घरामध्ये फिशटॅंक ठेवणे हे अनेकांना आवडते. या फिशटॅंकमधील रंगेबिरंगी मासे आणि त्यासाठी करण्यात येणारी सजावट हा आवडीचा विषय असतो. आपल्याकडे असलेल्या फिशटॅंकमध्ये गोल्ड फिश, गप्पी फिश, निऑन टेट्रा, बेट्टा फिश, कोरीडोरस कॅटफिश सारखे मासे आपण आवडीनं ठेवतो, आणि त्यांची काळजी घेतो. मात्र या माशांमधील गोल्ड फिश जे कोणी ठेवत असतील, त्यांच्यासाठी एक धोक्याचा इशारा आहे. कारण हा गोल्डफिश नंतर महाकाय असा मेगालोडॉन होत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. याचा पर्यावरणाला मोठा धोकाही असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. (Goldfish)
ब-याचवेळा फिशटॅंकमध्ये असलेले गोल्डफिश मोठे झाल्यावर त्यांना तलाव, विहिरी किंवा नद्यांमध्ये सोडले जाते. पण असे हे गोल्डफिश तेथील अन्नघटक अतीवेगानं सेवन करत असल्याची माहिती मिळाली आहे. या नद्या, तलाव आणि विहिरींमध्ये असलेल्या अन्य माशांचा आहारही गोल्ड फिश खातात. त्यामुळे अन्य माशांच्या प्रजातीच नष्ट होत चालल्याचा धक्कादायक अहवाल अमेरिकेतील एका संस्थेनं दिला आहे. त्यामुळेच या गोल्ड फिशना आपल्या घरात शक्यतो ठेवू नका आणि ठेवल्यास ते मोठे झाल्यावर त्यांना अन्य नैसर्गिक अधिवासात सोडू नका, अशी विनंती करण्यात आली आहे. घरात फिशटॅंकमध्ये मासे ठेवणे हे अनेकांना आवडते. काहीजण त्याचा आणि वास्तू शास्त्राचा संबंध असल्याचे सांगतात. विशेषतः चिनी वास्तुशास्त्रामध्ये गोल्ड फिश असलेली फिशटॅंक घरात ठेवावी असे सांगण्यात आले आहे. चिनी वास्तुशास्त्रानुसार गोल्डफिश हा सर्वात पवित्र आणि समृद्धी आणणारा मासा मानला जातो. (Marathi News)
गोल्डफिश घरात ठेवल्यास आर्थिक संपन्नता येते असेही सांगितले जाते. मात्र याच गोल्डफिशबद्दलचे वास्तव आता पुढे आले आहे. गोल्डफिश हे पर्यावरणास पुरक असे मासे नसल्याचा अहवाल आला आहे. ज्यांच्या घरात मासे पाळले जातात, ते माशे मोठे झाल्यावर, म्हणजेच, फिशटॅंकमधील जागा त्यांना पुरेशी पडत नाही, हे लक्षात आल्यावर त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडतात. विहिरी, तलाव किंवा नद्यांमध्ये हे मासे सोडले जातात. मात्र यातील गोल्डफिश हा मासा अन्य माशांसाठी नुकसान करत असल्याचा अहवाल अमेरिकन फिश अँड वाइल्डलाइफ सर्व्हिस एजन्सीने दिला आहे. यासंदर्भात माहिती देतांना या संस्थेनं एका 67 पौंड वजनी गोल्डफिशचा संदर्भ दिला आहे. नद्यांमध्ये सोडण्यात आलेला हा गोल्डफिश आता 67 पौंडाचा झाला असून या माशाची भूक एवढी आहे की, त्यानं अन्य माशांचे अन्नही फस्त केले आहे. (Goldfish)
त्यामुळे नदिमधील अन्य माशांच्या प्रजातीच नष्ट झाल्याची माहिती या एजन्सीनं केलेल्या अभ्यासातून स्पष्ट झाली आहे. फ्रान्समधील एका नदिमध्ये सर्वात मोठा गोल्डफिश हाती आल्यावर संशोधकांनी त्याबाबत अभ्यास सुरु केला. एवढा मोठा सोनेरी मासा पहिल्यांदाच पकडला गेला. हा मासा घरातील फिशटॅंकमधून नदिमध्ये आल्याचे कळले. मात्र हा महाकाय गोल्डफिश जिथे मिळाला, त्या भागातील अन्य मासे हे उपासमारीमुळे नष्ट झाल्याचे उघड झाले. अमेरिकेच्या मत्स्य आणि वन्यजीव विभागाने गोल्डफिशबद्दल केलेल्या अभ्यासात या माशाबाबत जे खुलासे झाले ते चिंताजनक आहेत. घरातील गोल्डफिश जरी छान दिसत असले तरी त्यांची भूक मोठी असते. शिवाय हे गोल्डफिश कुठल्याही वातावरणात सहजपणे रहातात. त्यांची वाढ झपाट्यानं होते. असे मोठे झालेले गोल्डफिश नदि किंवा तलावामध्ये सोडल्यास ते अधिक आक्रमक होतात. त्यांची वाढ मोठ्या प्रमाणात होते, आणि अन्य माशांना त्यांचा धोका होऊ शकतो. (Marathi News)
===============
हे देखील वाचा : Taliban : तालिबानने बामियानमधील बुद्धमूर्ती नष्ट का केल्या?
Masan Holi : वाराणसीच्या मसान होळीसाठी मोठी गर्दी !
===============
हा अहवाल आल्यावर USFWS संस्थेनं घरी मासे पाळणा-यांना त्यांचे गोल्डफिश नद्या किंवा तलावात सोडू नयेत असे आवाहन केले आहे. गोल्डफिश अन्य माशांचे पूर्ण चक्रच नष्ट करतात. मोठे झालेले गोल्डफिश हे अन्य लहान माशांचा आपल्या आहारात समावेश करतात. तसेच अन्य माशांची अंडीही ते खातात. त्यामुळे या माशांच्या प्रजाती या संपुष्ठात येतात. गोल्डफिशचे आयुष्यही मोठे असते. साधारण वीस वर्षानंतर गोल्डफिश महाकाय माशाच्या रुपात दिसू लागतात. हे मासे सर्वभक्षी असतात. ते वनस्पती, प्राणी, मासे असे काहीही खाऊ शकतात. शिवाय ते कुठल्याही तापमानात राहण्यासाठी तयार असतात. अगदी 4 ते 32 अंश सेंटीग्रेड तापमानात जगू शकतात. अशावेळी अन्य माशांना मात्र त्यांच्यापासून धोका निर्माण होतो. त्यामुळे गोल्डफिश घरात पाळतांना विचार करा, आणि त्यांना कुठल्याही नैसर्गिक अधिवासात सोडू नका, असे आवाहन करण्यात आले आहे. (Goldfish)
सई बने