गुजरातमधील एक आयएएस अधिकारी, त्याची पत्नी आणि एका छपरी गुंडाच्या प्रेमाच्या त्रिकोणाची चर्चा सर्वत्र होत आहे. गुजरात केडरच्या या आयएएस अधिका-याची पत्नी वर्षापूर्वी एका गावगुंडाच्या प्रेमात पडली. या गुंडाबरोबर तिनं व्यवसाय सुरु केला. यासाठी मोठं कर्ज घेतलं. मग हे कर्ज फेडण्यासाठी दोघांनी एका मुलाचे अपहरण केलं. या अपहरणाच्या गुन्ह्यातून वाचण्यासाठी ही पत्नी पुन्हा आपल्या आयएएस पतीच्या घरी आली. पण हा पती रहात असलेल्या घरात तिला प्रवेश मिळाला नाही. तेथील सुरक्षा रक्षकांनी तिला दारातच रोखलं. मग निराश झालेल्या या पत्नीनं विष पिऊन आपले जीवन संपवले. तिच्यासोबत एक पत्रही सापडलं आहे. (Surya Jay Suicide Story)
यात आयुष्याच्या या अधोगतीबाबत तिला पश्चाताप झालेला दिसून आला. आयएएस अधिका-याच्या पत्नीचं हे प्रेमप्रकरण आणि त्यातून तिनं केलेली आत्महत्या ही बातमी सध्या सोशलमिडियावर सर्वाधिक चर्चेत आली आहे. याबरोबरच त्या आयएएस अधिका-याची आणि त्याच्या मुलांची मानसिक अवस्था कशी झाली असेल, याचीही चर्चा आहे.गुजरात केडरचे आयएएस अधिकारी रणजीत कुमार सध्या चर्चेत आले आहेत. यांच्या पत्नीने त्यांच्या घरासमोरच विष पिऊन आत्महत्या केली आहे. ४५ वर्षाचे रणजीत कुमार आणि पत्नी सूर्या जय यांच्यात काही दिवसापासून वाद चालू होता. त्यासाठी कारण म्हणजे, सूर्या जय या एका गुंडाच्या प्रेमात पडल्या होत्या. त्यामुळे २०२३ पासूनच हे दाम्पत्य वेगळे रहात होतं आणि त्यांच्या घटस्फोटाची प्रक्रिया चालू होती.
गेल्या ९ महिन्यापासून सूर्या जय या आपला प्रेमी असलेला गुंड, हायकोर्ट महाराज याच्यासोबत रहात होत्या. या ९ महिन्याच्या काळात सूर्या यांनी हायकोर्ट महाराज सोबत एक व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यासाठी घेतलेले मोठे कर्ज फेडण्यासाठी या दोघांनी चक्क एका मुलाचे अपहरण करुन त्याच्या पालकांकडे खंडणी मागितली. सूर्या हा मुलाच्या अपहरण प्रकरणातील प्रमुख आरोपी ठरल्या. तामिळनाडू पोलीसांचा त्यांच्यापर्यंत तपास आल्यावर घाबरलेल्या सूर्या यांना आपल्या आयएएस पतीची आठवण झाली. गुन्ह्याच्या या दलदलीतून आपला पती आपल्याला वाचवेल, अशी आशा त्यांना होती. मात्र त्यांच्या घराचे दरवाजे उघडलेच नाहीत. मग हताश झालेल्या सूर्या यांनी विष पिऊन आपले जीवन संपवले. (Surya Jay Suicide Story)
अतिशय दारुण अशा कहाणीतील सूर्या जय या दोन मुलांच्या आई होत्या. तामिळनाडूच्या संपन्न घरातील सूर्या यांचा विवाह गुजरात वीज नियामक आयोगात सचिव पदावर असलेले आयएएस अधिकारी रणजीत कुमार यांच्याबरोबर झाला. या दोघांच्या आयुष्यात वर्षापूर्वी हायकोर्ट महाराजा या नावाचा गुंड आला. सूर्या जय आणि या हायकोर्ट महाराजाची जवळीक एवढी वाढली की त्या चक्क या गुंडाबरोबर पळून गेल्या. तेव्हाही ही बातमी गुजरातमध्ये चांगलीच गाजली. एका आयएएस अधिका-याची पत्नी आणि दोन मुलांची आई गुंडाबरोबर पळून गेली. या बातमीमुळे रणजीत कुमार यांच्यावर मोठा आघात झाला. त्यांनी दोन मुलांना सांभाळत पत्नी सूर्या जयच्या विरोधाक घटस्फोटाचा खटला दाखल केला.
===================
हे देखील वाचा : एक ऑडी आणि आयएएस अधिकारी
====================
इकडे गुंडाबरोबर पळून गेलेल्या सूर्या यांनी सलून व्यवसाय सुरु केला. यासाठी हायकोर्ट महाराजाने एसएस कॉलनी, मदुराई येथील महिला फायनान्सरकडून ७५ लाख रुपये कर्ज घेतले. हे कर्ज फेडण्यासाठी त्यानं आणखी एका ठिकाणाहून कर्ज घेतले. या कर्जाचे हप्ते सूर्या फेडत होती. मात्र एका ठिकाणाहून पैसे घेऊन दुसऱ्या ठिकाणचे कर्ज फेडल्याने ती अधिकच कर्जबाजारी झाली. हे कर्ज फेडण्यासाठी सूर्याला हायकोर्ट महाराजानं चक्क कर्ज देणा-याच्याच मुलाचे अपहरण करण्याची युक्ती सांगितली. त्याला सूर्या यांनी होकार दिला. २ कोटी रुपयांसाठी या फायनान्सरच्या मुलाचे अपहरण करण्यात आले. मात्र पोलीसांनी मुलाची सुटका केली. तामिळनाडूच्या मदुराई पोलिसांनी सूर्या, महाराजा आणि त्याचा सहकारी सेंथिल कुमार यांच्यावर अपहरणाचा आरोप लावला. (Surya Jay Suicide Story)
आता या प्रकरणात अटक होणार हे निश्चित झाल्यावर सूर्या यांना आपल्या आयएएस पतीची आठवण झाली. अटक टाळण्यासाठी त्या त्यांच्या नव-याच्या घरी आल्या. मात्र तेव्हा रणजीत हे घरी नव्हते. घराच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांना रोखल्यावर विष पिऊन त्यांनी जागीच आत्महत्या केली. त्यांच्या सोबत एक चिट्ठीही सापडली असून त्या या सर्व अपहरण नाट्याचा खुलासा करण्यात आला आहे. यात सूर्या यांनी आपल्या आयएएस पतीचे आभार व्यक्त केले आहेत. तो एक चांगला पिता आणि पती असल्याचेही लिहिले आहे. अर्थात सूर्या यांनी आपण चांगली पत्नी आणि आई होऊ न शकल्याची खंत व्यक्त केली आहे. एक आयएएस अधिका-याची पत्नी ते एका गावगुंडाची प्रेयसी अशी ओळख मिळालेल्या सूर्या यांची दुःखद कहाणी त्यांच्या मृत्यूनंतर संपुष्टात आली.
सई बने