एखाद्या बकरीएवढी गाय जर तुमच्या समोर आली तर…मुळात बकरी ऐवढी गाय असते का…हाच प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर हो आहे. आंध्र प्रदेशात पुंगनूर जातीची गाय (Punganur Cow) आहे, ही जगातील सर्वात लहान गाय म्हणून ओळखली जाते. काही ठिकाणी तर घरातच या गायीला पाळलं जातं. ऋषीमुनी या गायीचा सांभाळ करत असल्याचे पुरावे आहेत. मात्र आता या पुंगनूर जातीच्या गायी (Punganur Cow) नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळेच त्यांच्या संवर्धनासाठी आंध्रप्रदेशात मोठी मोहीम राबवण्यात येत आहे. अगदी साध्या घरातही या गायींचा सांभाळ करण्यात येतो. विशेष म्हणजे या पुंगनूर गायींचे दूध आणि त्यापासून तयार होणारे तूप हे औषधी म्हणून वापरण्यात येते. तसेच पुंगनूर गायीचे गोमुत्रही औषधी असल्याची माहिती आहे.अगदी छोटूशी आणि तितकीच लोभस असणारी ही पुंगनूर गाय कोणीही आपल्या घरात सांभाळू शकता.

जगातील सर्वात लहान गाय पुंगनूर, भारतात आढळते. आता ही जगातील सर्वात लहान पुंगनूर गाय नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. ही गाय दिसायला लहान असली तरी इतर गायींसारखी पुंगनूर गाय (Punganur Cow) दूध देते आणि तिचे दूध इतर गायींपेक्षाही अधिक औषधी असते. लहान उंचीमुळे या गायीची देखभाल करण्यासही फार त्रास होत नाही. भारतात गायी पाळण्याची परंपरा आहे. आपल्या देशात साधारण गायीच्या 50 जाती आढळतात. या गायींमध्ये पुंगनूर गायींच्या जातीचाही समावेश आहे. मात्र या गायीची उंची आणि परदेशी गायींची दूध देण्याची जास्त क्षमता यामुळे पुंगनूर गायी (Punganur Cow) पाळण्याकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्याचा परिणाम म्हणजे, या गायींची संख्या कमी झाली. आता नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या गायींची जोपासना आंध्र प्रदेशात करण्यात येत आहे. आंध्र प्रदेशात पुंगनूर गायींच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक ही गाय पाहण्यासाठी आंध्रप्रदेशमध्ये भेट देत आहेत आणि गाय खरेदीही करत आहेत. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील लिंगमपट्टी गावात 4 एकरांवर पसरलेल्या गोशाळेत पुंगनूर गायीचे (Punganur Cow) संवर्धन केले जात आहे. या गोशाळेत सुमारे 300 पुंगनूर जातीच्या गायी आहेत. या गोशाळेचे मालक कृष्णम राजू यांनी 15 वर्षांपूर्वी पुंगनूर गाय खरेदी केली होती.आता त्या गायींची संख्या वाढली असून या गायींची मागणीही वाढली असल्याची माहिती त्यांनी दिली.
पुंगनूर गाय (Punganur Cow) जितकी लहान असेल तितकी तिची किंमत जास्त असते. साधारणपणे पुंगनूर गायीची एक जोडी 1 लाख ते 25 लाखांना विकली जाते.ही गाय ज्याच्याकडे फारशी जागा नाही….तेही खरेदी करु शकतात. कारण पुंगनूर गाय (Punganur Cow) फारसा चारा खात नाही. 1 ते 2 फूट लांबीच्या पुंगनूर गायींचे दूधही आरोग्यास उत्तम मानले जाते. या गाईच्या दुधात 8% फॅट असतात. तर सामान्य गाईच्या दुधात फक्त 3 ते 3.5 टक्के फॅट आढळते.

लहान आकाराची पुंगनूर गाय (Punganur Cow) दररोज 3 ते 5 लिटर दूध देते, त्यासाठी फक्त 5 किलो चारा गायीला घालावा लागतो. ही गाय कुठल्याही वातावरणात चांगली रहाते. विशेष म्हणजे ही गाय एकटी रहात नाही. सतत मनुष्य सहवासात गाय चांगली रहाते. त्यामुळे आंध्रप्रदेशातील काही घरात तिचा सांभाळ घरातील एका कोप-यात केला जातो. या गायींच्या संवर्धनासाठी आता आंध्रप्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात जागृती करण्यात येते. अनेक कुटुंबांनी आपल्या घरात या गायीला स्थान दिले आहे. आंध्र प्रदेश सरकारने मिशन पुंगनूर चालवले आहे. त्यासाठी 5 वर्षांसाठी 69.36 कोटींची तरतूद केली आहे. श्री व्यंकटेश्वर पशुवैद्यकीय विद्यापीठाने या प्रकल्पावर काम सुरू केले असून पुंगनूर गायींच्या (Punganur Cow) गुणधर्माची माहिती ते नागरिकांना देत आहेत. आता देशात फक्त 1000 पुंगनूर गायी असल्याची नोंद असून ही संख्या वाढविण्याचे प्रयत्नही विद्यापिठीतर्फे करण्यात येत आहेत. या गायीचे दूध औषधी असतेच पण गोमूत्र जीवाणूविरोधी असते. आंध्र प्रदेशात शेतकरी या पुंगनूर गायीच्या गोमुत्राचा वापर पिंकावर फवारण्यासाठी करतात. या जातीच्या गायीचे मूत्र 10 रुपये प्रति लीटर, शेण 5 रुपये किलोपर्यंत विकले जाते आणि या गायीच्या दूधाचा दर तर डोळे पांढरे करणारा आहे. हे पुंगनूर गायीचे दूध 400 ते 500 रुपये प्रतिलिटर दराने विकले जाते.
======
हे देखील वाचा : व्यायाम केल्यानंतर तुमचं डोकं दुखतं? ‘या’ गोष्टींकडे द्या लक्ष
======
या गायींचे वय आणि उंची लक्षात घेऊन तिची किंमत निश्चित केली जाते. पुंगनूर गाय पांढरी आणि हलकी तपकिरी रंगाची असते. तिचे कपाळ खूप रुंद आणि शिंगे लहान असतात. पुंगनूर गायीची सरासरी उंची केवळ 70 ते 90 सें.मी. तर पुंगनूर गायीचे जास्तीत जास्त वजन 150 ते 200 किलो पर्यंत असू शकते. पुंगनूरची शेपटी लांब असून ती जमिनीला टेकते. ही पुंगनूर गाय दिसायलाही अत्यंत देखणी असते. या गायीचे व्हिडीओही आता सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. घरात बागडणा-या या गोंडस गायीला अनेकांची पसंती आहे. एकूण काय पुंगनूर गायीबाबत उत्सुकता वाढत आहे, आणि त्यांची मागणीही…
सई बने