गाझामध्ये युद्धबंदी झाल्यानंतर जागतिक नेत्यांच्या उपस्थितीत इजिप्तमध्ये गाझा घोषणापत्रावर स्वाक्षरी झाली. अमेरिका, इजिप्त, कतार, तुर्कीसह अनेक प्रमुख देशांच्या नेत्यांच्या उपस्थितीत या घोषणेवर स्वाक्षरी करण्यात आली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पश्चिम आशियासाठी हा महत्त्वाचा दिवस असल्याचे सांगितले. मात्र एवढ्या मोठ्या करारानंतरही या घटनेची चर्चा झाली नाही, तर चर्चा सुरु झाली ती इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी कुठल्या प्रकारची सिगारेट ओढतात याची. त्याला कारण ठरले आहे, तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांचे वक्तव्य. एर्दोगान यांनी भर व्यासपीठावर मेलोनी यांच्या सिगारेट ओढण्यावर प्रश्न उपस्थित केला. अर्थात मेलोनी यांनी लगेच त्याला प्रत्युत्तर देत, आपण धूम्रपान सोडू शकत नसल्याचे सांगितले. गाझा करारादरम्यान हे दोन नेते समोरासमोर आले, आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या कुठल्या प्रकारची सिगारेट ओढतात, याची चर्चा सुरु झाली आहे. (Georgia Meloni)
इजिप्तमधील शर्म अल-शेख येथे गाझा करार झाला, यात स्टार ठरल्या त्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी. कारण प्रथम अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सौंदर्याची प्रशंसा केली. तर तुर्कीचे अध्यक्ष एर्दोगान यांनी मेलोनी यांना धूम्रपान सोडण्याचा पुन्हा एकदा सल्ला दिला आहे. एर्दोगान स्टेजवर मेलोनीला भेटले तेव्हा त्यांनी प्रथम त्यांच्या सौंदर्याचे कौतुक केले. त्यानंतर एर्दोगानने मेलोनीला धूम्रपान सोडण्याचा आग्रह केला. परंतु मेलोनीने हा सल्ला स्पष्टपणे नाकारला. एर्दोगान सध्या धूम्रपानमुक्त जग निर्माण करण्याच्या उद्देशाने नेत्यांना दारू आणि सिगारेट सोडण्याचे आवाहन करत आहेत. त्यातूनच त्यांनी मेलोनी यांना सल्ला दिला आहे. (International News)
२०२२ मध्ये निवडणुकीदरम्यान, जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्या वेबसाइटवर स्वतःची सर्व माहिती शेअर केली होती. त्यात त्यांनी आपण अल्ट्रा-स्लिम सिगारेट ओढत असल्याची माहिती दिली होती. अर्थात तेव्हा मेलोनी यांनी त्या दिवसभरात किती सिगारेट ओढतात, किंवा कुठल्या ब्रॅंडची सिगारेट ओढतात याबद्दल माहिती दिली नव्हती. (Georgia Meloni)
त्यानंतरच मेलोनी यांच्या धुम्रपानाबद्दल चर्चा सुरु झाली होती. मात्र एर्दोगान यांनी त्यांना भर व्यासपीठावर सिगारेट सोडण्याचा सल्ला दिल्यावर ही चर्चा नव्यानं सुरु झाली आहे. एर्दोगान यांनी हा सल्ला मेलोनी यांना दिला तेव्हा तिथे कतारचे अमीर, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्यासह फ्रान्स, युनायटेड किंग्डम आणि जॉर्डनचे प्रतिनिधी उपस्थित होते. एर्दोगान यांच्या सूचनेवर फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना कमालीचे हसू आले. तर मेलोनी यांनी आपण धूम्रपान सोडले तर काम करु शकणार नाही, अशा शब्दात एर्दोगान यांची सूचना फेटाळून लावली. अर्थात इटलीमध्ये सिगारेट ओढणे ही सर्वसामान्य बाब आहे. इटलीत २०२३ मध्ये सिगारेट ओढणाऱ्यांची संख्या १०० दशलक्षांपर्यंत पोहचली होती. तिथे १५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे २० टक्के नागरिक धूम्रपान करतात. इटलीमध्ये २२ टक्के पुरुष आणि १६ टक्के महिला सिगारेट ओढतात. इटालियन सरकारच्या मते, सुमारे ५ टक्के नागरिक दिवसाला २० पेक्षा जास्त सिगारेट ओढतात. त्यामुळे इटलीच्या पंतप्रधान सिगारेट ओढतात किंवा ओढत नाहीत, याबद्दल तेथील जनतेला फारसे औत्सुक्य नाही. (International News)
जॉर्जिया मेलोनी यांनीही आपल्या सिगारेटचे व्यसन कधीही लपवण्याचा प्रयत्न केला नाही. मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये त्यांनी १३ वर्षापासून आपण सिगारेट ओढत असल्याचे सांगितले होते. यासाठी जॉर्जिया मेलोनी यांचा जीवन संघर्ष कारणीभूत आहे. जॉर्जिया मेलोनी २०२२ मध्ये इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. एक बारटेंडर ते पंतप्रधान असा त्यांचा प्रवास अतिशय संघर्षपूर्ण आहे. वडिल सोडून गेल्यामुळे मेलोनी यांच्यावर लहानपणीच कुटुंबाचा भार आला होता. त्यामुळे शिक्षण पूर्ण करण्यासाठी मेलोनी यांनी नाईट क्लबमध्ये बारटेंडर म्हणून काम केले, याचवेळी त्यांना सिगारेट ओढण्याचे व्यसन लागले. १९९२ मध्ये मेलोनी राजकारणात आल्या. इटालियन सोशल मूव्हमेंटच्या युवा शाखेत सामील झाल्या. त्यानंतर विद्यार्थी गट स्टुडंट अॅक्शनच्या नेत्या म्हणून त्यांनी निवड झाली. वयाच्या २९ व्या वर्षी मेलोनी संसद सदस्य झाल्या. त्यानंतर एक-एक पद पार करत त्या पंतप्रधानपदापर्यंत पोहचल्या आहेत. (Georgia Meloni)
===============
हे देखील वाचा : Anneliese Michel : तिच्या अंगात सहा भूत होती आणि मग जे झालं…
=================
या राजकीय संघर्षातच मेलोनी यांचे वैयक्तिक आयुष्यही संघर्षाचे राहिले आहे. त्या सिंगल पेरेंट आहेत, आणि ही गोष्ट मेलोनी अभिमानानं सांगतात. त्यांना गिनेव्हा ही ९ वर्षाची मुलगी आहे. पत्रकार आंद्रिया गियाम्ब्रुनो यांच्यासोबत लिव्हइनमध्ये रहात असतांना मेलोनी यांनी या मुलीला जन्म दिला. मात्र हे नातं पुढे टिकलं नाही, पण मेलोनी या आईची जबाबदारी आवडीनं पार पाडत आहेत. त्यांच्या या संघर्षपूर्ण आयुष्याचा तणाव कमी करण्यासाठी आणि समाजसेवेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यासाठी आपण सिगारेट ओढतो, अशी स्पष्ट कबुली मेलोनी यांनी एका मुलाखतीमध्ये दिली आहे. (International News)
सई बने
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics