मध आपल्या सर्वांच्या घरात अगदी सहज मिळणारा पदार्थ आहे. मध हे अनेक पदार्थांमध्ये वापरले जाते. साखरेला किंवा गुळाला उत्तम पर्याय म्हणून मध जेवणात वापरले जाते. याशिवाय मध हे आरोग्याच्या दृष्टीने देखील खूपच लाभदायक आहे. हिवाळ्यात तर मध आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अमृत मानले गेले आहे. सर्दी खोकला किंवा घशाची खवखव कमी करण्यासाठी मध हा घरगुती उपायांपैकी प्रामुख्याने वापरला जाणारा एक उपाय आहे.
मधाची उपयुक्तता पाहून प्रत्येक घरामध्ये मध हे वर्षानुवर्षे ठेवलेले असते. मात्र कधी घर साफ करताना अचानक जुनी मधाची बाटली सापडली की ती फेकायची की ठेवायची हे समजत नाही. बाटलीवर असणारी एक्सपायरी डेट उलटून गेलेली असताना देखील मध चांगल्या स्थितीमध्ये दिसत असते. मग द्विधा मनस्थिती होते आणि ते फेकावे की नाही असा प्रश्न पडतो. चला मग आज जाणून घेऊया मधला एक्सपायरी डेट असते का? आणि मध जास्त काळ घरात ठेवले तर ते खराब होते का?
आयुर्वेदामध्ये मधाला अमृत म्हटले आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी रोज मध खाणे चांगले मानले जाते. प्रत्येक वातावरणात आणि ऋतूमध्ये मधाचे सेवन फायदेशीर आहे. मध चांगल्या प्रकारे ठेवल्यास ते लवकर खराब होत नाही. मध जास्त काळ टिकवण्यासाठी हवाबंद बाटलीत भरून ते सूर्यप्रकाशापासून लांब थंड ठिकाणी ठेवा. अधिक काळ ठेवल्यामुळे मध जाड होते आणि त्याचा कधी कधी रंगही बदलतो. मात्र मधाच्या गुणवत्तेत कोणताही बदल होत नाही.
तुम्हाला माहित आहे का? की, मध कधीच खराब होत नाही आणि त्याच्या नैसर्गिक स्वीटनरची शेल्फ लाइफ असते, मात्र FSSAI (भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण) यांच्या नियमानुसार सर्व पॅकेज केलेल्या खाद्यपदार्थांवर एक्सपायरी डेट म्हणजेच त्या पदार्थाची कालबाह्यता तारीख टाकणे बंधनकारक आहे. त्यामुळे, जेणे आपण बाजारातून ब्रँडेड पॅकेज फूड घेतो त्यावर एक्सपायरी डेट असते. अशी डेट पॅक केलेल्या मधाच्या उत्पादनांवर देखील येते.
मधामध्ये मॉईश्चर कमी प्रमाणात असते तसेच ते अॅसिडीक असल्याने दीर्घकाळ टिकते. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल प्रोटीन्स आणि एन्झाईम्स तसेच अँटीऑक्सिडंट्स असतात. यामुळे ते कधीही खराब होत नाही. बराच काळ घरात पडलेले मध देखील पुन्हा वापरता येते. त्याचा प्रत्येक थेंब खाण्यासारखा असतो. मध योग्य बाटलीत न साठवल्यास तसेच दमट वातावरणात ठेवल्यास त्यामध्ये मायक्रोऑर्गेनिझम व बॅक्टेरियाचीची वाढ होते. परिणामी मध खराब होते. जर मध क्रिस्टलाईज्ड झाले असेल म्हणजेच त्यामध्ये खडे झाले असतील तर बाटली बाऊलभर गरम पाण्यात ठेवून बाहेर कढा. म्हणजे त्यामधील खडे वितळतील. मधाशिवाय साखर, मीठ, तांदूळ, व्हाईट व्हिनेगर, कॉर्न स्टार्च, शुद्ध व्हॅनिला अर्क या वस्तू देखील जर योग्य साठवल्या तर त्या देखील अनेक वर्षे खराब होत नाहीत.
मध आपल्या शरीरासाठी खूपच उपयुक्त आहे. मधाचा वापर शरीरावर झालेल्या जखमा भरण्यासाठी होतो. मधाच्या सेवनामुळे शरीरातील चरबी कमी होते. मध ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत असून त्याने शरीराला ताकद मिळते. त्वचेच्या मॉईश्चराइजिंगसाठी मध हा उत्तम उपाय आहे. खोकल्यावर मध हा घरगुती रामबाण उपाय असून त्याने घशाची जळजळ कमी होते. झोपण्यापूर्वी गरम दुधात मध घालून प्यायल्याने निद्रानाशाचा त्रास कमी होतो.
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही दावा करत नाही. )