भारत असो किंवा शेजारचे पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे देश असो… सगळीकडे क्रिकेटचाच बोलबाला आहे. भारत, पाक आणि लंकेनंतर जगाला सर्वात ग्रेटेस्ट क्रिकेटर्स दिले आहेत. आता भारत तसा हिंदूबहुल देश पण तरीही इथे अनेक मुस्लिम ग्रेट प्लेयर्स झाले आहेत. तर पाकिस्तान, बांगलादेश हे मुस्लिम राष्ट्र तरी इथे अनेक नॉन मुस्लिम खेळाडू आले आहेत. श्रीलंकेमध्ये तर लिजंड मुथय्या मुरलीधरन या तमिळ हिंदूने जागतिक क्रिकेटविश्व गाजवलं आहे. पण असाच एक क्रिकेटपटू झाला होता, ज्याचा जन्म मूळचा आपल्या गोव्याचा पण तो खेळला मात्र पाकिस्तानच्या टीमकडून,कोण होता तो क्रिकेटर, जाणून घेऊ. (Cricket)
भारत हिंदूबहुल देश असूनही इथे सलीम दुर्राणी, मन्सूर अली खान पतौडी, सय्यद किरमाणी, मुहम्मद अझरुद्दीन, झहीर खान, मुहम्मद कैफ, इरफान पठाण, मुहम्मद शमी असे अनेक क्रिकेट मैदान गाजवणारे खेळाडू झाले आहेत. यातले दोन म्हणजे पतौडी आणि अझरुद्दीन तर देशाचे कॅप्टनसुद्धा झालेत. पण क्रिकेटविश्वात एक असा क्रिकेटपटू होऊन गेलाय, ज्याचा जन्म भारतातला म्हणजेच आपल्या गोव्यातल्या नागवाचा… पण तो पोहोचला थेट पाकिस्तानच्या क्रिकेट टीममध्ये…. तो क्रिकेटपटू म्हणजे एंताओ डिसुझा ! (Antao D’Souza)
एंताओ (Antao D’Souza) यांचा जन्म १९३९ साली गोव्यात झाला होता. आता नावावरून तुम्हाला कळून चुकलच असेल की ते एक ख्रिश्चन होते. पाकिस्तान टीमकडून खेळणारे ते दुसरे ख्रिश्चन खेळाडू… पाकिस्तानकडून एकूण चार ख्रिश्चन खेळाडू झाले आहेत, ते म्हणजे वॉलिस मथिआस, एंताओ डिसुझा, डंकन शार्प आणि चौथा युसूफ योहाना, ज्याने पुढे धर्मांतर करून मुहम्मद युसूफ हे नाव ठेवलं. भारताची फाळणी झाल्यानंतर एंताओ यांचं कुटुंब गोव्यावरून पाकिस्तानच्या कराचीमध्ये स्थलांतरित झालं. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला अधिकृत पाकिस्तानचीच नॅशनालिटी मिळाली. त्यांचे भाऊ विन्सेंट डिसूझा आणि जोसेफ डिसूझा हेसुद्धा पाककडून फर्स्ट क्लास क्रिकेट खेळले होते.
६० च्या दशकात पाकिस्तान आपल्या पिकवर होता. अनेक ग्रेट बॅट्समन आणि बॉलर पाकिस्तानात होते. त्याच काळात २० वर्षांच्या एंताओ यांना पाकच्या संघात संधी मिळाली आणि त्यांनी १९५९ साली डेब्यू केलं. एंताओ ऑल राउंडर होते. त्यांचं करिअर तसं फारसं काही ग्रेट राहिलं नाही. ३ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी ६ टेस्ट मॅच खेळल्या ज्यामध्ये त्यांनी ७६ रन्स केले आणि १७ विकेट्स घेतल्या. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये त्यांनी ६१ मॅचमध्ये ८१५ रन्स करून १९० विकेट्स घेतले होते. (Cricket)
===============
हे देखील वाचा : Dhananjay Munde : मुंडेंचा मंत्रीपदाचा राजीनामा, संतोष देशमुख यांना न्याय मिळणार ?
==============
जगात केवळ दोनच टेस्ट क्रिकेटपटू आहेत, जे १० इनिंग्ज खेळले आहेत आणि तरीही त्यांचा बॅटिंग एव्हरेज त्यांच्या हायेस्ट स्कोर पेक्षा जास्त आहे. एक म्हणजे एंताओ डिसुझा आणि दुसरे म्हणजे सदाशिव शिंदे. सदाशिव शिंदे हे शरद पवार यांचे सासरे. आता कळलच असेल पवार साहेबांना क्रिकेटचं नॉलेज कुठून मिळाल ते. असो… सध्या एंताओ डिसुझा कॅनडामध्ये शिफ्ट झाले असून तिथेच राहतात. ख्रिश्चन क्रिकेटपटूंच्या व्यतिरिक्त दोन हिंदू क्रिकेटर्स पाकिस्तानकडून खेळलेले आहेत, ते म्हणजे अनिल दलपत आणि दानिश कनेरिया….(Cricket)
बांगलादेशमध्येही बरेच हिंदू खेळाडू आहेत, यामध्ये आलोक कपाली, लिटन दास, सौम्य सरकार यांनी बांगलादेश क्रिकेट गाजवलं आहे. तसं खेळाला धर्माचं बंधन नसलं, तरी धर्मावरून अनेकदा हिंदू क्रिकेटपटूंवर दबाव टाकण्यात आला होता. यामध्ये दानिश कनेरिया हे प्रमुख नाव… कनेरियाचा धर्मावरून खुपदा डिवचलं गेलं आहे. याशिवाय एकदा तर पाकिस्तानचा क्रिकेटपटू अहमद शहजाद हा श्रीलंकेच्या तीलकर्तने दिलशानला मुस्लिम होण्याचे धडे देत होता. त्यावेळी त्याच्यावर प्रचंड टीका झाली होती. मुळात क्रिकेट खेळणाऱ्या माणसाचा धर्म कोणताही असो पण तो जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा त्याचा एकच धर्म असला पाहिजे, तो म्हणजे क्रिकेट !