कॉम्प्युटर क्रांती झाली. इंटरनेट क्रांती झाली, मोबाइल क्रांती झाली… जागतिकीकरण असं एकसंध नाव या क्रांतीच्या प्रक्रियेला दिलं गेलं. जग होतं नव्हतं इतकं जवळ आलं. आजच्या एकविसाव्या शतकात तंत्रज्ञानामुळे नवीन शोधांमुळे आणि विज्ञानामुळे हे सगळं शक्य झालं.
मागच्या दोन दशकात तंत्रज्ञान वाढीचा वेग आधीपेक्षा ज्यास्त होता. अमेरिकेसारख्या देशांमध्ये आय टी क्षेत्र बहरलं. तंत्रज्ञानामुळे नवीन संकल्पना अस्तित्वात आल्या. कॉम्प्युटर, इंटरनेट, मोबाइल, वेबसाइट, ब्राउजर इत्यादि संकल्पना चर्चिल्या जाऊ लागल्या. त्याबरोबर सोशल मीडिया ही सुद्धा नवीन संकल्पना समाजामध्ये रूजली.
सोशल मीडियाला आपण मराठीत ‘समाजमाध्यमं’ असं म्हणू शकतो. व्हॉट्स ॲप, फेसबुक आणि युट्यूब ट्विटर आणि इंस्टाग्राम, टेलिग्राम या मुख्य समाजमाध्यमांसह अनेक समाजमाध्यमं सक्रिय आहेत. सोशल मीडिया म्हणजे कंटेंट तयार करण्यासाठी तसंच तो लिहिण्यासाठी आणि वेबसाइटद्वारे ऑनलाइन प्रकाशित करण्यासाठीचं साधन असं आपण म्हणू शकतो.

आजकाल तर सामान्यातल्या सामान्य व्यक्ती सोशल मीडिया सेलिब्रिटीचं बिरुद मिरवू लागला आहे. तर या सोशल मीडियाचा महत्वाचा भाग म्हणजे हॅशटॅग! विशेषतः सोशल मिडियावर ट्रेंडिंग असणारा शब्द ‘हॅशटॅग’ म्हणून वापरला जातो.
एका रात्रीत स्टार होणं, तसंच तरुणाईच्या भाषेत बोलायचं म्हणजे अचानक कुठल्याही गोष्टीमुळे “व्हायरल” होणं आणि जगभरातल्या लोकानी त्याला सोशल मीडियावर पाहणं, त्याबद्दल लिहिणं, त्याच्या पोस्ट, व्हिडिओ हे सगळं दृश्य स्वरूपात पहाणं आणि हा कंटेंट सर्वदूर पोचवला जाणं; या संगळ्याच्या मागे आहे एकच जादुई शब्द आहे, तो म्हणजे ‘हॅशटॅग’.
हॅशटॅगचा वापर अनेक कारणांसाठी केला जातो. उदा. फॉलोअर्स वाढवण्यासाठी, सामाजिक गोष्टींवर चर्चा, पाठिंबा किंवा विरोध करण्यासाठी, तसंच तुमची पोस्ट कशाबद्दल आहे, याबद्दल माहिती देण्यासाठी, आपल्या टार्गेट ऑडियन्सना तुमचं मत पोहोचवण्यासाठी आणि कुठल्याही गोष्टीचा प्रचार करण्यासाठी आपण हॅशटॅगचा वापर करत असतो.

हॅशटॅग वापरायचे काही ठराविक नियम आहेत. जे अर्थातच ढोबळमानाने बनविण्यात आले आहेत. उदा. हॅशटॅग वापरताना खूपच लांबच्या लांब वाक्य वापरू नयेत. तसंच त्यामध्ये कॉमाचा वापर करू नये. दोन तीन शब्दांचा हॅशटॅग बनवायचा असेल, तर नंतरच्या शब्दाचं पहिलं अक्षर हे कॅपिटल मध्ये लिहिलं जातं. एकाच पोस्टमध्ये ज्यास्त हॅशटॅगचा वापर करू नये. तसंच, अजून महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं अकाऊंट पब्लिक असेल, तरच हॅशटॅग तुम्ही ज्यास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता.
सगळ्यात आधी, हॅशटॅग कोणी वापरला, कधी वापरला, याची एक कहाणी रंजक आहे. ट्विटर सुरू झाल्यानंतर लोक मोठ्या प्रमाणावर संदेश पाठवत होते म्हणजे ट्विट करत होते. एक दिवस अमेरिकेत, सॅन फ्रान्सिस्कोमध्ये राहणाऱ्या गुगलच्या माजी डेव्हलपर ‘क्रिस मेसिना’ याने एक पोस्ट लिहिली. यामध्ये त्याने पाउंड चिन्हाचा (#) हॅशटॅगसारखा वापर केला.
ही गोष्ट आहे २००७ ची! मेसिना यांनी याबद्दल खुलासा केला की, त्याने ट्विटरवर पोस्ट लिहिली कारण त्याला यातून लोकाना बोलतं करायचं होतं. ऑनलाइन पद्धतीने एकत्र येऊन लोकांनी पोस्टमधील विषयावर चर्चा करावी, ही यामागची भावना होती. याशिवाय त्याला एका मुद्द्यावर वेगवेगळ्या ठिकाणाहून बोलणाऱ्या, चर्चेत भाग घेणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रियांचा संचय करायचा होता. त्याचे वर्गीकरण तयार करायचे होते.

====
हे देखील वाचा: तुम्हाला पण शिल्पा शेट्टी सारखं फिट राहायचंय? मग तिने सांगितलेली ‘ही’ योगासने नक्की पहा…
====
मेसिनाने ही कल्पना ट्विटरच्या ऑफिसमध्ये जाऊन तिथल्या लोकांना सांगितली, पण ट्विटरने त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. मेसिनाने हॅशटॅगचा वापर चालूच ठेवला.
२००७ सालीचअमेरिकेतल्या सॅन डिएगो या भागामध्ये प्रचंड आग लागली आणि लोकानी हॅशटॅगचा वापर चालू केला. एकमेकांना सद्य स्थितीबद्दल माहिती देण्यासाठी म्हणून लोकांनी याचा वापर सुरू केला. अखेर २००९ साली ट्विटरने हॅशटॅगचं महत्व ओळखलं आणि जवळपास सगळ्याच प्लॅटफॉर्मवर याचा वापर सुरू झाला.
एक नमूद करण्याची बाब म्हणजे अगदी सगळ्यात पहिल्यांदा हॅशटॅगचा वापर ‘इंटरनेट रिले चॅट’ या प्लॅटफॉर्म वर १९८८ साली केला गेला होता. आज १५ वर्षानंतर हॅशटॅग हे अत्यंत प्रभावी साधन झाले आहे. जवळपास सगळ्याच क्षेत्रात हॅशटॅगचा प्रभावी वापर सुरू झाला आहे.

====
हे देखील वाचा: ‘द कश्मीर फाइल्स’चा ट्रेलर प्रदर्शित तर चित्रपट ११ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला
====
ट्विटर ट्रेंडसाठी हॅशटॅग आवश्यक आहे. उदाहरणादाखल #METOO या हॅशटॅगने सगळ्या जगाचं लक्ष्य लक्ष वेधलं होतं. कोण काय म्हणालं, तसंच सध्या कोण काय बोलत किंवा लिहित आहे, हे पण हॅशटॅगच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल.
ही हॅशटॅगबद्दलची माहिती तर आपण वाचली, पण हॅशटॅग हे किती प्रभावी आहे, हे समजून घेण्यासाठी, मित्रानो तुम्हीसुद्धा हॅशटॅगचा वापर एकदा करून बघाच! कदाचित हॅशटॅगमुळे तुम्ही आणि तुमची मते सगळ्यांपर्यंत पोहोचाल आणि तुम्हाला त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येईल.
निखिल कासखेडीकर