भारत आज १५ ऑगस्ट २०२४ रोजी ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. ब्रिटिशांच्या जुलमातून भारतीयांची याच दिवशी मुक्तता झाली आणि भारत स्वतंत्र झाला. उद्या संपूर्ण दिवस प्रत्येक भारतीय देशप्रेमाच्या भावनेने ओतप्रोत असेल. प्रत्येक जण आपापल्या परीने हा राष्ट्रीय सण साजरा करत असतो. या दिवशी एकीकडे ध्वजारोहण होते, परेड होते तर दुसरीकडे देशभक्तीवर आधारित गाणे आणि चित्रपट मनोरंजन करत आपल्यात देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करताना दिसतात.
उद्या सार्वजनिक सुट्टी असल्याने सकाळी ध्वरोहण झाल्यानंतर तुम्ही देशप्रेमावर आधारित सिनेमे पाहून भारताच्या स्वातंत्र्याचा जटिल प्रवास, क्रांतिकारकांचे बलिदान, देशाची प्रगती आदी विविध भारताशी संबंधित सिनेमे पाहून या देशात जन्म झाला म्हणून गर्वित होऊ शकता. तर असे कोणते चित्रपट आहे जे तुम्ही उद्या पाहू शकता चला जाणून घेऊया.
लगान
आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला ‘लगान’ हा चित्रपट २००१ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे कथानक ब्रिटीश काळातील आहे. जेव्हा ब्रिटीश राज्यकर्त्यांकडे गावकरी दुष्काळ असल्याने कर कमी करण्याची मागणी करतात, तेव्हा गावकऱ्यांनी जर क्रिकेटची मॅच जिंकून दाखवली तरच कर माफ होणार, ही अट त्यांच्यापुढे ठेवली जाते. गावकरी तो खेळ शिकण्यापासून ते जिंकण्यापर्यंतचा प्रवास यामध्ये दाखवला आहे.
रंग दे बसंती
‘रंग दे बसंती’ या चित्रपटातदेखील आमिर खानची प्रमुख भूमिका आहे. कॉलेजमधील मित्रांचा गट स्वातंत्र्य सैनिकांची कथा असलेल्या डॉक्युमेंटरीमध्ये भाग घेत असताना त्यांना जाणवते की, स्वातंत्र्यसेनानींचा ज्या गोष्टींवर विश्वास होता, त्याला पाठिंबा द्यायचा. याबरोबरच आधुनिक समाजातील भ्रष्टाचार संपवण्याचे महत्त्व त्यांना समजते. या चित्रपटात आमिर खानबरोबरच सोहा अली खान, आर माधवन, शरमन जोशी आणि कुणाल कपूर यांच्याही भूमिका आहेत.
चक दे इंडिया
मुलींच्या हॉकी या खेळाविषयी असणारा चित्रपट खूप लोकप्रिय झाला होता. शाहरुख खान या चित्रपटात प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसतो. एक साधी मॅच न जिंकणारी महिला हॉकी टीम संपूर्ण जगाला आपले वेगळेपण दाखवत वर्ल्डकप जिंकते.
राझी
२०१८ ला गुप्तहेरावर आधारित ‘राझी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आलिया भट्ट या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होती. हा चित्रपट हरिंदर सिक्का यांच्या कॉलिंग सेहमत या पुस्तकावर आधारित आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तानच्या युद्धापूर्वीची गोष्ट यामध्ये दाखविली आहे.
शेरशाह
कारगिल युद्धाचे नायक कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित ‘शेरशाह’ हा चित्रपट आहे. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राने या चित्रपटात विक्रम बत्रा यांची भूमिका निभावली आहे. अभिनेत्री कियारा अडवाणीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
स्वदेस
नासाच्या एका भारतीय शास्त्रज्ञ त्याच्या मातृभूमीत काही दिवसांसाठी येतो आणि पुन्हा परदेशात जातो. या काळात मातृभूमीत तो जे अनुभवतो, गावात जे बदल, विकास करतो ते त्याला परदेशात स्वस्थ बसू देत नाही. परदेशात गेल्यानंतर त्याला मातृभूमीची लागणारी ओढ आणि तिथे जाऊन देशासाठी काहीतरी करण्याची उमेद त्याला पुन्हा भारतात आणते.
भगतसिंग
एक क्रांतिकारी स्वातंत्र्यसैनिक भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे. भगतसिंह त्याच्या धैर्यासाठी आणि बलिदानासाठी ओळखला जातो. त्याचंच चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे.
उरी: द सर्जिकल स्ट्राइक
विकी कौशलचा ‘उरी’ चित्रपट २०१६ ला रिलीज झाला. हा चित्रपट उरी येथील दहशतवादी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी लॉन्च पॅडवर केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर आधारित आहे.
एअरलिफ्ट
आखाती युद्धादरम्यान भारतीय नागरिकांच्या स्थलांतराबद्दलची ही एक सत्य कथा आहे. परदेशात आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी एक भारतीय स्वतःचा जीव धोक्यात घालून कसे भारतीयांना वाचवतो. हे या सिनेमात पाहायला मिळते.
नेताजी सुभाष चंद्र बोस: द फॉरगॉटन हिरो
हा चित्रपट भारतातील प्रमुख स्वातंत्र्यसैनिकांपैकी एक नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे जीवनचरित्र रेखाटतो. तसेच त्यांचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान दर्शवतो.