Home » एक छोरी सबपे भारी: २०२१ ची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना (Smriti Mandhana)

एक छोरी सबपे भारी: २०२१ ची सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना (Smriti Mandhana)

by Team Gajawaja
0 comment
ICC Women's cricketer of the year: Smriti Mandhana Marathi info
Share

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद दरवर्षी ज्या खेळाडूंनी वर्षभर क्रिकेटमध्ये चांगली खेळी केली आहे, अशा सर्वात्तम क्रिकेटपटूचे नाव घोषित करते. नुकतीच आयसीसीने सर्वात्तम खेळाडूंची नावे जाहीर केली. या यादीमध्ये ‘सर्वात्तम महिला क्रिकेटपटू’ ठरली आहे, भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मंधाना (Smriti Mandhana). 

यावर्षी जाहीर करण्यात आलेल्या आयसीसीच्या यादीमध्ये भारतीय क्रिकेट संघातील एकाही खेळाडूचा सामावेश झाला नाही. परंतु, स्मृती मंधाना (Smriti Mandhana) या महिला क्रिकेट खेळाडूने मात्र भारतीयांची मान उंचवली. गेल्या काही वर्षांपासून डावखुरी खेळाडू स्मृती मंधाना (Smriti Mandhana) एका वेगळ्याच फॉर्ममध्ये असून, ती क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये उत्तम कामगिरी करताना दिसून येतेय.  

Smriti Mandhana, Indian Woman Cricketer

स्मृती मंधानाची भारतातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये तुलना होत असते. गेल्या वर्षी स्मृतीने एकूण २२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि त्यामध्ये ३८.८६ च्या सरासरीने ८५५ धावा केल्या. या दरम्यान तिने एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत. 

गेलं वर्ष भारतीय महिला क्रिकेट संघासाठी फारसं चांगलं नसलं, तरी स्मृती मंधानाची कामगिरी मात्र नेत्रदीपक होती. दक्षिण आफ्रिकेबरोबरच्या एका दिवसाच्या सामन्यात ८० तर ‘टी 20’ सामन्यात ४८ नाबाद धावा फटकावून तिनं संघाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रोलियामधेही ‘डे नाईट कसोटी’ सामना खेळताना तिची शतकी खेळी आणि इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातली ७८ धावांची अप्रतिम खेळी संस्मरणीय ठरली.

स्मृतीने आपल्या युवा कारकिर्दीत दुसऱ्यांदा हा पुरस्कार आपल्या नावे करून दाखविला आहे. डिसेंबर २०१८ मध्ये, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) तिला वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा ‘रॅचेल हेहो-फ्लिंट’ पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. सध्या ती मर्यादित षटकांच्या भारतीय संघाची उपकर्णधारसुद्धा आहे. पुढच्या कालावधीमध्ये ती भारतीय महिला संघाची कर्णधार पदावरसुद्धा पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाही. 

    

स्मृती मंधाना (Smriti Mandhana) – कारकिर्दीचा आलेख 

महाराष्ट्राच्या सांगलीत जन्मलेल्या स्मृती मंधाना डाव्या हाताने फलंदाजी करण्यासाठी ओळखले जाते. स्मृतीला तिच्या भावामुळे क्रिकेट खेळण्याची आवड निर्माण झाली. वयाच्या ९ व्या वर्षी तिची महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील संघात निवड झाली. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिले नाही.  

=====

हे देखील वाचा: दी ॲशेस! तब्बल १३९ वर्षांपूर्वी सुरु झालेल्या ॲशेस मालिकेची रंजक कहाणी

=====

अंडर-१९ नंतरच्या काही स्पर्धांमध्ये स्मृतीच्या उत्तम खेळाचे प्रदर्शन पाहून तिला चॅलेंजर ट्रॉफीसाठी बोलावण्यात आलं. २०१३ साली स्मृतीने तिच्या कामगिरीच्या जोरावर भारतीय महिला संघात स्थान मिळवले. 

आत्तापर्यंत स्मृती मंधाना हिने भारतासाठी चार कसोटी, ६२ एकदिवसीय आणि ८४ टी 20 सामने खेळले आहेत. कसोटी सामन्यात तिने ४६.४२ च्या सरासरीने ३२५ धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.

Smriti Mandhana

वनडेमध्ये तिने ४१.७० च्या सरासरीने २३७७ धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये तिच्या नावावर चार शतके आणि १९ अर्धशतके आहेत. टी 20 मध्ये तिने २५९३ च्या सरासरीने १९७१ धावा केल्या आहेत आणि चार अर्धशतके झळकावली आहेत.

आयसीसीच्या या सन्मानाने स्मृती मंधानाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सचिन तेंडुलकरपासून विराट कोहलीपर्यंत सर्वांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच स्मृतीच्या कामगिरीमुळे अनेक मुलींना प्रेरणा मिळत आहे. स्मृतीचा आदर्श ठेवून पुरुषांची मक्तेदारी समजल्या जाणाऱ्या या खेळाकडे आता कित्येक मुली उत्तम कारकीर्द म्हणून पाहू लागल्या आहेत.    

– स्वप्नील शहा        


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.