असे म्हटले जाते की, आयुष्यात गुरू असणे फार महत्त्वाचे असते. गुरूला देवासमान मानले जाते. शास्रांनुसार, गुरू हा शब्द दोन शब्दांपासून तयार झाला आहे. गुरू हे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जातात. आयुष्यात गुरूशिवाय कोणत्याही कामात यश मिळत नाही. गुरुपौर्णिमा ही सद्गुरूंची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात. तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचावा, म्हणून गुरूची प्रार्थना करावयाची, तो हा दिवस होय.आज सर्वत्र गुरुपौर्णिमा साजरी केली जात आहे. त्याच निमित्ताने या दिवसाचे महत्त्व नक्की काय हे पाहूयात. (Guru Purnima)
गुरु म्हणजे ज्ञानाचा सागर आहे. जलाशयात पाणी विपुल आहे, परंतु घटाने-घागरीने आपली मान खाली केल्याशिवाय म्हणजे विनम्र झाल्याशिवाय पाणी मिळू शकत नाही. त्याप्रमाणे गुरूजवळ शिष्याने नम्र झाल्याविना त्याला ज्ञान प्राप्त होणार नाही, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. ‘गुरु बिन ज्ञान कहासे लावू?’ हेच खरे आहे.
खरंतर हिंदू पंचांगानुसार प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरू पौर्णिमा साजरी केली जाते. सनातन धर्मात गुरू पौर्णिमेच्या दिवशी आपल्या गुरूंचा आशीर्वाद घेतला जातो. गुरू सुद्धा त्यांना दीर्घायुष्यासाठी आशीर्वाद देतात. धार्मिक ग्रंथांच्या मते, आषाढ महिन्यातील दिवशी गुरू पौर्णिमा साजरी करण्याची सुरुवात हजारो वर्षांपूर्वी महर्षी वेदव्यास यांनी सुरु केली होती.
सनातन धर्मात महर्षी व्यास यांना देवासमान मानले जाते. बालपणापासून महर्षी व्यास यांना अधात्म्यात फार आवड होती. असे म्हटले जाते की, आषाढ महिन्यातील पौर्णिमेला महर्षी व्यास यांनी आपल्या शिष्य आणि ऋषी मुनींना श्रीमद्भवतगीतेचे ज्ञान दिले होते. तेव्हापासूनच महर्षी व्यास यांनी शिष्यांच्या या दिवसाला गुरू पौर्णिमेच्या रुपात साजरा करण्याची परंपरा सुरु केली जी आज सुद्धा सुरुच आहे.(Guru Purnima)
व्यासपौर्णिमेच्या दिवशी ‘ओम नमोस्तुते व्यास, विशाल बुद्धे’ अशी प्रार्थना करून, त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे, परंपरा आहे. आपल्या देशात रामायण-महाभारत काळापासून गुरु-शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बळावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली.
हेही वाचा- श्रावणात शंकरांच्या ‘या’ मंदिरांना नक्की भेट द्या
खरंतर गुरुपूजन, खरी गुरुपूजा म्हणजे गुरुंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे, जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे. सदगुरुंनी दाखवून दिलेल्या साधना मार्गाचा अभ्यास करणे, त्यांचा शब्द चालवणे म्हणजे खरे गुरुपूजन.