हिवाळा सुरु झाला की, खाण्याची नुसती चंगळ असते. अनेक भाज्या या ऋतूमध्ये मिळतात. हिवाळा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सर्वात चांगला ऋतू समजला जातो. या ऋतूमध्ये आपण जेवढी ऊर्जा कमावतो ती वर्षभर आपल्याला पुरते असे म्हटले जाते. त्यामुळे हा ऋतू खूपच महत्वाचा असतो. हिवाळ्याच्या दिवसांचे जेवढे फायदे तेवढे तोटे देखील आहे. या ऋतूमध्ये हवा कोरडी असते. त्यामुळे त्याचा आपल्या त्वचेवर परिणाम होतो आणि त्वचा कोरडी होते.
परिणामी केस देखील कोरडे व्हायला लागतात. आणि केस रुक्ष होणे, कोरडे होणे, त्यात कोंडा होणे अशा अनेक केसांच्या समस्या सुरु होतात. अशा वेळी अनेक उपाय करूनही कधी कधी त्या ठीक होत नाही. मग हिवाळ्यात केसांची काळजी घ्यावी तरी कशी? या मोठ्या आणि महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया हिवाळयात केसांची काळजी कशी घ्यावी.
हेअर पॅक लावा
थंडीच्या वातावरणात हेअर पॅक लावणे अतिशय आवश्यक आहे. यामुळे केसांना खोलवर पोषण मिळते. केसांमधील नैसर्गिक ओलावा टिकून राहण्यासही मदत मिळते. नैसर्गिक हेअर पॅकमुळे टाळूची त्वचा निरोगी राहते आणि केसांना मॉइश्चराइझर देखील मिळते. याव्यतिरिक्त तुम्ही कोरफड आणि आयुर्वेदिक तेलापासून तयार केलेल्या हेअर मास्कचाही वापर करू शकता.
केसांना कंडिशनर लावणे
अनेक जणं हेअर वॉशनंतर कंडिशनर लावणे विसरतात किंवा कंटाळा करतात. मात्र याचा वाईट परिणाम केसांवर होऊ शकतो. असे केल्याने केस अधिक कोरडे होतात. थंडीच्या दिवसांत हेअर वॉश केल्यानंतर न विसरता कंडिशनरचा वापर करावा.
कोमट पाण्याने केस धुणे
केस धुण्यासाठी अधिक गरम पाण्याचा वापर करू नये. यामुळे केसांचे मोठे नुकसान होते. केस धुण्यासाठी अधिक गरम आणि खूप थंड पाणी वापरू नये. केस स्वच्छ धुण्यासाठी कोमट पाण्याचा उपयोग करावा. गरम पाण्यामुळे टाळूची त्वचा कोरडी होते. ही त्वचा निरोगी असल्यास केसांशी संबंधित समस्या निर्माण होत नाहीत. टाळूची त्वचा कोरडी झाल्यास कोंडा, केसगळती, केस तुटणे इत्यादी समस्या होऊ शकतात.
केसांना तेल लावा
केसांना नियमित तेल लावणे आवश्यक आहे. तेलाच्या मदतीने केसांचा मसाज करावा आणि थोड्या वेळासाठी तेल आपल्या केसांमध्ये राहू द्यावे. तेल मसाजमुळे टाळूच्या त्वचेला पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो.
भरपूर पाणी प्यावे
निरोगी शरीरासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. भरपूर पाणी प्यायल्याने केस आणि त्वचेलाही लाभ मिळतात. त्वचेसह केस देखील हायड्रेट राहतात. हिवाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी.
हीटिंग टुलचा कमी वापर
बहुतांश जणं हेअरस्टाइलसाठी हीटिंग टुलचा अधिक प्रमाणात वापर करतात. यामुळे केसांचे मोठे नुकसान होते. शिवाय कलर ट्रीटमेंटमुळेही केसांचे प्रचंड नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी हीटिंग टुलचा वापर कमी प्रमाणात करावा.
शॅम्पू
सौम्य शाम्पू वापरा ज्यामध्ये रसायने नसतात. त्यात SLS नसावे. हे तुमच्या केसांची आर्द्रता टिकवून ठेवण्यास मदत करेल.
केस जास्त धुवू नका
हिवाळाच्या दिवसात रोज केस धुणे टाळावे. तुम्ही जर रोज केस धुवाल तर केसांमधून नैसर्गिक तेल कमी होऊन जाते, ज्यामुळे केस कोरडे आणि रुक्ष होऊ लागतात. आठवड्यातून दोनपेक्षा जास्त वेळा केस न धुण्याचा प्रयत्न करा. हिवाळ्यात केस धुताना मिड शॅम्पूचा वापर करा.
मोठ्या दातांचा कंगवा वापरा
थंडीच्या दिवसात तुमचे केस कोरडे होऊन अधिकच गुंतागुंतीचे झाले असतील तर तुम्ही मोठ्या दाताच्या कंगव्याचा वापर करा. कारण नॉर्मल किंवा पातळ कंगव्याने केसांची गुंता सोडवताना केस जास्त प्रमाणात तुटण्याची शक्यता असते.
कोरफड
टाळूच्या खाज सुटण्यासाठी आणि सीबम उत्पादन नियंत्रित करण्यासाठी कोरफड लावा. टाळूवर मसाज करा. हे केसांच्या कूपांना हायड्रेट करते. 30 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर सौम्य शाम्पूने धुवा.
SLS मुक्त शॅम्पू
SLS-मुक्त शॅम्पू वापरा. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा की ओले केस कधीही बांधू नये कारण त्यामुळे केस तुटतात.
निरोगी आहार
विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी पाण्याचे सेवन वाढवा. हे केस आणि स्कॅल्प हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते. फळे अधिक प्रमाणात खा कारण त्यात जीवनसत्त्वे आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात.
(टीप : कोणतेही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)