हवामान बदलले की लगेचच त्याचा परिणाम आपल्या आजूबाजूच्या गोष्टींवर आणि मुख्यत्वे आपल्या शरीरावर जाणवायला लागतो. बदलत्या हवामानामुळे आपल्याला छोट्या – मोठ्या आजारांची लगेचच लागण होते. यात खासकरून सर्दी, खोकला आणि ताप येण्याच्या तक्रारी अधिकतर उद्भवतात.
एकीकडे सर्दी आणि ताप बरा होण्यास सुरुवात झाली की लगेच खोकल्याचा त्रास सुरु होतो. कधी कधी हा त्रास अधिक बळावतो. त्यातही कोरडा खोकला हा जास्त त्रासदायक असतो. कोरड्या खोकल्याची ढास लागण्याचा त्रास अनेकांना होत असतो. कधी कधी रात्री तर हा खोकला पूर्ण हैराण करून सोडतो. खोकून खोकून त्या माणसाची छाती दुखू लागते.
खोकल्याचा त्रास कमी प्रमाणात असला तरीही त्यावर उपाय करणे आवश्यक असते. यासाठी तुम्ही घरगुती उपचारांची मदत नक्कीच आपल्याला मदत होते. सर्दी, खोकला होणे ही छोटी समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे कधी कधी गंभीर परिणाम होतात. चला तर जाणून घेऊया खोकल्यावर घरगुती उपाय.
मध
कोरड्या खोकल्याचा त्रास दूर करण्यासाठी तुम्ही मधाचे सेवन करू शकता. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा मध घालून ते पाणी प्यावे. यामुळे खोकला व घशातील खवखव कमी होते.
लसूण
लसूण प्रकृतीने उष्ण आहे. त्यात अँटिबॅक्टीरियल गुण असतात. लसणाच्या काही पाकळ्या तुपात तळून घ्याव्या आणि त्या गरम-गरम खाव्या त्याने गळ्याला शेक मिळतो. कोरड्या खोकल्यासाठी लसूण रामबाण औषध मानले जाते.
आलं आणि गूळ
गुळाचा वापर करणं, त्याचं सेवन करणं हे आपल्या शरीरासाठी आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. एका भांड्यात थोडासा गूळ गरम करून, त्यात आलं किसून त्याचा रस मिक्स करावा. आता हे मिश्रण थोड्या थोड्या वेळाने चाखावे. यामुळे कोरडा खोकला कमी होईल.
तुळशीची पाने
कोरड्या खोकल्याची समस्या दूर करण्यासाठी तुळशीची पाने देखील खूप फायदेशीर आहेत. रात्री झोपण्यापूर्वी तुळशीची काही पाने मधासोबत खावीत. यामुळे तुमचा खोकला खूप कमी होईल.
काळी मिरी आणि मीठ
एका भांड्यात कुटलेली किंवा पावडर केलेली काळी मिरी घेऊन त्यात थोडेसे मीठ घाला. नंतर त्यामध्ये थोडे मधही घाला. झोपण्यापूर्वी नियमितपणे या मिश्रणाचे सेवन केल्यास रात्री कोरडा खोकला येत नाही.
गरम पाणी आणि मध
गरम पाण्यात मध मिसळून प्यायल्याने रात्री येणारा कोरडा खोकला तर दूर होतोच. पण गरम पाण्यामुळे घशाला शेक मिळून घशाच्या अनेक समस्याही दूर होऊ शकतात. रात्री झोपण्यापूर्वी गरम पाण्यात थोडा मध मिसळून त्याचे सेवन करावे.
हळदीचे दूध
एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून नियमित प्या. कोरड्या खोकल्याची समस्या अगदी काही दिवसांत कमी होईल. हळदीमध्ये कर्रक्युमिन नावाचे घटक असते. या घटकामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाशी संबंधित कित्येक आजारांचा त्रास कमी होतो.
गुळ
सर्दी आणि खोकल्यावर गूळ खाणे हा प्रभावी उपाय आहे. गुळातील पोषक घटकांमुळे जमा झालेला कफ बाहेर पडण्यास मदत मिळते.
ज्येष्ठमधाचा चहा
ज्येष्ठमधाचा चहा प्यायल्यानंतर कोरडा खोकला कमी होतो. हा चहा तयार करण्यासाठी कपभर पाण्यामध्ये दोन मोठे चमचे ज्येष्ठमधाची पावडर उकळत ठेवा. १० ते १५ मिनिटे पाणी उकळू द्या. यानंतर कपामध्ये चहा गाळून घ्या. हवे असल्यास चहामध्ये मध मिक्स करू शकता.
कोमट पाणी
रात्री झोपताना कोमट पाण्याने भरलेला ग्लास जवळ ठेवा. खोकल्याची उबळ आल्यास त्यातले दोन घोट पाणी प्या. यामुळे शोष कमी होतो आणि उबळ थांबते.
सुंठ आणि साखर
सुंठीची पूड साखरेत एकत्र करून रात्री झोपण्यापूर्वी घ्यावी.चहा- कृष्ण तुळशीची १५-२० पाने, ५ ते ६ लवंगा, ५- ६ मिरीचे दाणे, एक इंच लांब सुंठ एक जुडी गवती चहा, सुपारीच्या अर्ध्या खांडाएवढा गुळाचा एक खडा. हे सर्व नीट बिनदुधाच्या कोऱ्या चहात घालून रात्री प्यावे.
(टीप : कोणताही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)