संध्याकाळची दिवे लागणीची वेळ म्हणजे पौराणिक मालिकांचा प्राईम टाईम असं समिकरण काही वर्षांपासून तयार झालंय. जय मल्हार, बाळू मामाच्या नावानं चांग भलं या मालिकांच्या यशानंतर गेल्या काही वर्षांत अनेक धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यक्रम छोट्या पडद्यावर अवतरले. त्यातील काहींनी टीआरपीचा उच्चांक गाठला, तर काहींना प्रेक्षकांचा समाधानकारक प्रतिसादही मिळाला नाही.
छोट्या पडद्यावरील असाच एक कार्यक्रम म्हणजे ‘घेतला वसा टाकू नको’. गेल्या वर्षी ८ मार्चला हा कार्यक्रम सुरु झाला होता. टीआरपीमध्ये कार्यक्रमानं विशेष कामगिरी न दाखवल्याने हा कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय चॅनेलकडून घेण्यात आला आहे.
‘घेतला वसा टाकू नको’ या कार्यक्रमात अनेक छोट्या छोट्या गोष्टी दाखवत उपवास का करायला हवा, अध्यात्म म्हणजे काय यांसारखे विषय उलगडले जातात. या कार्यक्रमातून अनेकदा रामायण, महाभारतातल्या गोष्टीही दाखवल्या गेल्या.

‘वेध भविष्याचा’ या कार्यक्रमातील प्रसिद्ध ज्योतिष भागरे गुरुजी कार्यक्रमाचं सुत्रसंचालन करतात. वेध भविष्याचा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते प्रेक्षकांना राशीप्रमाणे आणि वाढदिवसाप्रमाणे भविष्य सांगतात. ‘वेध भविष्याचा’ कार्यक्रमाच्या तुलनेत ‘घेतला वसा टाकू नको’ या मालिकेला प्रेक्षकांनी विशेष पसंती दर्शवली नाही. म्हणूनच निर्मात्यांनी कार्यक्रम लवकरच संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
‘घेतला वसा टाकू नको’ या मालिकेतील गोष्टीरुपी भागांमध्ये अनेक प्रसिद्ध कलाकारंनी काम केलं आहे. असं असलं तरी हा कार्यक्रम प्रेक्षकांची मनं जिंकण्यात मात्र यशस्वी ठरला नाही.
‘घेतला वसा टाकू नको’ या मालिकेच्या जागी झी मराठीवर लवकरच ‘होम मिनिस्टर’चं नवं पर्व ‘महामिनिस्टर’ पाहायला मिळेल. ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम गेली १८ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. नुकतंच झी मराठी कडून ‘होम मिनिस्टर’च्या ‘महामिनिस्टर’ या नव्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. ज्यात महाविजेतीला तब्बल ११ लाख रुपयांची पैठणी आणि अन्य बक्षिसे मिळणार आहेत.
====
हे देखील वाचा: मन उडू उडू झालं मालिकेत मोठा ट्विस्ट
====
====
हे देखील वाचा: ११ लाखांची पैठणी पाहायची उत्सुकता – आदेश बांदेकर
====
महामिनिस्टरच्या चित्रिकरणाला महाराष्ट्राचे लाडके भावोजी म्हणजेच आदेश बादेकर यांनी सुरुवात केली आहे. सध्या ते नाशिक दौऱ्यावर आहेत आणि येवल्याकडे प्रस्थान करणार आहेत. महामिनिस्टरच्या महाविजेतीला मिळणारी ११ लाखांची पैठणी ही येवल्याहून येणार असा अंदाज आहे.
महामिनिस्टर हे पर्व होम मिनिस्टरच्या आतापर्यंतच्या पर्वापेक्षा वेगळं असणार आहे. यात अनेक केंद्रावर अनेक स्पर्धकांमध्ये महामिनिस्टरचा खेळ खेळला जाईल. प्रत्येक केंद्रावरील विजेत्यांमध्ये एक अंतिम फेरी असेल आणि त्या अंतिम फेरीतील विजेतीला महामिनिस्टरच्या महाविजेतीचा मान मिळेल.