मुंबईच्या छोट्या छोट्या गल्लीतून मोठमोठ्या गणपतीच्या मूर्ती आणल्या जातात. मोठमोठ्या मंडळाच्या गणपतींचे आगमन, विसर्जन धूमधड्याक्यात अगदी गाजावाजा करत होतात. मुंबईच्या प्रत्येक गल्लीबोळातून “गणपती बाप्पा मोरया” चा नाद घुमतो आणि मुंबईत तर हा गणपती उत्सव तर दिमाखात साजरा होतो. खासकरून लालबाग आणि परळ भागातल्या गिरणगावांमधल्या गणेशोत्सवाची बातच और असते, नाही का…! तर समाजाला एकसंध ठेवणाऱ्या सार्वजनिक गणपती उत्सवाची सुरुवात कशी झाली आणि कोणी केली याचं उत्तर आज प्रत्येकालाच माहित आहे. पण जेव्हा गणेशोत्सवाची सुरुवात झाली होती, तेव्हा आजच्या एवढ्या उंच गणपती मुर्त्या बनवल्या जात नव्हत्या. आपण आज सगळीकडे उंच आणि आकर्षक मूर्ती बघून असं एकदा तरी वाटलं असेल की, या उंच गणपती मूर्ती साकारण्याची सुरुवात कुठून झाली आणि देशातली सर्वात पहिली उंच मूर्ती कोणत्या शिल्पकाराने साकारली? हे जाणून घेऊ. (Dinanath Veling)
तर देशातली सर्वात पहिली उंच मूर्ती बनली लालबागमध्ये आणि बनवणारे मूर्तिकार होते- कै. दिनानाथ वेलिंग. आज ते मास्तर दिनानाथ या नावाने प्रसिद्ध आहेत. त्यांनी १९७७ साली कोणताही साचा न वापरता अवघ्या २१ दिवसांत २२ फुटी भव्य गणेश मूर्ती साकारली. जी भारतातली पहिली उंच मूर्ती ठरली. कमळावर विराजमान असलेल्या या गणरायाचं रूप बघून सगळे थक्क झाले होते. कारण कोणीच या आधी गणपतीची इतकी उंच प्रतिमा पाहिलीच नव्हती. त्यामुळे वेलिंग यांच्या कामाचं खूपच कौतुक झालं. आता जो कमळावर बसलेल्या गणपतीचा फोटो बघितल्यावर तुम्हाला कळलं असेल की, लालबाग एरियातलं नक्की कोणतं मंडळ आहे. तर मुंबईचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेलं, २२ फुट वाले की जयचा जयघोष ज्या मंडळात होतो, तेच गणेशगल्ली मधलं लालबाग गणेशगल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ! आणि इथूनच पुढे सुरु झाला मुंबईत उंच गणेश मूर्तींचा ट्रेंड! (Dinanath Veling)
दिनानाथ वेलिंग मुळचे गोव्याचे. वयाच्या आठव्या वर्षी ते मुंबईत आले. त्यांनतर पुढे त्यांनी जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिल्पकलेत डिप्लोमा केला. मुंबई सेंट्रल येथे श्री. दाजी कांदळगावकर यांच्यासोबत काम करताना त्यांनी शिल्पकलेचे बारकावे शिकून घेतले. विशेष म्हणजे, दादरच्या शिवाजी पार्कमधील छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा साकारण्यात त्यांनी श्री. गणेश पानसरे यांना मार्गदर्शनही केलं होतं.
================
हे देखील वाचा : Ashtavinayak : अष्टविनायकांमधील तिसरा गणपती- सिद्धटेकचा सिद्धिविनायक
================
साल १९७७, गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीपासून मास्तर दिनानाथ यांनी मूर्ती बनवायच्या तयारीला सुरुवात केली. मग मूर्तीसाठी ट्रॉली बनवण्यापासून ते विसर्जनाच्या मार्गाचा विचार करण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचा बारीकसारीक विचार करून त्यांनी कामाला सुरुवात केली. २१ दिवसांत २२ फुटी भव्य गणेश मूर्ती तयार झाली. त्यांनतर ती मंडपात आणि विसर्जनाच्या मिरवणुकीत सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. गणपतीचा भव्य हात प्रत्येकाला आशीर्वाद देतोय, असं भाविकांना वाटत होतं. (Dinanath Veling)
विसर्जनादिवशी मूर्ती विसर्जनासाठी निघाली तेव्हा चिंचपोकळीच्या पुलावर खरी कसोटी सुरु झाली. कारण या पुलावरून मूर्ती नेणं सोपं नव्हतं आणि पहिल्यांदाच इतकी उंच मूर्ती त्या पुलावरून जाणार होती. मास्तरांच्या अंदाज आणि तर्कानुसार पुलावरून नेताना काहीच अडचण आली नाही. मंडळातील एका ज्येष्ठ सभासंदानी सांगितलं की, जेव्हा मूर्तीने पूल ओलांडला, तेव्हा वेलिंग मास्तर गर्दीत उभे राहून हा सोहळा पाहत होते आणि त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले होते. त्यानंतर मास्तर दिनानाथ यांच्या यशस्वी प्रयत्नामुळे आज आपल्याला सार्वजनिक गणेशोत्सवात उंच गणपतीच्या मूर्ती पाहायला मिळतात आणि गणेशगल्लीच्या मंडळाने आणि वेलिंग मास्तरांमुळे “मुंबईचा राजा” ही ओळख अजरामर झाली. (Top Stories)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics