गेल्या महिन्यात वर्तमानपत्रात एक छोटी बातमी वाचनात आली. डेव्हिस चषक (Davis Cup) स्पर्धेत फिनलँड कडून भारताचा पराभव. ही बातमी वाचून माझे मन ५० वर्षांपूर्वीच्या भूतकाळात गेले.
वर्ष होते १९७०, स्थळ बेंगळुरू. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात डेव्हिस चषकाचा सामना रंगला होता. रेडिओ वरून या सामन्याचे धावते वर्णन प्रसारित होत होते. भारताकडून प्रेमजीतलाल व जयदीप मुखर्जी हे खेळत होते. रामनाथन कृष्णन हे संघाचे ‘न खेळणारे कर्णधार’ होते. भारतीय जोडीने पहिले दोन एकेरी सामने जिंकून आघाडी घेतल्यावर ऑस्ट्रेलियाने दुहेरीचा सामना जिंकला त्यामुळे परतीच्या पहिल्या एकेरी सामन्याला महत्व प्राप्त झाले होते.
हा सामना प्रेमजीत लाल यांनी जिंकून भारताला विजयी आघाडी मिळवून दिली आणि अख्या देशात खुशीची लहर पसरली. सर्व वृत्तपत्रांनी या बातमीला ठळक प्रसिद्धी दिली होती. त्यावेळचा एक फोटो मला अजून आठवतो. प्रेमजीत लाल यांची पत्नी त्यांचे आनंदाच्या भरात चुंबन घेतानाचा तो फोटो होता.
भारताला जागतिक स्तरावर टेनिसमध्ये नाव मिळवून दिले ते रामनाथन कृष्णन यांनी. १९६६ मध्ये त्यांच्याच खेळामुळे भारताने डेव्हिस चषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला होता. ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केल्यामुळे भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. १९६० व १९६१ च्या विम्बल्डन (Wimbledon) स्पर्धेत कृष्णन यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती ही अजून एक अभिमानास्पद कामगिरी होती. आजपर्यंत इतर कुठल्याही भारतीय टेनिसपटूने एकेरीत इतकी मजल मारलेली नाही.
कृष्णन यांच्यानंतर भारतीय टेनिसची धुरा वाहिली ती विजय आणि आनंद या अमृतराज बंधूनी. या दोघांची दुहेरीतील जोडी १९७० च्या दशकातील सर्वोत्तम जोड्यांपैकी एक होती. १९७४ च्या डेव्हिस चषक स्पर्धेत भारताने अंतिम फेरीत प्रवेश केला होता. पण प्रतिस्पर्धी देश दक्षिण आफ्रिकेच्या वर्णविद्वेषी धोरणाच्या निषेधार्थ भारताने हा सामना खेळण्यास नकार दिला आणि दक्षिण आफ्रिकेला विजयी घोषित करण्यात आले.
विजय अमृतराज हा बिजोन बोर्ग व जिमी कॉनर्सचा समकालीन. अमृतराज, बोर्ग, काँनर्स हे जागतिक टेनिसमधील ‘ए’ – ‘बी’ – ‘सी’ म्हणून प्रसिद्ध होते. विजय अमृतराजचा ‘सर्व्ह आणि व्हॉली’ चा खेळ अतिशय प्रेक्षणीय होता. त्याचे नजाकतदार बॅक हँड व फोर हँड फटके डोळ्याचे पारणे फेडत. त्याने अनेक स्पर्धांतून उपांत्य, अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती.
अमृतराज बंधूनंतर रमेश कृष्णनने भारतीय टेनिसची मशाल तेवत ठेवली. रमेश हा रामनाथन कृष्णन यांचा मुलगा. त्याने विम्बल्डन आणि फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धात कनिष्ठ गटाचे विजेतेपद मिळवले होते. त्याचा कलात्मक खेळ बघणे म्हणजे मेजवानी होती. त्याच्याच खेळामुळे विजय अमृतराजच्या नेतृत्वाखाली १९८७ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून डेव्हिस चषकाच्या अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. तेव्हा स्टीफन एडबर्गच्या स्वीडनने भारताला नमवून विजेतेपद मिळवले.
कृष्णनच्या अस्तानंतर लिएंडर पेस (Leander Paes) हा तारा उदयाला आला तो अजूनही भारतीय टेनिसच्या क्षितिजावर चमकत आहे. पेसची कारकीर्द तीस वर्षाच्या पार गेली आहे हा एक विक्रमच आहे. त्यानेच भारताला अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत सर्वप्रथम टेनिस मध्ये कास्य पदक मिळवून दिले. पेस आणि महेश भूपती ही दुहेरीत जगातील सर्वोत्तम जोडी होती.
त्यांनी ३ ग्रँड स्लॅम स्पर्धांसकट अनेक स्पर्धातून चमकदार कामगिरी करून अनेक विजेतेपदे मिळवली. १९९९ मध्ये या जोडीने विम्ब्लडनचे दुहेरीत अजिंक्यपद पटकावले होते. भारतातर्फे डेव्हिस चषक स्पर्धेत दुहेरी सामन्यात सलग विजय मिळवण्याचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला आहे.
या दोघांच्या नंतर सोमदेव देव बर्मन, बोपण्णा यांनी भारताचे नाव थोडेफार गाजवले पण त्यांच्यात सातत्य नव्हते. पेस -भूपती जोडीतले मतभेद, तसेच बोपण्णा व पेस यांच्यातील कलहामुळे भारतीय टेनिसचे फार नुकसान झाले. सध्या सुमित नागल याचे नाव बरेच चर्चेत असते. बघू या तो भारतीय टेनिसला गत वैभव प्राप्त करून देतो का ?
महिला टेनिसमध्ये सत्तरच्या दशकातील निरुपमा वसंत (मंकड) नंतर ठळकपणे नाव येते ते सानिया मिर्झाचे (Sania Mirza). तिने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये थोडीफार चमकदार कामगिरी केली. ती एका ऑस्ट्रेलियन ओपन मध्ये सेरेना विलियम्सला दिलेल्या चिवट लढतीमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली. तिने दुहेरी स्पर्धेत एकूण ६ ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवली. नंतरच्या काळात ती मॉडेलिंग आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकशी विवाह केल्यामुळे जास्त चर्चेत राहिली. सध्या अंकिता भाम्बरीचे नाव थोडेफार गाजत आहे पण दखल घेण्यायोग्य कामगिरी काही घडत नाही.
इतर सर्व खेळात भारताची प्रगती होत असताना टेनिसमध्ये होत असलेली पीछेहाट निराशाजनक आहे. त्यामुळेच असे वाटते की भारतात टेनिस हरवले गेले आहे की काय? भारतीय टेनिस संघटनेने यासाठी भविष्याचा वेध घेणारा कार्यक्रम राबवून टेनिसला पुन्हा उर्जितावस्था आणावी हीच अपेक्षा.
– रघुनंदन भागवत
(लेखक क्रीडा अभ्यासक आहेत)
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.