ऑगस्ट महिना सुरु झाला की, वेध लागतात ते स्वातंत्र्य दिनाचे. १५ ऑगस्ट हा दिवस संपूर्ण देशात नव्हे नव्हे संपूर्ण जगात भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. १५० वर्ष भारतावर राज्य करून, भारतीयांवर अनेक पाशवी अत्याचार केल्यानंतर ब्रिटिशांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले. ब्रिटिशांच्या जाचातून भारताला मोकळे करण्यासाठी अनेक दिग्गज लोकांनी आपल्या जीवनाची आहुती दिली. आपल्या देशावर स्वतः पेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या असंख्य देशप्रेमी लोकांनी प्राणांची बाजी लावून भारताला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी योगदान दिले.
या सर्व महान लोकांच्या अनन्यसाधारण कार्याचे आणि त्यांच्या मृत्यूचे चीज झाले आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्यात यश मिळाले. त्या दिवसापासून १५ ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय उत्सव असणाऱ्या या १५ ऑगस्टला खूप मोठे महत्व आहे. उद्या आपण आपला ७८ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत त्या निमित्ताने जाणून घेऊया काही विशेष आणि महत्वाच्या गोष्टी.
१५ ऑगस्ट हा राष्ट्रीय सण साजरा करताना विविध थीम ठरवल्या जातात. यावर्षी ‘विकसित भारत’ या थीमवर स्वातंत्र्यदिनाचा सण साजरा केला जाणार आहे. मागील वर्षी स्वातंत्र्यदिनाची थीम ‘राष्ट्र प्रथम, सदैव प्रथम’ ही होती. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याची 100 वर्षे पूर्ण होत असताना भारताला विकसित देश बनवणे हेच देशाचे ध्येय आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी दिल्ली येथील लाल किल्ल्यावर येतील. त्याआधी ते विविध शक्तिस्थळांना भेट देऊन आदरांजली वाहतील. लाल किल्ल्यावर आल्यानंतर भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याला सुरुवात होईल. पंतप्रधानांना सशस्त्र दल आणि पोलीस दलाच्या जवानांकडून औपचारिक गार्ड ऑफ ऑनर दिला जाईल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावर राष्ट्रध्वज फडकवतील. ध्वजारोहण होत असताना दुसरीकडे राष्ट्रगीत वाजवले जाऊन २१ तोफांची सलामी दिली जाते.
======
हे देखील वाचा : १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीमधील फरक
======
ध्वजारोहण झाल्यानंतर पुढील कार्यक्रम सुरु होईल. यात नरेंद्र मोदी देशाला संबोधित करतील. त्यानंतर संपूर्ण जगाला भारताची सांस्कृतिक विविधता, लष्करी सामर्थ्य आणि तांत्रिक प्रगती दाखवणारी एक भव्य दिव्य अचंभित करणारी परेड संपन्न होईल. या परेडमध्ये भारतीय सशस्त्र दल, भारतीय पोलीस, राष्ट्रीय कॅडेट कॉर्प्सच्या विविध रेजिमेंट, लष्करी जवानांची परेड यात सहभागी असतात. यानंतर शाळकरी मुलांचे आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होतील.
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी पहिल्यांदा लाल किल्ल्यावरून 15 ऑगस्ट 1947 रोजी तिरंगा झेंडा फडकावला होता. ध्वजारोहणानंतर पंतप्रधानांनी देशाला याच किल्ल्यावरून संबोधित केले होते. ती परंपरा आजतागायत सुरू आहे.