Home » भाजपविरोधात पवार थेट मैदानात

भाजपविरोधात पवार थेट मैदानात

by Correspondent
0 comment
Sharad Pawar Resigns
Share

श्रीकांत नारायण

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरातील काही सदस्यांच्या कंपन्यांवर गेल्या काही दिवसापासून आयकर खात्याने धाडीचे सत्र सुरू केल्यामुळे स्वतः शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे संतप्त झाले असून उभयतांनी थेट भाजपविरोधात शड्डू ठोकले आहेत.

देशाच्या राजकारणात श्री शरद पवार यांचा नेहमीच ‘पॉवरफुल मराठा लीडर ऑफ महाराष्ट्रा’ असा उल्लेख केला जातो. या ‘पॉवरफुल्ल लीडर’ लाच केंद्रात सत्तेत असलेल्या भाजप सरकारने डिवचले आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर येथे पायी जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोर्चावर मोटारी घुसवून काही शेतकऱ्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या घटनेची श्री शरद पवार यांनी ‘जालियनवाला बाग हत्याकांडांशी’ तुलना केली त्यामुळेच केंद्रातील भाजप सरकारने सूडबुद्धीने पवार यांच्या घरातील सदस्यांच्या कंपन्यांवर धाडीचे सत्र सुरू केले असा ‘राष्ट्रवादी’ चा आरोप आहे.

राजकारणात कोण कोणाविरुद्ध आणि कशाबद्दल आरोप करतील याला आता मुळीच धरबंद राहिलेला नाही. असे सर्व आरोप ‘सोयी’नुसार केले जात असल्यामुळे अशा आरोपांमध्ये तथ्य नाही असे गृहीत धरले तरी आयकर खात्याच्या धाडीमुळे स्वतः शरद पवार संत्रस्त झाले असून त्यांनी यापुढील निवडणुकांमधून भाजपला खड्यासारखे बाजूला करा असे जनतेला आवाहन केले आहे.

याशिवाय भाजपच्या विरोधात त्यांनी येत्या ११ ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ ची हाकही दिली आहे. महाराष्ट्रातील तमाम जनता पवार घराण्याच्या पाठीशी आहे हे दाखविण्यासाठी आता महा विकास आघाडीतील तिन्ही पक्ष हा ‘बंद’ शंभर टक्के यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील यात शंका नाही.

वास्तविक महाराष्ट्रात शिवसेनेला भाजपशी काडीमोड घ्यायला लावून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्याबाबत खुद्द शरद पवार यांनीच पुढाकार घेतल्यामुळे केंद्रातील भाजप सरकार त्यांच्यावर नाराज झाले होते. तेंव्हापासूनच शरद पवार यांना पर्यायाने महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्यासाठी शह-काटशह देण्याचे प्रयत्न सुरू झाले. मध्यंतरी केंद्र सरकारने आपल्या अखत्यारीत स्वतंत्र सहकार खाते निर्माण करून महाराष्ट्रात रुजलेल्या आणि प्रामुख्याने पवारांच्या ताब्यात असलेल्या सहकारी सत्तेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न करणे हा त्याचाच एक भाग होता.

विरोधकांकडे कसल्याच प्रकारची सत्ता ठेवायची नाही असा केंद्रात सत्तारूढ असलेल्या भाजपने जणू काही विडाच उचलला असून त्यामुळेच ‘ईडी’, ‘एनसीबी’, ‘आयकर खाते’ अशा सरकारी एजन्सींचा सर्रास दुरुपयोग केला जात असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. आता खुद्द शरद पवार व अजित पवार यांनाच त्याची झळ पोहोंचल्यामुळे त्यांच्या समर्थनासाठी उद्या ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत. अजित पवार यांच्या संदर्भात पुण्यात नुकतीच त्याची झलकही पाह्यला मिळाली आहे. त्यापार्श्वभूमीवर सोमवारचा ‘महाराष्ट्र बंद’ कशा प्रकारे ‘यशस्वी’ करण्यात येतो ते महत्वाचे ठरणार आहेत.

राज्यात नुकत्याच झालेल्या काही जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतील घटकपक्षांना भाजपच्या तुलनेत  चांगल्या जागा मिळाल्या आहेत. स्थानिक राजकारण गृहीत धरले तरीही ग्रामीण भागातील जनतेकडून महा विकास आघाडीला पाठिंबा मिळत असल्याचा हा एक पुरावा आहे. विशेष म्हणजे या निवडणुका महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या घटक पक्षांनी स्वतंत्रपणे लढविल्या होत्या. म्हणजे युती न करताही भाजप इतक्याच जागा  मिळू शकत असतील तर युती केल्यावर भाजपचा चांगलाच पराभव होऊ शकतो हे लक्षात घेऊनच शरद पवार यांनी आगामी निवडणुकांमध्ये तिन्ही पक्षांना एकत्रितपणे निवडणूक लढविण्याचे आवाहन केले आहे.

पवारांचा हा प्रयोग जर यशस्वी झाला तर ते म्हणतात त्याप्रमाणे भाजपला निदान महाराष्ट्रात तरी खड्यासारखे दूर करता येऊ शकते. शेवटी शरद पवार हेच महाविकास आघाडी सरकारचे शिल्पकार असल्यामुळे भाजपविरोधात स्थापन झालेल्या महा विकास आघाडीचे सरकार टिकविण्यासाठी  त्यांचे म्हणणे ऐकणे काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांना भाग आहे. मुंबई, पुणे आदी महापालिकांच्या आगामी निवडणुकांमध्ये त्याचे प्रत्यंतर येऊ शकते. .

वास्तविक २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात भाजप सरकार सत्तेत आल्यापासून सुरुवातीला शरद पवार यांनी भाजपबद्दल खूपच नरमाईचे धोरण स्वीकारले होते. महाराष्ट्रात तर सुरुवातीला अल्पमतात असलेल्या फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने  बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यावेळी शरद पवार यांच्या ‘विश्वासार्हते’बद्दलही पुन्हा एकदा शंका निर्माण झाली होती. त्यानंतरही त्यांनी मोदी-शहा यांच्याशी जमवून घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले होते.

मात्र महाराष्ट्रात महा विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात पवार यांनीच पुढाकार घेतल्यापासून त्यांच्या भाजपविरोधाला धार आली. मध्यंतरी शरद पवार यांनीच पुढाकार घेऊन भाजपविरोधात सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला होता. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्येही त्यांचा भाजपविरोधात सर्व विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न राहीलच यात शंका नाही. निदान महाराष्ट्रात तरी ते हा प्रयोग यशस्वीपणे राबविण्याची शक्यता आहे. तसे झालेच तर भाजपच्या दृष्टीने ते मोठे आव्हान ठरणार आहे.

वास्तविक पाहता शरद पवार हे पहिल्यापासूनच भाजपविरोधात होते. मात्र आता अलीकडील काही घटनांमुळे विशेषतः धाडीच्या सत्रांमुळे त्यांची भाजपविरोधाची धार आणखीनच तीव्र झाली आहे. कारण आयकर खात्याच्या धाडी आता पवारांच्या ‘दारा’त आल्या आहेत उद्या त्या ‘घरात’ही येऊ शकतात. त्यामुळेच पवार यांनी भाजपविरोधात थेट मैदानात उतरण्याचे निश्चित केले असावे. ‘भाजपला खड्यासारखे बाजूला ठेवा’ ही अटीतटीची भाषा त्यातूनच जन्माला आली असावी.

शरद पवार म्हणतात त्याप्रमाणे निदान महाराष्ट्रात तरी जनता भाजपाला खड्यासारखे दूर करेल का ? या प्रश्नाचे उत्तर नजीकच्या काळातच मिळू शकेल.

– श्रीकांत नारायण
 (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत)

टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.