ण संबंधामध्ये आता नवीन अध्याय लिहिला जाणार आहे. या दोन देशांमध्ये लवकरच ट्रेन चालवण्यात येणार आहे. भारताची गौरव असलेली वंदे भारत ट्रेन या दोन देशांमधून धावणार असून भूतानमध्ये उभारण्यात येणार असलेल्या माइंडफुलनेस सिटीमध्ये यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक नेण्याचा विचार आहे. ही ट्रेन चालू झाल्यावर भूतानसह आसाममधील पर्यटनही वाढीस लागणार आहे. भारतापासून 46 किमी अंतरावर ही माइंडफुलनेस सिटी उभारली जात असून भूतानच्या राजाचा हा सर्वात महत्त्वकांक्षी प्रकल्प आहे. निसर्गाला जपणारी ही माइंडफुलनेस सिटी पुढच्या काही पिढींला निसर्गाचे सामर्थ्य काय आहे, हे सांगणार आहे. यातील प्रत्येक वास्तू ही निसर्गाची कुठलिही हानी न करता उभारण्यात येत आहे. हे शहर तयार झाल्यावर त्यामध्ये जगभरातील पर्यटक येणार आहेत. या सर्वांना वाहतुकीची साधनेही उपलब्ध होणार आहेत. यात भारताची वंदे भारत ट्रेन महत्त्वाची ठरणार आहे. (India And Bhutan)
भूतान गेलेफू येथे माइंडफुलनेस सिटी उभारली जात आहे. हा प्रकल्प आसामच्या बोंगाईगावपासून फक्त 46 किलोमीटर अंतरावर आहे. भूतानमधील सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या या प्रकल्पाकडे जगाचे लक्ष लागले आहे. हा प्रकल्प फक्त भूतानसाठी नाही तर आसामसाठीही फायदेशीर ठरणार आहे. यामुळे गेलेफू पर्यंत भारतातर्फे रेल्वे लाईन टाकण्यात येत असून सहा पदरी महामार्ग बांधण्याचीही भारत सरकारची योजना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी या योजनेला मंजूरी दिली असून भारताची वंदे भारत ट्रेन या दोन देशांच्या मैत्रीमधील दुवा ठरणार आहे. या सर्वांमध्ये भूतानच्या गेलेफू येथील माइंडफुलनेस सिटी प्रकल्प मह्त्वाची भूमिका पार पाडणार आहे. गेलेफू येथील या स्मार्ट सिटीमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. (Marathi News)
भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्या कल्पनेतून गेलेफूमध्ये माइंडफुलनेस सिटीची स्थापना करण्यात येत आहे. हे शहर तयार झाल्यावर त्यात जगभरातील पर्यटक येणार आहेत. आसामपासून अवघ्या काही किलोमीटर अंतरावर जागतिक दर्जाची स्मार्ट सिटी स्थापन झाल्याने आसाममध्येही गुंतवणुकीच्या संधी निर्माण होणार आहे. रेल्वे आणि रस्त्यांसोबतच हॉटेल आणि पर्यटन उद्योग क्षेत्रातही मोठी तेजी येण्याची अपेक्षा आहे. गेलेफू येथे 1,000 चौ.कि.मी.चे हे शहर होत असून सिंगापूरसारखी त्याची रचना असणार आहे. यात नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ, रेल्वे स्थानक, जलविद्युत धरण यांचा समावेश आहे. तसेच मंदिरे, बगिचे आणि निवासस्थानेही बांधली जाणार आहेत. माइंडफुलनेस सिटी जिथे उभारण्यात येत आहे, तो गेलेफू भाग हा पर्वतीय आहे. या भागात अनेक नद्या असून त्या परिसरात जंगलही आहे. (India And Bhutan)
या सर्व वनसंपदेला कुठलिही हानी न पोहचवता, हे शहर उभारण्यात येत आहे. यातील प्रत्येक वास्तू ही निसर्गाला अनुरुप अशीच असणार आहे. भूतान देशाला निसर्गाचे वरदान आहे. सोबत येथील आध्यात्मिक वारसाही मोठा आहे. या सर्वांचा विचार या माइंडफुलनेस सिटीच्या उभारणीत करण्यात येत आहे. याशिवाय भूतानच्या सांस्कृतिक परंपराही जतन केल्या जाणार आहेत. या भागात अनेक नद्या आहेत, या नद्यांवर छोटे पुल उभारण्यात येणार आहेत. याशिवाय या शहरामध्ये विद्यापीठ, आरोग्य सेवा सुविधा, हायड्रोपोनिक ग्रीनहाऊस, सांस्कृतिक केंद्र, आध्यात्मिक केंद्र, स्थानिक कलाकारांच्या कलाकुसरीच्या वस्तूंसाठी उद्योग केंद्र यांचाही समावेश आहे. या माइंडफुलनेस सिटीची वैशिष्ट म्हणजे, येथील इमारती या पारंपारिक भुतानी शैलीपासून तयार केल्या जातील. त्यामध्ये लाकूड, दगड, आणि बांबूचा समावशे असेल. (Marathi News)
========
हे देखील वाचा : US Visas : अमेरिकेच्या व्हिसाचे किती प्रकार आहेत ?
Kolhapur News : मरून पुन्हा जीवंत होणाऱ्या माणसांच रहस्य काय ?
======
भुतानमध्ये भातशेती मोठ्या प्रमाणात होते. अशीच शेती या माइंडफुलनेस सिटीमध्ये करण्यात येणार असून पारंपारिक पद्धतीनं केलेल्या य़ा शेतीतील भात हा आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सांगण्यात येतो. त्यामुळे त्याचा या सिटीच्या माध्यमातून परदेशातही प्रचार करण्यात येणार आहे. गेलेफू भागात मोठी जैव विविधता आहे. ही जैवविविधता टिकवत ही सिटी उभारणे हे मोठे आव्हान भूतानसमोर आहे. मात्र आत्तापासून या सिटीमध्ये राहण्यासाठी परदेशातील नागरिकांनी आपली नोंदणी सुरु केली असून हा प्रकल्प पूर्णपणे सुरु झाल्यावर भारतातील नागरिकही मोठ्या प्रमाणात या माइंडफुलनेस सिटीला भेट देणार आहेत. निसर्गसंपन्न अशा या शहरासोबत आसममध्येही पर्यटन वाढणार असून त्यासाठी भारताची वंदे भारत ट्रेन तयार होत आहे. (India And Bhutan)
सई बने