इस्रायल आणि हमास यांच्यात युद्धबंदी सुरु झाल्यावर हमासनं त्यांच्या ताब्यातील २० ओलिसांना सोडले आहे. इस्रायलचे हे २० ओलिस ख-या अर्थानं भाग्यवान ठरले आहेत. कारण त्यांच्यासारखेच अनेक ओलिस त्यांच्यासमोरच मृत पावले किंवा त्यांना हालहाल करुन ठार मारण्यात आले. या २० ओलिसांनी जी वेदना सहन केली आहे, आणि हमासच्या दहशतवाद्यांपुढे जो संयम ठेवला आहे, त्यामुळेच ते सुखरुप आपल्या कुटुंबियांपर्यंत पोहचू शकले आहेत. तब्बल ७३८ दिवसांनी हमासच्या कैदेतून सुटलेल्या या ओलिसांच्या कथा ह्दय पिळवटून टाकणा-या आहेत. यातील सर्वांचाच हमासनं शारीरिक आणि मानसिक छळ केला आहे. ब-याचजणांना पाणी आणि अन्नाशिवाय रहावे लागले. भुयारवजा अंधार कोठडीत राहिलेल्या या २० ओलिसांनी कित्येक भीतीच्या छायेत घालवले आहेत. आता त्यांची सुटका झाली असली तरी या दोन वर्षातील अनुभव त्यांना आयुष्यभर लक्षात रहाणार आहे. (Hamas)
हमासच्या कैदेतून सुटलेल्या इस्रायलच्या तरुणांचे अनुभव हे कोणाच्याही डोळ्यात पाणी आणणारे आहेत. ७ ऑक्टोबर २०२३ च्या हल्ल्यांपासून हे ओलिस हमासच्या ताब्यात होते. दोन वर्षानंतर हमासनं ओलिसांची सुटका केल्यावर त्यांच्या स्वागतासाठी त्यांचे कुटुंबियच नाही तर अवघा इस्रायल देश उभा होता. जेव्हा हे २० ओलिस हमासनं रेडक्रॉसच्या ताब्यात दिले, तेव्हा या सर्वांनीच विजयाचा उत्सव सुरु केला. ओलिसांना सोडण्यापूर्वी, हमासने या ओलिसांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांमध्ये व्हिडिओ कॉलची व्यवस्था केली. तेव्हाच अनेक ओलिसांना फोनवरुन आपल्या नातेवाईकांना पाहून गहिवरुन आले होते. या ओलिसांमध्ये २२ वर्षाच्या मतान अँग्रेस्टचा समावेश आहे. मतान नाहल, ओझ लष्करी तळावर तैनात होता जेव्हा त्याचे हल्ल्यादरम्यान अपहरण करण्यात आले. मतानला एका टँकला बांधून अत्यंत क्रूरपणे ओढून नेण्यात आले. (International News)
त्याच्या या अपहरणाचा व्हिडिओही हमासनं शेअर करुन त्याच्या कुटुंबियांना दुखवण्याचा प्रयत्न केला. मात्र या वर्षी त्याच्या कुटुंबानी मतान किती साहसी आहे, हे दाखवण्यासाठी हाच अपहरणाचा व्हिडिओ पुन्हा शेअर केला होता. गली आणि झिव्ह बर्मन या २८ वर्षीय जुळ्या भावंडाचे एकत्रपणे अपहरण झाले होते. त्यांच्या कुटुंबियांनी ते परत आले म्हणून आनंद व्यक्त केला आहे, मात्र या जखमा आयुष्यभर राहतील असे सांगून आपला संतापही व्यक्त केला आहे. ३६ वर्षीय एलकाना बोहबोट याचे नोव्हा म्युझिक फेस्टिव्हलमधून अपहरण करण्यात आले होते. हल्ला झाला तेव्हा एलकाना अन्य जखमींना मदत करत होता. त्यातच त्याला पकडण्यात आले. हमासनं मे महिन्यात त्याचा व्हिडिओ प्रसिद्ध केला होता. तेव्हा त्याची तब्बेत खालावलेली दिसली. यात एलकानाने आपल्या पत्नी आणि मुलाला भेटू द्यावे अशी विनंती हमासकडे केली होती. २१ वर्षीय रोम ब्रास्लाव्स्की हा नोव्हा फेस्टिव्हलमध्ये सुरक्षा रक्षक होता. हल्ला झाल्यावरत्याने अनेक लोकांना वाचवले, पण त्याचे हमासच्या सैनिकांनी अपहरण केले. रोमनं आपल्या आईला व्हिडिओ कॉल केल्याचा व्हिडिओही सर्वाधिक व्हायरल होत आहे. (Hamas)
त्यात त्याची आई, तुला मिठीत घेण्यासाठी मी आतुर आहे, असं सांगून रडतांना दिसत आहे. २० वर्षाचा निमरोद कोहेन हा हमासच्या हल्ल्याच्यावेळी निरिम किबुट्झजवळ तैनात होता. त्यालाही अत्यंत क्रूरपणे पकडून नेण्यात आले. २४ वर्षीय एव्यातार डेव्हिडचे नोव्हा फेस्टिव्हलमधून अपहरण झाले होते. त्याचाही हमासनं ऑगस्टमध्ये व्हिडिओ काढून प्रसिद्ध केला होता. त्यात एव्यातार याने त्याला कित्तेक दिवसांपासून अन्न आणि पाणी मिळाले नसल्याचे सांगितले आहे. हमासच्या हल्ल्यात काही परदेशी नागरिकांचेही अपहरण झाले. त्यात ३७ वर्षीय मॅक्सिम हर्किन याचा समावेश आहे. डोनबास युक्रेन येथील मॅक्सिम हा त्याच्या कुटुंबातील एकमेव कमावता पुरुष आहे. २७ वर्षीय सेगेव खल्फन हाही नोव्हा फेस्टिवलमध्ये हमासच्या ताब्यात सापडला. हल्ला झाला तेव्हा त्याने त्याच्या कुटुंबियांना फोन लावला होता. त्याचवेळी त्याला हमासच्या सैनिकांनी ताब्यात घेतले. हमासच्या दोन वर्ष कैदेत राहिलेला २३ वर्षीय बार कुपरस्टाईन हा हल्ला झाला तेव्हा अवघ्या २१ वर्षाचा होता. तो बाउन्सर म्हणून नोव्हा फेस्टिवलमध्ये काम करत होता. जखमींना मदत करतांना त्याला पकडण्यात आले. (International News)
================
Donald Trump : ट्रम्पची दुधाची तहान ताकावर !
=================
हमासनं जेव्हा ओलिसांची सुटका केली तेव्हा बारनेही आपल्या आईबरोबर फोनवरुन संवाद साधला होता. त्यावेळीही या मायलेकांचा आक्रोश ह्दय पिळवटणारा होता. यासर्वात २५ वर्षाच्या योसेफ-हैम ओहानाची कहाणीही आहे. हमासच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना मदत करत असतांना त्याला ओढून नेण्यात आले. योसेफच्या वडिलांनी जेव्हा आपल्या मुलाला दोन वर्षानंतर बघितले, तेव्हाचा त्यांचा आक्रोश सर्वानाच रडवून गेला. हमासनं २० ओलितांची सुटका केली असली तरी त्यांच्यापैकी २८ जण असे भाग्यशाली ठरले नाहीत. त्यांचा हमासच्या कैदेत मृत्यू झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना आय़ुष्यभर त्यांची कमी जाणवणार आहे. या सर्वांसाठीच अवघा इस्रायल एक झाला होता. गाझा सीमेजवळील रायम येथील लष्करी तळावर हमास दहशतवादी गटाने या ओलिसांना सोडले तेव्हा त्या प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. (Hamas)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics