शेगाव म्हटलं की २ गोष्टी हमखास आठवतात एक म्हणजे गजानन महाराज आणि दुसरं म्हणजे जगप्रसिद्ध अशी शेगाव कचोरी ! शेगावला गेलात आणि शेगावची झणझणीत कचोरी खाल्ली नाही असं कधीच होत नाही. पण तुम्हाला माहितेय का शेगाव कचोरी म्ह्णून फेमस असलेली ही कचोरी मूळची शेगावचे नाहीचे ! पण मग ती इथे आलीच कशी, आणली कोणी ? आणि ही कचोरी इतकी फेमस कशी काय? त्याची खासियत काय? सगळं जाणून घेऊ. (Shegaon Kachori)
विदर्भातल्या शेगाव या ठिकाणी श्री संत गजानन महाराजांच भव्य मंदिर आहे. इथे विविध ठिकाणांहून भाविक येतच असतात. पण हे शेगाव आणखी एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे इथली कचोरी ! पण ही कचोरी फक्त शेगावातच नाही हा तर अगदी जळगाव, भुसावळ, अमरावती, नागपूर इथपासून ते ठाण्यातल्या विष्णूनगर, सेंट जॉन स्कूल, कल्याणमधल्या टिळक चौक, कोळसेवाडी पुण्यातल्या डी. पी. रोड, शास्त्री रोड, नारायण पेठ इथपर्यंत सगळीकडेच दिसून येते. थोडक्यात काय, तर विदर्भापासून ते अगदी पश्चिम महाराष्ट्राला जोडणारी अशी ही शेगाव कचोरी संपूर्ण महाराष्ट्रात फेमस आहे. पण तुम्हाला माहितेय का महाराष्ट्रात फेमस असणारा हा पदार्थ मूळचा मराठमोळा तर नाहीचे पण हा पदार्थ मराठी माणसाने नाही तर एका दिल्लीच्या पट्ठ्याने महाराष्ट्रात आणलाय. या माणसाचं नाव तीरथराम शर्मा ! (Top Stories)
त्याच झालं असं की, भारत पाकिस्तान फाळणीनंतर पंजाबच्या तिरथराम शर्मा यांनी दिल्लीत आपल्या उदरनिर्वाहासाठी कचोरीचे स्टॉल सुरू केले होते. तिथे मिळणारी कचोरी खूपच फेमस होती. त्याचदरम्यान म्हणजेच 1950 च्या आसपास रेल्वे स्टेशनच्या कॅन्टीनच टेंडर निघाल होतं. मग त्यांनी विदर्भातील शेगाव येथील रेल्वे स्टेशनच्या कॅन्टीनसाठी टेंडर भरलं, त्यांना ते काम मिळालं तिथे त्यांनी बनवलेली झणझणीत कचोरी लोकांना आवडू लागली आणि इथेच शेगावकरांना त्यांचं पेटंट फूड मिळालं ते म्हणजे ही शेगाव कचोरी ! (Shegaon Kachori)
सुरुवातीला ती अगदी २ आण्याला मिळायची. मग हळू हळू विदर्भात असलेल्या तिखटाची आवड ओळखून शर्मा यांनी या कचोरीच्या चवीत थोडा बदल केला. मुगाच्या डाळीऐवजी बेसन पीठ वापरायला सुरुवात केली. त्यावेळी इथल्या संत गजानन महाराजांच्या समाधी दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक या कचोरीकडे वळू लागला. पण कालांतरानं रेल्वेनं मंजूर केलेल्या दरांमध्ये ती कचोरी विकणं, तो चविष्टपणा टिकवणं अवघड झालं त्यामुळे मग ही कचोरी शेगाव स्टेशन सोडून शहरात स्थलांतरित झाली. पण शर्मा यांना या गोष्टीचा फायदा झाला. शहरात त्यांना स्टेशनपेक्षा जास्त चांगला प्रतिसाद मिळाला. शर्माजींच्या कचोरीचं नाव पाहून इतरांनीसुद्धा याच नावानं कचोरी विकायला सुरुवात केली. सुरवातीला विदर्भात फेमस असणारी ही कचोरी अगदी काहीच वर्षात संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली ! त्यामुळे क्वालिटीमध्ये कुठे जरी तडजोड झाली तर शर्मासोबतच शेगावच पण नाव खराब होणार हे त्यांनी वेळीच जाणलं. कारण ‘शेगाव कचोरी’ ही आता फक्त शर्मांची ओळख नसून ती शेगावची ओळख झाली होती. (Top Stories)
===============
हे देखील वाचा : Marine Drive एका ‘मराठी’ माणसाने बांधलय !
===============
पुढे हळूहळू या कचोरीने जळगाव, भुसावळ, अमरावती, नागपूर, कल्याण, ठाणे, पुणे इथपर्यंत पल्ला गाठला. कचोरीचं माहेरघर असलेल्या गुजरात सोबत राजस्थान, मध्यप्रदेश इथेसुद्धा तिने आपलं प्रस्थान बसवलं. सध्या तीरथराम शर्मा यांची चौथी पिढी हा व्यवसाय सांभाळते. त्यांनी शेगाव कचोरीच्या या वाढलेल्या लोकप्रियतेमुळे ‘तिरथराम शर्मा यांची शेगाव कचोरी’ अशी याला टॅगलाईन दिली. तिरथराम शर्मा यांच्या कचोरीची चव, गुणवत्ता, स्वछता हे सगळे निकष तपासल्यानंतर याला ISO मानांकन दिलं गेलं. पुढे या कचोरीच्या ग्राहकांनीच ही कचोरी परदेशातही पोहोचवली. आऊट ऑफ इंडिया हे पार्सल घेऊन जाण्यासाठी फ्रोझन कचोरी बनवली गेली. जी बाहेर 5 दिवस आणि फ्रिजमध्ये 15 ते 20 दिवस टिकते. याशिवाय स्पर्धेत टिकण्यासाठी त्यांनी आणखी काही बदल केले आणि पारंपारिक कचोरीसोबतच कचोरी सँडविच, मिक्सव्हेज कचोरी, स्पेशल जैन कचोरी, चीज कचोरी विकायला सुरवात केली. मात्र या कचोरीची चव ही जशीच्या तशी ठेवली. त्यात तडजोड केली नाही. (Shegaon Kachori)
पण शर्मा यांच्या या चविष्ट आणि झणझणीत कचोरी मागचं नेमकं गुपित काय? तर ते म्हणजे त्यातला मसाला. शर्मा यांच्या 5 मुलांकडून 16 नातवंडांकडे या मसाल्याची रेसिपी आली. पण घरातल्या माणसांव्यतिरिक्त ही कचोरी बनवण्यासाठी ते कोणालाही घेत नाहीत. थोडक्यात त्यांची रेसिपी ते कोणालाच सांगत नाहीत. त्यामुळे मार्केट मध्ये शेगाव कचोरीचा बोर्ड लावून कचोरी विकणारे कितीही आले तरी तिरथराम शर्मा अशी टॅगलाईन असलेल्या कचोरीची चव कोणाच्याही हाताला येणार नाही एवढं मात्र नक्की.