Home » मी मलाला नाही, मी माझ्या काश्मिरमध्ये सुरक्षित आहे…

मी मलाला नाही, मी माझ्या काश्मिरमध्ये सुरक्षित आहे…

by Team Gajawaja
0 comment
Share

‘मी मलाला नाही…मी काश्मीरमध्ये सुरक्षित आहे आणि भारत माझा देश आहे’ या परखड शब्दात थेट ब्रिटीश संसदेतून पाकिस्तान आणि भारताला सल्ला देऊ पहाणा-या मलाला युसुफझाईना खडे बोल सुनावणा-या याना मीरचे(Yana Mir) समस्त भारतीयांतर्फे कौतुक करण्यात येत आहे. याना मीर(Yana Mir) या जम्मू काश्मिरमध्ये काम करणा-या पत्रकार आहेत. ब्रिटिश संसदेत केलेल्या भाषणात त्यांनी काश्मिरला पाकिस्तानचा भाग सांगणा-यांना इशारा दिला आहे. याना(Yana Mir) यांच्या भाषणानं भारतीयांची मने जिंकली आहेत. याना (Yana Mir)यांचे भाषण ब्रिटीश संसदेत संकल्प दिनानिमित्त झाले. ब्रिटीश संसदेतून त्यांनी पाकिस्तानला आरसा दाखवल्याची चर्चा सोशल मिडियावर सुरु झाली आहे.

याना मीर (Yana Mir)यांचा जन्म काश्मिरचा आहे. त्या रियल काश्मीर न्यूजच्या मुख्य संपादक आहेत. त्यांचा जन्म झाला तेव्हा काश्मिरमधील वातावरण अस्थिर होते. त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण काश्मिर खोऱ्याबाहेर झाले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी एमबीए केले. याना यांचे वडिल पोलीस दलात होते. तर त्यांचे काका सरपंच होते. दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घालून ठार केले. या घटनेनं याना यांच्या मनावर खोलवर परिणाम झाले. शिक्षण झाल्यावर अन्य कुठल्याही शहरात स्थाईक होण्याऐवजी त्यांनी काश्मिरमध्ये स्थाईक होण्याचा निर्णय घेतला. पत्रकारिता आणि सामाजिक कार्य यातून त्या काश्मिरच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

याच याना मीर (Yana Mir) यांना ब्रिटीश संसदेतून भाषण करायची संधी मिळाल्यावर त्यांनी पहिल्यांदा थेट वार केला तो पाकिस्तान आणि मलाला युसुफझाईनवर. काही महिन्यापूर्वी पाकिस्तानी वंशाची मलाला युसुफझाईने एका प्रश्नावर काश्मिरी मुले आणि महिलांच्या सुरक्षेची खूप काळजी वाटत असल्याचे ट्विट केले आहे. नोबेल पुरस्कार प्राप्त मलाला मुळ पाकिस्तानची असली तरी तेथील हिंसेमुळेच तिला तिचा देश सोडावा लागला आहे. युरोपमध्ये रहाणा-या मलालानं भारताला काश्मिरबद्दल सल्ला दिल्यामुळे तिच्यावर अनेक भारतीयांनी टिका केली होती. याना मीर यांनीही याच मलालाला आपल्या भाषणातून सडेतोड उत्तर दिले आहे.

मलाला युसुफझाईचा संदर्भ देतच याना यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. ती मलाला नाही, जिला दहशतवादाच्या भीतीमुळे आपला देश म्हणजेच पाकिस्तान सोडावा लागला. त्यांच्या या वक्तव्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला. ब्रिटीश संसदेने आयोजित केलेल्या ‘रिझोल्यूशन डे’ मध्ये बोलतांना याना यांनी आंतरराष्ट्रीय मीडियालाही काही सल्ले दिले. जम्मू-काश्मीरमधील लोकांमध्ये फूट पाडणे थांबवावे, असे रोखठोक आवाहन त्यांनी आंतरराष्ट्रीय मिडियाला केले. याना यांच्या प्रत्येक वाक्याला टाळ्या पडत होत्या.

=========

हे देखील पहा : पाकिस्तानातील सर्वाधिक Haunted ठिकाण

=========

काश्मिरबाबत बोलतांना याना(Yana Mir) म्हणाल्या की, ‘मी काश्मीरची आहे, काश्मिर म्हणजे, जगातील सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. जगभरातून पर्यटक येथे बर्फाच्छादित दऱ्या पाहण्यासाठी येतात. परंतु मी मलाला युसूफझाई होणार नाही, कारण मी स्वतंत्र आणि सुरक्षित आहे. माझ्या काश्मीरमध्ये. मी माझ्या भारतात, माझ्या घरी काश्मीरमध्ये शांततेने राहते. काश्मिर जो भारताचा एक भाग आहे. मी भारतात पूर्णपणे सुरक्षित आहे. काहीही झाले तरी मला माझ्या देशातून कधीही पळून जावे लागणार नाही. तसेच याना (Yana Mir)यांनी मलालाचे आपल्या भाषणातून चांगलेच कान टोचले आहेत, ‘मलालाने माझ्या देशाची बदनामी केल्याबद्दल माझा आक्षेप आहे. माझ्या पुरोगामी मातृभूमीला शोषित म्हणून उल्लेख केला आहे. सोशल मीडिया आणि आंतरराष्ट्रीय मीडियाच्या अशा सर्व टूलकिट सदस्यांनी कधीही भारताला भेट देण्याची तसदी घेतली नाही. दूर देशात राहून, एसी रुममध्ये बसून भारतावर टिका करणे हे चांगले नाही. वस्तुस्थिती काय आहे, हे पाहण्यासाठी माझ्या देशात नक्की या, असे आमंत्रणही याना यांनी भारतावर टिका करणा-या मलाला आणि तिला पाठिंबा देणा-या मिडियाला दिले आहे. तसेच आपल्या भाषणाच्या शेवटी याना यांनी ‘तुमच्या यूकेच्या राहत्या घरातून आणि न्यूज रूममधून रिपोर्टिंग करून भारतीय समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न थांबवा. माझ्या काश्मिरी समाजाला शांततेत जगू द्या. असे आवाहनही केले आहे.

याना मीर (Yana Mir)यांच्या भाषणावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. यानानं मलाला आणि तिच्या पाठिराख्यांना, पाकिस्तानला आंतराष्ट्रीय मंचावर जाऊन सडेतोड उत्तर दिले आहे. याना काश्मिरच्या विकासासाठी कार्यरत आहे. एप्रिल 2021 मध्ये, यानाने काश्मीरमध्ये ला फॅशन शो आयोजित करुन काश्मिर कपड्यांची योग्यता आणि कलाकुसर दाखवून दिली होती. कोविडच्या काळात काश्मीर खोऱ्यातील विविध भागांमध्ये आवश्यक वस्तूंचे वितरण त्यांनी केले आहे. याशिवाय विस्थापित काश्मीर पंडित समाजाच्या हक्कांसाठी याना वारंवार आवाज उठवत आहे. यानाला तिच्या कार्याबद्दल डायव्हर्सिटी ॲम्बेसेडर पुरस्कारही मिळाला आहे.
सई बने…


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.