देशातील पहिली नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी गुजरातमधील गांधीनगर येथे आहे. भारतातील फॉरेन्सिक सायन्स आणि गुन्ह्यांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विद्यापीठाचे आंतराष्ट्रीय विद्यापीठात रुपांतर केले आहे. भारतात गेल्या काही वर्षात या विद्यापीमार्फत गुन्हे उकल करण्यासाठी मोठा हातभार लावण्यात येत आहे. यामध्ये फक्त भारतातीलच नव्हे तर परदेशातील विद्यार्थीही मोठ्या संख्येनं फॉरेन्सिक सायन्स संदर्भात शिक्षण घेण्यासाठी येत आहेत. याशिवाय देशातील अनेक पोलीसांना सोबत न्यायाधिशांनाही या विद्यापीठात विशेष प्रशिक्षण देण्यात येत आहे. भारतातल्या या पहिल्या नॅशनल फॉरेन्सिक सायन्सेस युनिव्हर्सिटीची कार्य जाणून घेणे गरजेचे आहे. (University)
गांधीनगर येथे असलेल्या गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीचे रुपांतर आता नॅशनल फॉरेन्सिक युनिव्हर्सिटी असे झाले आहे. गुजरात फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटीची स्थापना गुजरात सरकारने 2008 मध्ये केली होती. 2020 मध्ये या विद्यापीठाचे विस्तारीकरण करण्यात आले. भारताबाहेर युगांडा येथे विद्यापीठाचे पहिले कॅम्पस, चालू करण्यात आले. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाल्यावर हे विद्यापीठ आता आंतरराष्ट्रीय विद्यापीठ बनले आहे. (University)
बदलत्या काळात गुन्हेगारीचे स्वरुपही व्यापक झाले आहे. अशा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी सक्षम अशी प्रणाली गरजेची होती. त्यानुसार या विद्यापिठात आवश्यक ते बदल करण्यात आले आणि नवीन अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. हे विद्यापीठ गांधीनगर परिसरात 50,000 चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे. यामध्ये अनेक उपयुक्त असे अभ्यासक्रम आहेत. त्यात सेंटर फॉर इंटरनॅशनल रिलेशन, सायबर डिफेन्स सेंटर, सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स, सेंटर फॉर बॅलिस्टिक रिसर्च आणि चाचण्या, इंटरनॅशनल सेंटर फॉर ह्युमॅनिटेरियन फॉरेन्सिक्स, सेंटर फॉर फ्युचरिस्टिक डिफेन्स स्टडीज, फॉरेन्सिक इनोव्हेशन सेंटर, इन्व्हेस्टिगेटिव्ह आणि फॉरेन्सिक सायकोलॉजी लॅब आदी अभ्यासक्रम या विद्यापिठात शिकवले जातात. (University)
या विद्यापिठाच्या मार्फत कुशल प्रयोगशाळा सहाय्यक आणि अधिकारी तयार करण्याचे काम चालू आहे. या क्षेत्रात अधिकाधिक प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त झाले पाहिजेत, यादृष्टीनं विद्यापीठाच्या अभ्यासक्रमांचे स्वरुपही बदलण्यात आले आहे. या विद्यापिठाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाल्यापासून विद्यार्थ्यांना 65 हून अधिक अभ्यासक्रमांद्वारे डिजिटल फॉरेन्सिक ते एक्सप्लोसिव्ह फॉरेन्सिक्सपर्यंतच्या क्षेत्रात विशेष प्रशिक्षण देण्याचे काम चालू आहे. विद्यापिठाचे वैशिष्ट म्हणजे, यात फक्त नवीन विद्यार्थीच येतात असे नाही तर अन्य विदयापिठातील प्राध्यापक आणि केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे कर्मचारी, अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच इडी, प्राप्तिकर विभाग आणि महसूल गुप्तचर संचालनालय तसेच स्थानिक पोलिसांनाही प्रशिक्षित करण्यात येते. याशिवाय फौजदारी आणि दिवाणी प्रकरणांमध्ये फॉरेन्सिक सायन्सचा कसा वापर करावा याचीही माहिती करुन देण्यात येत आहे. (University)
या विद्यापीठातील विद्यार्थी शिकत असतांना पोलीसांना मदतही करीत आहेत. दिल्ली पोलिसांना सहकार्य करीत फॉरेन्सिक विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी जवळपास 15 मोबाईल शोधून दिले आहेत. तसेच अन्य गंभीर गुन्ह्यामध्येही या विद्यापिठातील विद्यार्थी तपास कार्यात मदत करीत आहेत. फॉरेन्सिक विद्यापिठात सध्या भारतभरातील विद्यार्थी आहेत. कर्नाटक, आसाममधील तरुण पोलिसांच्या तुकड्या कॅम्पसमध्ये विशेष प्रशिक्षण घेत आहेत. याशिवाय विद्यापीठात न्यायाधीश, बँकर्स आणि ऑडिटर्सनांही प्रशिक्षित करण्यात येत आहे. (University)
==========
हे देखील वाचा : पाकिस्तानने सर्वात प्रथम बनवला होता कंप्युटर वायरस
==========
सध्या गुन्हेगारीचे स्वरुप बदलले आहे. अनेक गुन्हेगार गुन्हा करतांना आपण या गुन्ह्यात अडकू नये यासाठी खूप खबदारी घेतात. त्यांच्या हाताचे ठसेही गुन्ह्याच्या ठिकाणी दिसत नाहीत. त्यासाठी हे गुन्हेगार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. या सर्वांवर वचक ठेवण्यासाठी फॉरेन्सिक विद्यापिठात अनेक अभ्यासक्रम शिकवले जातात. गुन्ह्यांचे निराकरण करण्यात एजन्सींना मदत करण्यासाठी फॉरेन्सिकमध्ये कुशल मनुष्यबळ भरण्याच्या या विद्यापिठाचा प्रयत्न आहे. या विद्यापिठाची लोकप्रियता आणि गरज फक्त भारतातच आहे, असं नाही तर परदेशातही या विद्यापिठातील अभ्यासक्रमाची माहिती आहे, आणि तेथून अनेक विद्यार्थी गांधीनगरला येत आहेत. विद्यापीठात आयोजित कार्यशाळा आणि कार्यक्रमांमध्ये 70 देश सहभागी झाले आहेत. आणि अन्यही देशांकडून या विद्यापिठातील अभ्यासक्रमात सहभागी होण्याबाबत विचारणा होत आहे. यामध्ये अफ्रिकी देशांची संख्या मोठी आहे.
सई बने