हिंदुत्व आणि हिंदू धर्मात मोठा फरक आहे. हिंदुत्व म्हणजे द्वेषाची भावना आहे, जी सावरकरांनी 40 च्या दशकात पसरवली होती. ज्याचा उद्देश हिंदूंचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा होता. तत्वज्ञान भारत हा हिंदूंचा आणि हिंदूंसाठी होता, हे वक्तव्य आहे, इल्तिजा मुफ्ती यांचे. इल्तिजा ही जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची मुलगी आहे. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी, म्हणजेच पीडीपीच्या नेत्या असलेल्या इल्तिजा यांनी हिंदुत्वाला आजार म्हटले आहे. त्यांच्या या बेताल वक्तव्याचा सर्व थरातून निषेध कऱण्यात येत आहे. इल्तिजा मुफ्ती या यापूर्वीही आपल्या वक्तव्यांनी वादात सापडल्या होत्या. स्वतः लंडनविद्यापीठाच्या पदवीधर असलेल्या इल्तिजा यांनी काश्मिरमधून कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचा विरोध केला आहे. आता इल्तिजा त्यांच्या या नव्या वक्तव्यांनी पुन्हा वादात सापडल्या आहेत. (Iltija Mufti)
इल्तिजा मुफ्ती यांनीही त्यांच्या सोशल मिडियावर केलेल्या वक्तव्यामुळे सध्या वाद सुरु झाला आहे. मुफ्ती यांनी केलेले वक्तव्य म्हणजे, मुफ्ती कुटुंबाची पुढची पिढीही भारतविरोधी आंदोलनाचा भाग असल्याचा पुरावा आहे, अशा शब्दात इल्तिजा यांच्या विधानांचा विरोध होत आहे. गेल्या काही दिवसापूर्वी काश्मिरमधील व्यावसायिकाला जय श्रीराम म्हणण्यास सांगितल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला होता. हा व्हिडिओ आपल्या सोशल अकाउंटला पुन्हा शेअर करत इल्तिजा मुफ्ती यांनी इस्लामच्या नावाखाली होणारी संवेदनाहीन हिंसा ही प्रथमतः इस्लामोफोबियाचे कारण बनली आहे. आज हिंदू धर्म, देखील अशाच परिस्थितीत सापडतो जिथे अल्पसंख्याकांना मारण्यासाठी आणि अत्याचार करण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे. याशिवाय हिंदुत्व हा एक रोग आहे. त्याने देवाच्या नावाला कलंक लावला आहे, जय श्री रामचा नारा देत लिंचिंग होत असल्याचा धक्कादायक आरोपही इल्तिजा मुफ्ती यांनी केला आहे. या सर्वात इल्तिजा मुफ्ती यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरही टिका केली आहे. इल्तिजा म्हणतात, हिंदुत्व आणि हिंदू धर्मात मोठा फरक आहे. (Latest News)
हिंदुत्व ही वीर सावरकरांनी 1940 च्या दशकात प्रसारित केलेली द्वेषाची विचारधारा आहे. पण माझा असा विश्वास आहे की इस्लामप्रमाणेच हिंदू धर्म देखील धर्मनिरपेक्षता, प्रेम आणि करुणेचा पुरस्कार करणारा धर्म आहे. त्यामुळे मुद्दाम खराब करू नये, असेही त्यांनी सांगितले आहे. याआधी इल्तिजा यांनी मंदिर-मशीद वादावर वादग्रस्त विधान केले होते. इल्तिजा मुफ्ती म्हणाल्या होत्या की, हे लोक मशिदींखाली मंदिर शोधत नाहीत, तर त्यांना वाटते की त्यांची व्होट बँक मशिदीखाली सापडेल. आम्ही मुस्लिमांना त्रास दिला हे त्यांना दाखवायचे आहे. तिथेच त्यांची व्होट बॅंक आहे. इल्तिजा यांच्या विधानावरही अनेकांनी टिका केली होती. जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांची कन्या असलेल्या इल्तिजा मुफ्ती या 37 वर्षाच्या आहेत. पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे भविष्य म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. उच्चशिक्षित असलेल्या इल्तिजा या यापूर्वी अनेकवेळा वादात सापडल्या आहेत. विशेषतः केंद्र सरकारनं 370 कलम रद्द केल्यावर त्यांनी अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. अर्थात एवढं करुनही इल्तिजा या मुफ्ती परिवाराच्या पारंपारिक मतदारसंघातून निवडणूक जिंकू शकल्या नाहीत. (Iltija Mufti)
========
हे देखील वाचा : मुघलांचे वंशज आज कोलकात्याच्या झोपडपट्टीत राहतात !
========
जम्मू काश्मिरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी आपण निवडणूक लढणार नाही, असे आधीच जाहीर केले होते. त्यांच्या जागेवर त्यांची कन्या इल्तिजा मुफ्ती या उभ्या होत्या. नवीन नेतृत्व, आणि पारंपारिक मतदारसंघ म्हणून इल्तिजा याचा विजय निश्चित मानण्यात येत होता. बिजबेहरा हा 25 वर्षांपासून मुफ्ती कुटुंबाचा बालेकिल्ला होता. त्यात इल्तिजा यांना ऩॅशनल कॉन्फरन्सच्या बशीर अहमद शाह वीरी यांच्याकडून सुमारे 10 हजार मतांनी हार पत्करावी लागली. जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीचे संस्थापक मुफ्ती मोहम्मद सईद यांची नात आणि मेहबुबा मुफ्ती यांची मुलगी म्हणून इल्तिजाकडे पीडीपीची आगामी वारसदार म्हणून बघण्यात येते. मात्र पहिल्याच निवडणुकीत इल्तिजा पराभूत झाल्याच शिवाय पीडीपीचे अस्तित्वही जवळपास संपुष्ठात आल्यासारखे झाले आहे. 370 कलम रद्द केल्यापासून इल्तिजा या आपल्या आईचे, मेहमुबा मुफ्ती यांचे सोशल मिडिया अकाउंट सांभाळत आहेत. इल्तिजा यांनी दिल्ली विद्यापीठातून राज्यशास्त्रात पदवी प्राप्त केली आहे. लंडनच्या वारविक विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये पीजी पदवी मिळवली आहे. ऑगस्ट 2019 पासून त्या काश्मिरच्या राजकारणात सक्रीय झाल्या. मात्र आत्तापर्यंत फक्त वादग्रस्त विधानांशिवाय अन्य काहीही त्यांच्या पदरात पडले नाही. आत्ताही त्यांनी नव्यानं वादग्रस्त विधाने करीत आपल्याच पक्षाला अडचणीत टाकले आहे. (Latest News)
सई बने